सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
परू लिमा आणि म्युझिअम
First Published: 10-July-2017 : 15:54:20

 - सुनीता पेठे

तुम्ही जगातील कोणत्याही देशात जा, त्या देशातील मोठ्या शहरातली म्युझिअम्स ही मोठी आकर्षणाची जागा. फक्त ती बघण्यासाठी तुमच्याकडे उत्सुकता हवी आणि न कंटाळता अख्खं म्युझिअम फिरून बारीक सारीक गोष्टी तपशिलासह बघण्याची, समजून घेण्याची चिकाटीही हवी. 
म्युझिअम हे तर त्या-त्या देशाचा इतिहास, तिथले लोक, त्यांच्या राहण्याच्या पद्धती, त्यांचे आचार-विचार, त्यांच्यातील कला, त्यांनी जोपासलेले छंद यांसारख्या नानाविध गोष्टींचा ठेवाच असतो. म्युझिअम पाहून आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला कितीतरी जुन्या गोष्टी नव्यानं कळलेल्या असतात. दक्षिण अमेरिकेतील परू (पेरू नव्हे) देशाच्या राजधानीचं शहर म्हणजे लिमा. त्या लिमामधल्या एका म्युझिअममधून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मात्र आपल्याला वाईट वाटतं आणि संताप होतो. असं भयानक, अजब म्युझिअम म्हणजेच कॅटॅकूम्ब्स म्युझिअम. चर्चमधलं म्युझिअम.
साधारण १३ व्या (तेराव्या) शतकापासून परूमध्ये तिथले मूळ रहिवासी इन्का इंडियन्स राहत होते. त्यांनी आपल्या पराक्रमानं फक्त परू देशच नव्हे, तर इक्वेडोर, अर्जेंटिना, चिली, कोलंबिया यांसारखे देश जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. त्यांचं हे साम्राज्य साधारण १४३८ ते १५३३ पर्यंत अस्तित्वात होतं. परंतु १५२६ सालापासूनच या साम्राज्याला उतरती कळा येऊ लागली. १५२६ पासून स्पॅनिश लोकांनी पनामामधून गुपचूप शिरकाव करून आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांनी इन्का इंडियन्सबरोबर लढाया करून साधारण १५७२ पर्यंत त्यांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला आणि स्पॅनिश लोक त्यात यशस्वी झाले. तेव्हापासून जवळजवळ दोनशे वर्षे परूमध्ये स्पॅनिश लोकांचाच अंमल होता. 
त्यानंतर मात्र परू देश स्पॅनिश जोखडापासून स्वतंत्र झाला. त्यांनी लिमा ही राजधानी केली. ती स्पेनमधल्या माद्रीदसारखीच बांधली आहे. लिमामधले ‘सॅनफ्रॉन्सिस्को’ हे प्रसिद्ध चर्च कॅटॅकूम्ब्ससाठीच प्रसिद्ध आहे. त्या चर्चमधल्या सेमिटरीमध्ये ७५००० (पंचाहत्तर हजार) प्रेतं पुरलेली होती. तिथलं तळघर म्हणजे एक मृत्यूची गुहाच आहे. इन्का इंडियन्सना पराभूत करून आणि ठार मारूनच ते सैनिक थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या प्रेतांची चिरफाड केली. त्यांचे हात, दंड, मांड्या, डोक्याच्या कवट्या, डोळ्याच्या खाचा यांसारखी प्रेतातील हाडं त्यांनी काढली आणि त्या हाडांची निरनिराळी सुशोभनं (डिझाइन्स) करून भिंतीवर, छतावर लावली. तळघरात तीस फूट खोल विहीर आहे. विहिरीमध्येसुद्धा डोक्याच्या कवट्यांची कमळं, डोळ्यांच्या खोबणींची डिझाइन्स अशी चित्रविचित्र सुशोभनं दिसतात.
 
लिमामधलं सोन्याचं म्युझिअम
आता लिमामधलं दुसरं प्रसिद्ध म्युझिअम म्हणजे सोन्याचं म्युझिअम. स्पॅनिश लोकांनी परूमधल्या इन्का इंडियन्सचा समूळ नायनाटच केला नाही तर त्यांचे सुवर्णसाठे लुटून नेले. तरीही त्या काळातलं त्यांचं वैभव काय होतं ते सांगणारं हे सोन्याचं म्युझिअम.
स्पॅनिश लोकांनी प्रचंड प्रमाणात लूट करूनही इन्का इंडियन्सजवळचं प्रचंड सोनं आणि सोन्याच्या गोष्टी शिल्लक तरी कशा राहिल्या? अ‍ॅण्डीज पर्वताच्या रांगांमध्ये लपलेल्या कुझ्को (कुस्को) या ठिकाणचा स्पॅनिश लोकांना पत्ताच लागला नाही. म्हणून तर जगातला सगळ्यात मोठा सोन्याचा साठा पुढे लिमा शहरात आणला गेला. लिमा शहरातलं हे सोन्याचं म्युझिअम पर्यटकांचं मोठं आकर्षण बनलं आहे. कुस्को गावातल्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंचे साठे ज्या इमारतीत ठेवले होते तिचं नावं होतं ‘कोरिकांच्या’. 
कोरिकांच्या या शब्दाचा अर्थ आहे सुवर्णप्रभा. या अर्थावरूनच इन्का राजाचं सोन्याबद्दलचं प्रेम सहज कळून येतं. कोरिकांच्या भिंतीसुद्धा सोन्याच्या पत्र्यानं मढवलेल्या होत्या. 
इन्का लोकांचा मका फारच आवडता. त्यांच्या रोजच्या जेवणात मक्याचं काहीतरी असायचंच आणि त्यामुळे कोरिकांच्या संग्रहात मक्याची कणंसही होती. इतर कित्येक गोष्टींमध्ये चंद्र-सूर्य, तारे, सुवर्णपुष्पकरिणी याबरोबरच राजाचे दागदागिने, कपडे हेसुद्धा होतं. इतकंच काय पण लहान लहान मुलांचे पुतळेसुद्धा सोन्याचे बनवले होते. 
ग्रीस देशाच्या मिडास राजाला जर हे माहीत असतं तर त्याने कुस्कोवर हल्लाच केला असता की मग. ‘हात लावेन त्याचं सोनं होऊ दे’ असा वर त्या देवाकडे त्यानं कशाला मागितला असता?
कुस्कोमधल्या वरील सर्व गोष्टी सोन्याच्या म्युझिअममध्ये आहेतच. विशेष करून तिथे सोन्याच्या शस्त्रांचा मोठा साठा आहे जणू काही शस्त्रागारच. एवढं सोनं जगातल्या कुठल्याच म्युझिअममध्ये नाही. इथलं तळघर म्हणजे बँकेच्या स्ट्राँगरूमसारखेच आहे. लिमामधला सोन्याचा साठा तीन हजार वर्षांहून जुना आहे. इथे आणखी काय काय आहे ते तरी पाहा. सोन्यानं मढवलेल्या ममीजपासून इन्काराजे आणि त्यांचे सरदार यांच्या दागिन्यांची भरलेली कपाटेच्या कपाटे इथे आहेत. दागिनेसुद्धा कसे तर माणसाचे सगळे अवयव सुशोभित करणारे. 
इन्का लोकांना पुरुषांच्या दागिन्यांचं एवढं कौतुक होतं खरं; पण नाजूक साजूक दागिने वापरण्याची पद्धत इन्का महिलाच्यांत होती की नाही? की त्या महिलांना दागिन्यांचा सोसच नव्हता? हा प्रश्न मात्र म्युझिअम पाहताना पडतो. आजही एक गोष्ट विशेष लक्षात येते ती म्हणजे स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या दक्षिण अमेरिकेतल्या पुरुषांच्या अंगावर सोन्याची घड्याळं, अंगठ्या, कडी, माळा अशा जडजड वस्तू दिसतात. पण महिलांच्या अंगावर मात्र नाजूक दागिनेच दिसतात. याचं मूळ इतिहासात दडलेलं असलेही कदाचित. 
कुस्कोमधल्या म्युझिअममध्ये या सोन्याच्या साठ्याव्यतिरिक्त सुईपासून सिंहासनापर्यंत बऱ्याच गोष्टी, राजांची हत्यारं, वाद्यं, यासोबतच मेणबत्त्यांचे स्टॅण्ड, घमेली, फावडी, स्वयंपाकाची भांडी, देवाच्या मूर्ती, पूजेचं साहित्य असंही आहे. 
सोन्याच्या तारेनं विणलेल्या कपड्यांना शोभा आली आहे ती रत्नांच्या साक्षीनेच. असं हे सगळं बघून कुणाचे डोळे दिपले नाहीत तरच नवल!
म्युझिअम पाहताना भूतकाळ असा भेटतो खरा.
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com