सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
मुक्तिपथ
First Published: 12-July-2017 : 15:40:55

 

सरकार काही काम करत नाही, चांगल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे,  सगळेच लोक वाईट आहेत, लोक वाईट लोकांनाच निवडून देतात..  अशा वर्षानुवर्षं चाललेल्या चर्चा कानावर पडतात तेव्हा वाटतं, मी या नुसत्या चर्चा करणाऱ्यांच्या गर्दीतला एक नाही. मी शोधतोय काही प्रश्नांची उत्तरं, स्वत:च !

 
इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुढे काय करायचं हा एक मोठाच प्रश्न माझ्यासमोर उभा होता. मला काय आवडतं हा एकमेव निकष लावून मी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होतो. मला खरंच हेच करायचं आहे का? मला नक्की काय करायचयं? - हे प्रश्न अधेमधे डोक्यात यायचेच. या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात ‘निर्माण’च्या शिबिरात आलो. ‘निर्माण’मध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. मला काय आवडतं यापेक्षा मी कोणाचा आहे? आणि समाजात गरज कशाची आहे? या प्रश्नांनी नवीन दिशा दिली आणि मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला सतत इतरांकडून अ‍ॅप्रूव्हल शोधण्याच्या माझ्यातल्या वृत्तीला थोडंसं बाजूला सारून स्वत:तल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींसह स्वत:ला स्वीकारण्याचा आणि सुधारण्याचा धीर मला मिळाला.
मी कोणाचा? - या प्रश्नाचं उत्तर शोधताना, समाजातील तळागाळातील गरीब लोकांना मी उत्तरदायी आहे या गोष्टीची तीव्रपणे जाणीव झाली. त्यामुळे मी समाजातील आर्थिक विषमता आणि गरिबीच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न तर ठरला पण गरिबीच्या प्रश्नावर काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे माहिती नव्हतं आणि नुसताच विचार करत राहणं पटत नव्हतं. गडचिरोलीमध्ये व्यसनांचं प्रमाण खूप आहे, परिणामी त्यावर होणारा खर्च हेदेखील गरिबीचं एक कारण आहेच. म्हणून प्रत्यक्ष काम करून पाहण्यासाठी मी ‘सर्च’च्या व्यसनमुक्ती विभागात कार्यकर्ता म्हणून रुजू व्हायचं ठरवलं.
सुरुवातीला वर्षभर मी प्रामुख्याने शालेय मुलांमधील तंबाखू सेवनाच्या प्रश्नावर काम केलं. या प्रश्नावर काम करताना प्रत्यक्ष फिल्डमधे वापरावयाची छोटी मोठी कागदपत्रं बनवण्यापासून ते एखाद्या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, हे सगळं समजावून घेता आलं. या सर्व गोष्टींमधून होणारं शिक्षण कुठलंही शाळा-कॉलेज मला देऊ शकणार नाही हे या प्रक्रि येदरम्यान कळून चुकलं. या प्रकल्पामुळे लहान मुलांसोबत काम करण्याचा आनंद अनुभवता आला. 
समाजातलं दारू पिण्याचं प्रमाण, दारूवर होणारा खर्च आणि दारूमुळे होणाऱ्या ठरावीक दुष्परिणामांचे प्रमाण शोधण्यासाठी सर्चच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत नियोजन, फिल्ड सुपरव्हिजन आणि डाटा एण्ट्री अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. या अभ्यासातून असं समजलं की २०१५-१६ या एका वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनी दारू आणि तंबाखूवर ३४२ कोटी रु पये खर्च केले. पूर्ण जिल्ह्याच्या विकासकामांच्या बजेटपेक्षा हा आकडा जवळपास दुप्पट आहे! त्यामुळे आधीच दुर्गम असलेला हा जिल्हा विकासाच्या बाबतीतही मागेच राहतो. त्यामुळे हा फक्त आरोग्याचा प्रश्न नाही, तर आपल्या विकासाचादेखील प्रश्न आहे हे सिद्ध होतं.
या प्रश्नावर काम करण्यासाठी सप्टेंबर २०१६ पासून महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि सर्च यांच्या संयुक्त पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात ‘मुक्तिपथ’ या बहुआयामी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. विकासापेक्षा व्यसनावर जास्त खर्च करणाऱ्या या जिल्ह्यातील लोकांचा दारू आणि तंबाखूवर होणारा खर्च, येत्या तीन वर्षांत किमान ३० टक्क्यांनी कमी होऊन दरवर्षी १०० कोटी रुपयांची जनतेच्या पैशांची बचत करणं हे या प्रकल्पाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. जवळपास १५००० किमी वर्ग क्षेत्रफळामध्ये पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी सुरू आहे हे समजण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्याची आणि तिचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने माझ्यावर आहे.
किती गावांमध्ये जाणीव जागृती कार्यक्र म आयोजित केले? जाणीव जागृतीच्या कोणत्या पद्धतीला लोक अधिक प्रतिसाद देतात? किती ठिकाणी दारू, तंबाखूची विक्र ी होते? गावात दारूच्या व्यसनमुक्ती उपचारांची गरज आहे असे किती लोक आहेत? किती गावांमधे दारू, तंबाखूविरोधी सक्रिय गट आहेत? - या साऱ्या प्रश्नांची उत्तरं, माहिती जमा करू शकेल अशी व्यवस्था आज मुक्तिपथमधे टॅबवर आधारित तयार करण्यात आली आहे. तालुका कार्यकर्ते प्रत्येक गावात भेट दिल्यावर तिथली माहिती टॅबमध्ये भरतात. यातूनच आम्हाला गडचिरोली जिल्ह्यातील १६०० गावांची दारू आणि तंबाखूच्या बाबतीत काय परिस्थिती आहे हे समजते आहे. तालुका कार्यालयानं कोणत्या कृतीवर भर द्यावा हे ठरवण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो.
काम करत असताना सतत स्वत:चे कम्फर्ट झोन तोडावे लागले, मनात उडणारा वैचारिक गोंधळ, सतत येणारे भावनिक चढ-उतार, एकूणच आयुष्यातील अनिश्चिततेबद्दल वाटणारी भीती, प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी हे सर्व हाताळताना स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल वाढत असलेली समज आणि एकूणच माणूस म्हणून सतत होत असलेली वाढ मला अमूल्य वाटते. शासन काम करत नाही, चांगल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे, सगळेच लोक वाईट आहेत, लोक वाईट लोकांनाच निवडून देतात इ. इ. अशा वर्षानुवर्षं चाललेल्या चर्चा कानावर पडतात तेव्हा मी या नुसत्या चर्चा करणाऱ्यांच्या गर्दीतला एक नाही याबद्दल समाधान वाटतं.
सर्चमध्ये काम करायला येताना मला मजा वगैरे येईल असं काही चुकूनही माझ्या डोक्यात नव्हतं. उलट मी येताना आता आपल्याला सामाजिक काम करायचं म्हणून एकदम धीरगंभीर चेहरा करून आलो होतो. पण इथे काम करताना मजा येतेय. ‘गरिबी’च्या प्रश्नावर काम करताना माझा नेमका रोल काय आहे, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं का? 
- तर नाही! पण उत्तराच्या शोधात मी एक पाऊल पुढे टाकलंय असं आता १०० टक्के आत्मविश्वासाने नक्कीच म्हणू शकतो.
- प्रतीक वडमारे, 
निर्माण-६
‘मुक्तिपथ’बद्दल अधिक माहितीसाठी-  http://searchforhealth.ngo 
ही वेबसाइट पहा.
 
‘निर्माण’च्या या प्रवासात आजवर आपण अनेक मित्रांना भेटलो. त्यांनी ‘कर के देखो’ हा मंत्र वापरून आपल्या जगण्याचं ध्येय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. 
तुम्हाला पडत असतील असेच काही प्रश्न. शिक्षण - नोकरी - निवृत्ती याहूनही वेगळं जगण्यात असं काही असतं का? काय केलं म्हणजे आपण आयुष्यात सेटल झालो? पैसे कमवण्यापलीकडे आपल्या आयुष्याचं काही ध्येय असू शकतं का? आपल्या कौशल्यांचा व क्षमतांचा उपयोग करून आपण समाजातले प्रश्न कसे सोडवू शकू?
- असे अनेक प्रश्न तुम्हालाही छळतात का? 
 
मग निर्माण तुमची वाट पाहत आहे..
महाराष्ट्रातील अस्वस्थ युवांनी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांचा कृतिशील शोध घ्यावा यासाठी सुरू केलेली शिक्षणप्रक्रि या म्हणजे निर्माण!
निर्माणची आठवी बॅच येत्या जानेवारीमध्ये सर्च, गडचिरोली येथे सुरू होत आहे. यामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर ही वेबसाइट पहा..
 http://nirman.mkcl.org 
या वेबसाइटवर जा. प्रवेश अर्ज डाउनलोड करा. आणि भरून त्वरित निर्माणला पाठवा. पूर्ण भरलेला फॉर्म निर्माणला nirmaanites@gmail.com  या इमेल आयडीवर पाठवावा. किंवा पोस्टाने सर्च, गडचिरोली- ४४२६०५ या पत्त्यावर पाठवावा. व्हॉट्सअ‍ॅप करू नये. 
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 
१५ आॅगस्ट २०१७ ही आहे !!
 
अधिक माहितीसाठी- http://nirman.mkcl.org 
ही वेबसाइट पाहा.
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com