मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
कामवाल्या मदतनीस
First Published: 14-March-2017 : 08:52:00

 - यशोदा वाकणकर

परवा माझ्याकडे काम करणारी बाई म्हणाली, ताई तुमचा व्हॉट्सअ‍ॅपवरचा डीपी छान आहे. मी उडालेच. चकित होऊन हसायला लागले. तिनं ‘डीपी’ हा शब्द वापरला बरं का! फोटो नाही. आता थोड्याच दिवसात तिनं माझ्या फेसबुकवरच्या लिखाणावर तिची मतं हिरीरीनं नोंदवली किंवा ‘उद्या मी दांडी मारणार आहे’ असं माझ्या फेसबुकीय भिंतीवर लिहिलं तरी आश्चर्य वाटू नये! 

एकदा मी व्हॉट्सअ‍ॅपवरचा डीपी व्हॅन गॉगचे प्रिंट असलेल्या कपांचा टाकला होता. ते कप माझ्या हॉलंडमधल्या मैत्रिणींनी भेट दिले होते. त्यांना दाखवण्यासाठी फोटो टाकला होता. तेव्हा दुसऱ्या दिवशी कप विसळत असताना माझी बाई म्हणाली, ‘अय्या ताई! याच कपाचा फोटो तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आहे ना!’ मला गंमत वाटली. किती ते बारकाईनं निरीक्षण!

हे बदल सध्या सगळीकडेच घडताना दिसत आहेत आणि छान वाटतंय. कामवाल्या बाया उन्हातून येतात त्यामुळे व्यवस्थित पुणेरी स्कार्फ बांधून येतात. मी औंधला राहायचे, तिथल्या एक कामवाली बाई सायकलवर यायच्या आणि विशेष म्हणजे, गॉगल घालून यायची. आमच्या इथल्या सध्याच्या एक बाई कामावर येताना जवळचा आणि लांबचा चष्मा बरोबर घेऊन येतात. भांडी घासताना जवळचा अन झाडताना लांबचा चष्मा लावतात. मला मजा वाटते. पण छानही वाटतं. एक कार पार्किंग झाडणाऱ्या बाई लिपस्टिक लावून येतात. त्यांचा उल्लेख वॉचमन लोकं ‘लालीवाली बाई’ करतात. 

माझ्या लहानपणच्या कामवाल्या बाया खूप साध्या आणि गरीब परिस्थितीतल्या असायच्या. आताही गरीबच असतात. परंतु त्यांच्यात आता वेगवेगळे स्तरसुद्धा दिसतात. जशी पूर्वी आपली मध्यमवर्गीय या शब्दाची व्याख्या वेगळी होती तशीच गरीब या शब्दाची व्याख्यासुद्धा बदललेली दिसते. किंबहुना गरीब आणि मध्यमवर्गीय यामध्ये अजून काही वेगळे स्तर निर्माण झालेले दिसतात. आजकाल एका खोलीच्या छोट्या घरात टीव्ही, फ्रीज असलेल्या कामवाल्या बायका वरचेवर दिसतात. टीव्हीवरील मालिकांविषयी त्या हिरीरीनं चर्चा करताना दिसतात. शिवाय जवळजवळ प्रत्येकीकडे मोबाइल फोन हा असतोच. उलट त्यांच्या कामासाठीसुद्धा तो गरजेचा असतो. 

एखाद्या कामवाल्या बाईकडे जर हँडसेट नसला तर मालकीण तिला आपला जुना हँडसेट देते. दोन कामवाल्या बायांमधे ‘तू रिलायन्स वापरतेस की बीएसएनएल’ या विषयांवरसुद्धा गप्पा चाललेल्या दिसतात. नवरात्रीतले नऊ रंग अप टु डेट फॉलो करणाऱ्यासुद्धा कामवाल्या दिसतात. आमच्या इथल्या कामवाल्यांची तर दर महिन्याची भिशीसुद्धा आहे!! 

बदलत्या समाजातली बदलती परिस्थिती खरंच खूप विचार करायला लावते. मी पूर्वी एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, आजकाल अनेकजणी लिहाय-वाचायला शिकलेल्या असतात. काहीजणी तिसरी चौथी, तर अनेक बायका नववी-दहावी. क्वचित एखादी बाई बीएसुद्धा झालेली भेटते. शिक्षणामुळे अर्थातच त्यांच्या राहणीमानात आणि बोलण्यात थोडाफार फरक दिसतो. कधीकधी आडमुठेपणा किंवा अरेरावीदेखील असते. पण त्याचा शिक्षणाशी संबंध नाही! 

पण तरीसुद्धा या बायकांमधे एक खूप गरीब स्तरसुद्धा अजूनही दिसतो! कधी मराठवाड्यातून किंवा दुष्काळग्रस्त भागांतून पुण्यात आलेली, स्वत:कडे काहीही नसलेली कुटुंब असतात. कधी नवऱ्यानं सोडून दिलेली बाई मुलांना घेऊन नेसत्या साडीनिशी आलेली दिसते. अति दुष्काळामुळे किंवा अति पावसानं शेताची वाताहत होते आणि मजुरी करणारं कुटुंब शहरात येतं. नवरा वॉचमनचं किंवा गाडी धुण्याचं काम करतो, तर बायको घरकामंं आणि मोलमजुरी करते. त्यांच्याकडे मोबाइलसुद्धा नसतो. शिवाय अशा बायका शहरी घरकामांमध्ये मुळीचच सराईत वगैरे नसतात. अनेकदा पूर्णपणे निरक्षर, अंगठाछापसुद्धा असतात. ही माणसं बघितली की आपण खाड्कन जागे होतो. गरिबीतला अजून एक स्तर दिसतो आणि वास्तव डोळ्यापुढे येतं.

कामवाल्या बायांची मुलं हा अजून एक चिंतनाचा विषय. त्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे ही मुलं कधीच आपल्या पालकांना ‘आई-बाबा’ म्हणत नाहीत, तर ‘मम्मी-डॅडी’च म्हणतात! आणि जास्तीत जास्त मुलांना इंग्रजी माध्यमातच घातलं जातं. 

फिया कशा भरपूर भराव्या लागतात हे ते अभिमानानं सांगतात. आपण जरी त्यांना मराठी माध्यमात घालण्याचा मोलाचा आणि फुकटचा सल्ला दिला तरी त्या मानत नाहीत! खूपच गरीब असलेल्या बायांची मुलं मात्र पालिकेच्या मराठी शाळांमधे जाताना दिसतात. 

हे सगळं बघून छान वाटत असतं. ही मुलं शिकून मोठी होतील अशी आशा सर्वांच्याच मनात असते. समोरच्या कामगार वस्तीतून सकाळच्या वेळी लहान मुलं पालिकेच्या शाळेत जाताना दिसतात तेव्हा मनात येतं यांच्यापैकी कुणी अंबानी बनू शकतं तर कुणी अब्दुल कलाम! पेपरमधे कधीतरी वाचनात येतं की झोपडपट्टीत राहणारी मुलगी सीए झाली किंवा मुलगा डॉक्टर झाला. हे वाचून खरंच छान वाटतं. पण कुणी चुकीच्या मार्गानं जाणारासुद्धा बनू शकतो ही धास्तीसुद्धा मनात येऊन गेल्याशिवाय राहत नाही! 

माझ्याकडे काम करणारी मुलगी बीए इन हिस्टरी झालेली आहे. पण त्या जोरावर तिला कुठेच नोकरी मिळत नाही. मिळाली तरी किरकोळ पगार. त्यापेक्षा आज ही मुलगी काही घरी कामं करून महिन्याला दहा हजारापेक्षा जास्त कमावते आणि या कामांमध्ये रमतेसुद्धा. 

आजच्या जमान्यात आपण काम करणाऱ्या स्त्रिया (किंवा पुरुषसुद्धा) निर्धास्तपणे कामाला जाऊ शकतो, कारण कामवाल्या बाईनं घरकामाची किंवा कधी स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारलेली असते. कधी लहान मुलांची किंवा वृद्धांची देखभाल करण्याचीसुद्धा जबाबदारी घेतली असते. 

मागे एकदा पुण्यात मोलकरणींचा मेळावा होता, तेव्हा वक्त्या म्हणून आलेल्या लीला पूनावाला आपल्या भाषणात एक अतिशय मार्मिक वाक्य बोलल्या होत्या. ते वाक्य होतं, ‘प्रत्येक यशस्वी पुरु षामागे एक स्त्री असते, पण प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एक कामवाली बाई असते!’

(भटकंती, गायन, लेखन आणि वाचनाची आवड असलेल्या लेखिका पुण्यात एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप चालवतात.)

yashoda.wakankar@gmail.com 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com