शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
लोखंडी कढया-तवे आहेत का घरात?
First Published: 15-May-2017 : 10:12:55

 - माधुरी पेठकर

भांडी घेण्याची आवड नाही असं कितीही म्हटलं तरी नवनव्या घाटाची भांडी मोहात पाडतातच. पण अ‍ॅल्युमिनिअमची भांडी? ती वापरावीत का?

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या संशोधनावर आधारित बातम्यांचा आधार घ्यायचा तर अ‍ॅल्युमिनिअमची भांडी आरोग्यास हानिकारक असतात. अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यात स्वयंपाक करताना भांड्यामधील अ‍ॅल्युमिनिअम पदार्थात आणि पाण्यात उतरतं आणि खाण्या-पिण्याद्वारे ते आपल्या पोटात जाऊन रक्तात मिसळतं. त्यानंतर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात ते साठून राहतं. त्याचा परिणाम अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. कोणाला हायपर अ‍ॅसिडिटी, अल्सर, अपचन होतं, तर कोणाला इसब, काळे डाग, कोंडा, अत्यंत दाह यांसारख्या त्वचाविकारांना सामोरं जावं लागतं. कुणाला अ‍ॅस्टोपोरोसिससारखे आजार जडतात. पण सर्वांमध्ये सारखा दिसून येणारा परिणाम म्हणजे अ‍ॅल्युमिनिअममुळे हाडांची वाढ खुंटते. 

अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यांविषयी तशी ही चर्चा आपल्या कानावर वारंवार येते. म्हणूनच विकसित देशांनी आपल्या स्वयंपाकघरातून अ‍ॅल्युमिनिअमची भांडी काढून टाकून नॉनस्टिक कुकवेअर आणले. पण विकसनील देशांत मात्र अजूनही गोरगरीब परवडतात म्हणून अ‍ॅल्युमिनिअमची भांडी वापरतात. घरीच नाही तर सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमापर्यंत ती सर्वत्र सर्रास वापरली जात आहेत. 

पण मग नॉनस्टिक वापरावं का सर्रास?

- असा प्रश्नही चर्चेत येतोच.

नॉनस्टिकची भांडी वापरतानाही ती जपून वापरावी लागतात. कारण या भांड्यांना टेफलॉन कोटिंग असतं. त्याच्या खाली अ‍ॅल्युमिनिअ म असत. हे टेफलॉन अन्नपदार्थांचा आणि अ‍ॅल्युमिनिअमच्या संपर्काला रोखतं. पण हे कोटिंग निघालं की मात्र अ‍ॅल्युमिनिअमशी अन्नघटकांचा संबंध येऊन ते पदार्थात मिसळू लागतं. म्हणून नॉनस्टिक भांडी वापरताना त्यांचं कोटिंग सांभाळणं गरजेचं असतं. ही भांडी घासताना टोकदार दातांच्या घासण्यांनी, स्टीलच्या घासण्यांनी घासू नये. मऊ किंवा नॉयलॉनच्या घासण्यांनी ही भांडी घासली तर हे कोटिंग टिकू शकतं. 

पण नॉंनस्टिक भांड्यातील टेफलॉन या घटकाबद्दलही एक संशोधन झालं असून, ते संशोधन सांगतं की, हे टेफलॉन जर कायम आपल्या वापरात असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन किडनीचे आजार होऊ शकतात. शिवाय कर्करोगाचीही शक्यता असते. नॉनस्टिक भांडे जर मोठ्या आचेवर तापवले तर हे टेफलॉन घातक ठरू शकतं. म्हणून पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ नॉनस्टिक भांडे मोठ्या आचेवर ठेवू नये असं सांगितलं जातं. नॉनस्टिक भांडे वापरताना त्यावरचं कोटिंग निघू नये म्हणून लाकडाचे किंवा प्लॅस्टिकचे चमचे वापरले जातात. पण हे चमचे सारखे स्वयंपाकासाठी वापरले आणि ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर मात्र अस्वच्छतेमुळे या चमच्यांमुळेही जंतुसंसर्ग होतो. त्यामुळे अ‍ॅल्युमिनिअमला उत्तम पर्याय म्हणजे लोखडी कढया आणि तवे. स्टीलची भांडी आणि चमचे. या अशा भांड्याद्वारे आपण आपल्या रोजच्या आयुष्यातून आपल्या पोटात अन्नाद्वारे जाणारा विषप्रवेश नक्कीच रोखू शकतो.

 

(madhuripethkar29@gmail.com)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com