सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
एक राउण्ड दे ना..
First Published: 10-July-2017 : 16:15:56

 - डॉ. मृण्मयी भजक

माझी मैत्रीण नुकतीच कोणतीतरी मोठी सायकलवारी करून आली होती. त्यानंतर ती सगळीकडे फक्त आणि फक्त सायकलनंच फिरत होती. एके दिवशी सकाळी ती माझ्याकडे यायला निघाली. तिच्या माझ्या घरातलं अंतर जवळजवळ पंचवीस किलोमीटर होतं. मला ते फार मोठं वाटत होतं. तिची सायकल छानच होती. इतकी छान कीपंचवीस किलोमीटर सायकल चालवून दमून आलेल्या माझ्या मैत्रिणीला आत बोलावण्याऐवजी मी तिच्याकडे सायकलचा एक राउण्ड मागितला. कितीतरी वर्षांनी सायकल चालवून एकदम मस्त वाटलं. उत्साहाच्या भरात आणखी एक राउण्ड घेतला. लहानपणी एकमेकांच्या सायकलचा राउण्ड मागण्याची पद्धत आठवली. 
आपल्यापेक्षा इतरांची सायकल चांगली वाटण्याचे ते दिवस होते. आजही मला तसंच काहीसं वाटत होतं. आपल्या आयुष्यातलं पहिलंवहिलं वाहन म्हणजे सायकल. कसंही असलं तरी आपलं! त्याची काळजी घेणं, ती स्वच्छ ठेवणं, नवीन असताना मित्रमैत्रिणींमध्ये भाव खाणं हे सगळं आठवून आज मजा वाटते. आपली सुरुवात सायकलनं झाली, पण आपल्याला पॅडल मारणं कष्टाचं वाटू लागलं म्हणून दुचाकी आली. आपल्याला आणखी आराम हवा होता म्हणून चारचाकी आली. नेहमी चारचाकीत बसून आपलं पोट सुटू लागलं म्हणून आपण जिम धरली आणि पुन्हा सायकल चालवू लागलो. पण जिममधली सायकल चालवण्यापेक्षा खरीखुरी सायकल चालवणं जास्त छान नाही का? हल्ली शहरात काही ठिकाणी सायकल चालवण्यासारखी परिस्थितीच नसते. पण जिथे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आत्ताही सायकल चालवायला खरंच काय हरकत आहे? आपल्या नेहमीच्या गाडीच्या रस्त्यावरून आपण सायकल चालवतो तेव्हा रस्त्यावरचे बारीक बारीक चढ- उतार आपल्याला जाणवू लागतात. असे चढ-उतार जे आपल्याला त्या रस्त्यावरून चालतानादेखील जाणवलेले नसतात आणि हे चढ आपल्याला चांगलेच दमवतात. शाळा-कॉलेजात असताना आपण जितक्या सहजतेनं सायकल चालवू शकत होतो तितक्या सहजपणानं मोठेपणी सायकल चालवता येत नाही. हे जरी खरं असलं, तरी सायकल चालवून वाटणारा आनंदही मोठा असतो. सायकल चालवावी नाहीतर चुकून कधी मागावा कुणाकडे एक राऊण्ड तरी!
 (लेखिका निवेदिका आणि कार्यशाळा प्रशिक्षक आहेत. drmrunmayeeb@gmail.com) 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com