मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
स्माइल प्लीज
First Published: 14-March-2017 : 08:59:41

- डॉ. मृण्मयी भजक 

 

आज मैत्रिणी च्या आग्रहाखातर मैथिली एका कार्यशाळेला गेली होती. खरंतर ‘अशा कार्यशाळा वगैरे करून आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही’ अशा ठाम मताची ती होती. पण मैत्रिणीनं अगदीच आग्रह केला म्हणून ती कार्यशाळेला गेली. कार्यशाळा संपताना प्रशिक्षकांनी दिलेला एक मंत्र मात्र तिच्या मनात घर करून राहिला. 

छोटासाच मंत्र होता तो. अगदी खरं सांगायचं तर तिची खात्री नव्हती त्याच्या सत्यासत्यतेबाबत. पण खात्री करून बघायला काय हरकत आहे असा विचार तिच्या मनात आला. हो, पण एक अट होती की तो मंत्र मनापासून करायचा होता. खोटा खोटा नाही. 

विचार करता करता घर कधी आलं तिला कळलंच नाही. जवळच्या किल्लीनं तिनं दार उघडलं. सासूबाई नेहमीप्रमाणं समोरच बसल्या होत्या. आता त्या काही बोलणार इतक्यात मैथिलीनं कार्यशाळेत सांगितलेला मंत्र अवलंबला आणि जादू झाली. सासूबार्इंनी नेहमीसारखा तक्रारींचा पाढा वाचण्याऐवजी चक्क ‘कशी होती कार्यशाळा’ असा प्रश्न विचारला. 

म्हणजे मंत्र काम करत होता तर. 

आता मैथिलीचा आत्मविश्वास वाढला.

थोड्या वेळानं संध्याकाळच्या पोळ्या करायला बाई आली. हल्ली तिच्याशीदेखील मैथिलीचे जरा खटकेच उडायला लागले होते. मैथिलीला मंत्र आठवला. आणि दार उघडल्या उघडल्या तिनं पुन्हा मनातल्या मनात मंत्र म्हटला आणि त्या मंत्राबरोबर तिच्या तोंडून आपोआपच स्वागतार्थ ‘या’ असा एकच शब्द निघाला. आता आपल्याच मनाची समजूत आहे की काय हे तिला कळेना. पण पोळ्या मऊ झाल्या होत्या आणि शेवटची पोळीही करपलेली नव्हती. मैथिलीला खूपच आश्चर्य वाटलं. 

काय होत असेल या छोट्याशा गोष्टीनं? 

मैथिलीला प्रशिक्षक बार्इंचे शब्द आठवले.. ‘फक्त एक स्मितहास्य बऱ्याच गोष्टी बदलू शकतं. एक साधीशी गोष्ट आहे. बघा करून. स्मितहास्याच्या या छोट्याशा मंत्राचा आजपासूनच अवलंब करून बघा.’ 

वाक्य ऐकलं तेव्हा मैथिलीला जरा हास्यास्पदच वाटलं होतं. यात नवीन काय सांगताहेत असं वाटलं तिला. आता हसणं किती चांगलं हे का ठाऊक नसेल आम्हाला? त्याला मंत्रबिंत्र नाव देऊन उगीच मोठं करायचं? असे अनेक विचार तिच्या मनात आले. पण आता दोन वेळा मंत्र लागू पडल्यावर मात्र मैथिलीचे विचार बदलत चालले होते. 

नक्की काय फरक पडत असेल या छोट्याशा स्मितहास्यानं? मैथिलीसारखाच प्रश्न अगदी कोणालाही पडेल. आपल्या चेहऱ्याचे स्नायू असं काय काम करत असतील? शरीरशास्त्र सांगतं की आपल्या चेहऱ्याला रडवेला होण्यासाठी जास्त स्नायू लागतात, जास्त शक्ती लागते. म्हणजे स्मित करायला स्नायूंनाही मजा येत असावी. हे झालं अगदीच शास्त्रोक्त. पण आपल्या रोजच्या आयुष्यात काय होत असेल या स्मितहास्यानं? याचा विचार आपण फार कमी वेळा केलेला आहे . 

आपण हसतो ते दुसऱ्या कुणालाही दिसण्याआधी. हसल्यानंतर आपल्याला स्वत:ला कळतं आणि त्याच क्षणी मनातल्या काही नकारात्मक भावना कमी होऊन त्याची जागा सकारात्मकता घेते. आणि हीच प्रक्रिया समोरच्या व्यक्तीच्या मनातही होत असावी. म्हणूनच जादू केल्याप्रमाणे स्मितहास्य काम करतं. समोरच्या व्यक्तीला स्माइल देण्यासाठी, तिच्याशी हसण्यासाठी आपल्याला तिच्या डोळ्यात बघावं लागतं. म्हणजेच आपण त्या व्यक्तीशी संवाद साधण्याची सुरुवात करतो. आणि संवाद सुरू झाला की अढी निघून जातेच. 

अर्थात स्मितहास्य म्हणजे फक्त ओठ लांबवणं नाही. खऱ्या-खोट्या स्मितहास्यातला फरक कुणी न शिकवताही सहज कळतोच. खरंतर एवढी सगळी प्रक्रिया आपल्याकडून आपसूकच होत असते. आपली आवडती व्यक्ती भेटली की चेहऱ्याचे स्नायू वगैरे गोष्टींचा विचार न करता आपण मनमोकळं हसतोच. पण रोजच्या आयुष्यात मात्र स्मितहास्याचं महत्त्व आपण विसरूनच जातो. फोटो काढताना स्माइल प्लीज असं म्हटल्याबरोबर आपण मस्त हसतो आणि फोटो छान येतो. रोजच्या जगण्यातही आपण स्वत:च स्वत:ला अनेकदा ‘स्माइल प्लीज’ म्हणण्याची गरज आहे.

(लेखिका निवेदिका आणि कार्यशाळा प्रशिक्षक आहेत.) drmrunmayeeb@gmail.com

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com