मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
रिटर्न तिकीट विसरून जायचं!
First Published: 10-May-2017 : 15:46:31
Last Updated at: 10-May-2017 : 16:04:12

 

- श्रद्धा फासळे

ये जवानी है दिवानी

सिनेमातला डायलॉग आहे ना,

कंही पहुंचने के लिये 

कहींसे निकलना जरुरी है!

वाटतं तसे आपण निघालो,

आपलं गाव सुटलं,

मोठ्या शहरांत तसे उपरेच;

पण म्हणून काय झालं?

माझं बारावीपर्यंतचं शिक्षण नगरमध्ये झालं. बी.एस्सी. करायचं म्हणून मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. रहायची सोय कॉलेजच्या होस्टेलवर झाली. हॉस्टेलमध्ये महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुली होत्या. कॉलेजमध्ये तर आफ्रिकन, अमेरिकन, उजबेकिस्तान, अफगाणिस्तानातून आलेले मुलंमुली होते. त्यांना पाहून आपण पुण्यात नाही तर, जगातील कुठल्यातरी वेगळ्याच कोपऱ्यात आलोय असं वाटायचं. पण नंतर नंतर याची सवय झाली. नंतर कळलं की ही मुलं इथे आटर््स शिकण्यासाठी आलेत.

फक्त बी.एस्सी. तर करतेय त्यासाठी पुण्याला जायची काय गरज आहे, असं गावी ऐकल्यामुळे आपण काहीतरी एक्स्ट्राआॅर्डिनरी करतोय असं वाटायचं मला. ते वाटणं आधी बंद झालं. आणि सायन्स घेऊनच आपण काहीतरी मिळवू शकतो, आटर््स म्हणजे अभ्यासात मागं असलेली मुलं या गैरसमजाला तडा गेला. तो फुटलाच काचेसारखा खळकन. पहिला माझा चष्मा बदलला तो इथंच.

मोठ्या आणि छोट्या शहरातला सगळ्यात मोठा फरक कुठला? तर तो गर्दीचा आणि लाईफस्टाईचा असं प्रथमदर्शी वाटतं; पण सगळ्यात मोठा फरक जो मला जाणवला तो दृष्टिकोन आणि विचारांच्या प्रगल्भतेचा.

मोठ्या शहरांचं वर्णन करताना नकारार्थीच बोललं जातं. आपल्या शेजारी कोण राहतं हेपण आपल्याला माहीत नसतं वगैरे तर टिपिकल वाक्य. पण याकडे जर सकारात्मक बघितलं तर? आपल्या शेजारी कोण राहतं हे माहीत नसतं म्हणूनच आपण आपल्याला हवं तसं राहू शकतो. हेच आपण छोट्या शहरात आपल्या आयुष्याकडे पहा. स्वत:च्या कमी आणि समाजाच्या नजरेतून जास्त पाहतो आपण स्वत:कडे. कारण सगळे आपल्याला ओळखतात. एखादी लहानशी गोष्ट करायची तरी लोक काय म्हणतील याचा विचार करून गप्प बसतो. कुठलेही निर्णय घेताना समाजाचा विचार करून घेतो. (म्हणजे मला छोट्या शहराबद्दल तिरस्काराची भावना आहे असं नाही. स्थलांतरानं जे लक्षात आलं ते निरीक्षण नोंदवतेय.)

अर्थात मोठं शहर आपल्याला सहज स्वीकारत नाही. घरच्यांसारखी माया, प्रेम इथं मिळत नाही. आणि ते कदाचित कुठं मिळणारही नाही; पण म्हणून काय स्थलांतर करायचंच नाही का? तर ते करावंच, कारण त्यानं आपली नजर बदलते.

पुण्यात असताना नगरबद्दल कुठलीही गोष्ट कानावर आली तर ग्रुपमध्ये ‘तुझ्या गावाकडे...’ असं बोलून मित्रमैत्रिणी आपण त्यांच्यातले नाही याची जाणीव नकळतपणे करून देतातच. पुण्यात असताना नगरकर म्हणून ओळख होती. होस्टेलवरून घरी आल्यावर कुणीही भेटलं की तर पुणेकर अशी हाक मारायचं. थोडक्यात काय तर आम्ही ना नगरचे ना पुण्याचे, प्रत्येक जण आपापल्या परीने आमचं गाव ठरवतो. स्थलांतर केल्यामुळे जन्मभूमीची नाळ तुटत जाते आणि कर्मभूमीत चटकन आपलेपणा मिळत नाही. कधी कधी विचार करून वाईट वाटतं; पण पुण्यात अनुभव मिळाले, ध्येय मोठं झालं हे आठवून समाधानही वाटतं. आता तर या सगळ्याची सवय झालीये. तशीही आपली स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत. ये जवानी है दिवानीचा डायलॉग आहे ना कंही पहुंचने के लिये कहींसे निकलना जरुरी है!

मागच्या आठवड्यात सुंदर पिचईची मुलाखत वाचली. ते जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा त्यांनाही अमेरिकेने स्वीकारलं का? त्यांनाही कडू - वाईट अनुभव आलेच असतील ना? पण आज ते गूगलचे सीईओ आहेत. 

जन्माला येताना कुणीच स्मार्ट नसतं. आपणच जर स्वत:तले दोश प्रामाणिकपणे स्वीकारून त्यावर मात करायला हवी. छोट्या शहरातून आलो याचा कुठलाही न्यूनगंड न बाळगता स्वत:वर विश्वास ठेवला तर पुणे, मुंबईच काय अख्ख जग स्वीकारेल.

माझ्या स्थलांतराचा हा पहिलाच टप्पा. थोडं इमोशनल तर व्हायला होतंच. पण रिटर्न तिकीट नको आहे. मोठ्या शहरातलं उपरेपण मान्य करूनही आपल्याला स्वप्नपूर्तीकडे चालत रहावंच लागणार आहे, हे खरं!

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!



महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com