सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
FGM बाईपणच कापून काढणारा एक छेद
First Published: 15-May-2017 : 10:04:15

- ओंकार करंबेळकर

स्त्रियांच्या योनीतला काही भाग कापून टाकला जातो किंवा शिवून टाकलो जातो.

का? तर त्यांची शरीरसुखाची लालसा वाढू नये म्हणून. अमेरिकेसारखे देशसुद्धा जिथं या प्रथेविरोधात लढा देतात तिथं आफ्रिकी देश आणि भारतात काही ठिकाणी मात्र अजूनही हे बिनबोभाट चालतं.

 

तेव्हा मी सात-आठ वर्षांची असेन. मी आणि माझी आत्या चालतच एका झोपडीसारख्या घरात गेलो. तिकडे जात असतानाच एक प्रकारची भीती मनात घर करायला लागली होती. पण आई म्हणाली, काही होणार नाही. थोडंसं दुखेल पण ते गरजेचं आहे. तिकडे गेल्यावर एका म्हाताऱ्या बाईने माझ्यावर गंजलेल्या ब्लेडचं पातं चालवलं. तेव्हा झालेल्या वेदना आज शब्दातही मांडता येत नाही. काही दिवसांनी वेदना कमी झाल्या. पण त्यादिवशी मनावर झालेला आघात आजही पुसता येत नाही. नुसती आठवण आली तरी काळजाचा थरकाप उडतो... 

- हे आत्मकथन कोणा एका मुलीचं नाही, तर जगातील बऱ्याचशा देशांमधील मुलींचा कमीअधिक प्रमाणात असाच अनुभव आहे. इजिप्त, नायजेरिया, सोमालिया, केनिया, युगांडा, इथिओपिया असो किंवा भारतही. एफजीएम झालेल्या महिलांच्या मनात आजही ती जखम भळभळत राहते.
एफजीएम (फिमेल जेनिटल म्युटिलेशन म्हणजेच मुलींच्या योनीचा काही भाग अर्थात शिश्निका कापून टाकणे. स्त्रियांना लैंगिक सुख मिळू नये किंवा त्या संदर्भातली त्यांची मागणी, इच्छा वाढू नये म्हणून हे केलं जातं.) जगातील अनेक देशांनी एफजीएमवर कठोर कायदे करून बंदी घातली आहे. अगदी अमेरिकेतही एफजीएमविरोधात कडक कायदा आहे. पण गेल्या आठवड्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण अमेरिकेसह आणि पाश्चिमात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे. अमेरिकेमध्येही छुप्या पद्धतीने एफजीएम होत असल्याचे डेट्रॉइटमधील घटनेवरून स्पष्ट झाले आहे. मागास किंवा विकसनशील देशांत तर अजूनही ही अमानुष रीत सर्रास सुरू दिसते.
अमेरिकेतील मिशिगन इस्टर्न डिस्ट्रिक्टच्या अ‍ॅटर्नी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जमुना नगरवाला या डॉक्टरला एफजीएमची प्रक्रिया पार पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. ६ ते ८ या वयोगटातील मुलींचे एफजीएम केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर अमेरिकन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. नगरवाला यांच्यासह फक्रुद्दिन आणि फरिदा अत्तार या दोघा डॉक्टरांनाही अटक करण्यात आली आहे. अमेरिकेने १९९६ साली एफजीएम करणं हा गुन्हा आहे असं स्पष्ट करणारा कायदा तयार केला. या कायद्यानुसार एफजीएम करणाऱ्या किंवा एफजीएमचा कट करणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षांचा कारावास किंवा अडीच लाख डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो. या घटनेवरून संपूर्ण अमेरिकेत पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, अनेक सामाजिक संस्थांनी आजही अशा प्रथा परंपरेच्या नावाखाली चालू असल्याबद्दल जोरदार टीका केली आहे.
 
एफजीएम हा विधी आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये तसेच मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये आजही केला जातो. मुलींच्या योनीतले काही भाग कापले जातात किंवा काही ठिकाणी तर ते सरळ शिवूनही टाकले जातात. ही काटछाट गंजलेली ब्लेड्स, धातूच्या धारदार पट्ट्या किंवा जुनाट शस्त्रांनी केली जाते. त्यातून काही मुलींना धनुर्वात होतो. शक्यतो जननांगातील अवयव कापण्यासाठी कधी कधी काचेचाही वापर केला जातो. या काटछाटीमुळे झालेला रक्तस्त्राव आणि जखम भरून येण्यासाठी मुलींचे पाय विशिष्ट पद्धतीने बांधले जातात. या अघोरी प्रथेला जगभरात आजवर कोट्यवधी महिला बळी पडल्या आहेत. स्त्रीच्या लैंगिकतेवर ताबा मिळवून तिचे सर्व प्रकारे खच्चीकरण करण्यासाठी पुुरुषांनीच याची सोय करून ठेवली आहे. 
 
हे एफजीएम विविध देशांप्रमाणे, तेथील परंपरा आणि टोळ्यांप्रमाणे बदलत जाते. त्याचे साधारणत: तीन प्रकार केले जातात. पहिल्या पद्धतीमध्ये जननांगातील क्लीटोरिस (शिश्निका) वरील त्वचा काढून टाकली जाते, तर काही वेळेस क्लीटोरिस पूर्णत: काढून टाकले जाते. दुसऱ्या पद्धतीमध्ये क्लीटोरिस आणि लेबिया (योनिओष्ठ) काढून टाकले जातात. एक टप्प्याने क्रूरतेची पातळी उंचावत जाणाऱ्या या विधीमधील सर्वात अघोरी व वाईट टप्पा तिसऱ्या प्रकारामध्ये आहे. तिसऱ्या प्रकारात योनिओष्ठ शिवून टाकले जाऊन वरती सरळ टाके घातले जातात आणि मूत्रविसर्जनासाठी केवळ एक भोक ठेवले जाते. याच बारीक भोकातून मुलींना मूत्र विसर्जन व पाळीच्या वेळेस होणाऱ्या स्त्रावाचे विसर्जन करावे लागते. 
 
एफजीएम झालेल्या मुलींना आयुष्यभर वेदनांना सामोरे जावे वागते. जखमा आणि रक्तस्त्रावाचा त्रास सहन करावा लागतो. मूल जन्मास घालताना होणाऱ्या वेदनांमुळे कित्येक महिलांचे प्राणही गेले आहेत. आणि यामुळे बसणाऱ्या मानसिक धक्क्यातून मृत्यू झाल्यावरच सुटका होते. पाळीच्या वेळेस होणाऱ्या स्त्रावाच्या मार्गात यामुळे अडथळे येतात. बहुतांश वेळेस ही सगळी प्रक्रिया अंधाऱ्या जागेत एखाद्या कोपऱ्यात केली जाते. ब्लेडच्या कापण्यामुळे असह्य होणाऱ्या वेदनांमुळे मुली तेथून सुटण्याची, बाजूला जाण्याची धडपड करतात. या हालचालीमुळेही योनीच्या आजूबाजूस जखमा होतात.
 
कोणे एकेकाळी आदिवासी समुदायांमध्ये असलेली ही प्रथा जगभरात स्थलांतराबरोबर पसरलेली आहे. भारतात आजही काही समुदायांमध्ये परंपरेच्या नावाखाली एफजीएम केले जाते. एफजीएम हा आमच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा भाग आहे असे सांगत त्याचं समर्थन केलं जातं. पडद्याआड चाललेला हा प्रकार भारतीय समाजासाठी नक्कीच चांगला नाही. लहानपणीच अत्यंत दु:खदायक अशा या अनुभवाला सामोऱ्या जाणाऱ्या महिलांच्या मनावर एफजीएम कायमचा परिणाम करतो. आताशा आफ्रिकेतील आणि भारतातील महिला याविरोधात बोलू लागल्या आहेत. 
 
डेट्रॉइटमध्ये घडलेली घटना ही सर्व मानवी समाजाला हादरा देणारी घटना आहे. डॉ. नगरवाला यांना या प्रकरणी झालेली अटक ही घटना खूप काही सांगून जाते. वैद्यकीय व्यवसाय स्वीकारताना घेतलेली शपथ त्या विसरल्याच पण स्वत: बाई असूनही दुसऱ्या बाईचे दु:ख त्या समजू शकल्या नाहीत, याबद्दल वाईट वाटते. अमेरिकेत राहूनही त्यांना एफजीएम/सी बद्दल माहीत नव्हते, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. या अमानुष प्रथेमुळे त्या दोन मुलींना फक्त शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि भावनिक यातनांना सामोरे जावे लागले. त्यांचे भोग इथेच संपणार नसून अजून त्यांना कोर्टाच्या पायऱ्यांवरची लढाई लढावी लागणार आहे - शहिदा तवावाला कीर्तने, एफजीएमविरोधी चळवळीतील कार्यकर्त्या, साहियोच्या सदस्य

( लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.onkark2@gmail.com) 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com