सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> जरा हटके >> स्टोरी
चर्चा मासिक पाळीच्या सुट्टीची
First Published: 15-July-2017 : 14:42:59
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी देण्यात यावी का ? मासिक पाळी विषयावर याआधीही अनेकवेळा चर्चा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर मध्यंतरी 'राईट टू ब्लीड' नावाने एक कॅम्पेनदेखील झालं होतं. मासिक पाळीदरम्यान महिलांना मंदिर प्रवेश नाकारल्यानंतर हे कॅम्पेन सुरु झालं होतं. मात्र काही दिवसानंतर हा विषय पुन्हा अडगळीत गेला आणि महिलांची होत असलेली कुचंबणा तशीच सुरु राहिली. मात्र आता पुन्हा एकदा मासिक पाळीचा विषय चर्चेला आला असून या काळात महिलांना एक दिवसाची पगारी रजा देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
 
मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी मिळावी का यावरुन सोशल मीडियावर चर्चासत्र सुरु झालं आहे. एकीकडे काही महिला ही अगदी योग्य असल्याचं सांगत असताना, काही मात्र विरोध करत आहेत. मासिक पाळीदरम्यान होणा-या वेदना अत्यंत असह्य असल्याने सुट्टी मिळालीच पाहिजे असं काहींच म्हणणं आहे. तर काहींच्या मते आजच्या जमान्यात स्त्री, पुरुष समानतेच्या बाता मारत असताना मग ही विशेष वागणूक कशाला हवी ?. प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करत असताना दुसरीकडे मासिक पाळीबद्दल अनेकजण काही गैरसमजाला बळी पडलेले दिसतात. 
 
मासिक पाळीबद्दल थोडक्यात माहिती - 
मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी थोडी अगोदरही सुरु होऊ शकते. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे महिलेला आई बनता येते. पण हेच चक्र बिघडले तर? पाळी मागे-पुढे झाली तर अनेकांना काळजी वाटते. पाळी उशिरा येण्यामागेही काही महत्वाची कारणे असतात. यामध्ये लठ्ठपणा, तणाव, वजन कमी होणे, प्रजनन नियंत्रण, थायरॉईड, गर्भधारणा या कारणांमुळे पाळी उशिरा येऊ शकते हे लक्षात घेतलं पाहिजे.
 
'कल्चर मशिन' नावाच्या कंपनीने केली सुट्टी जाहीर
मुंबईतील 'कल्चर मशिन' नावाच्या एका खासगी कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर केली आहे. डिजिटल कंपनी असणा-या  'कल्चर मशिन'मध्ये एकूण 75 महिला काम करतात. आपल्या महिला कर्मचा-यांसाठी कंपनीने हा निर्णय घेत पहिल्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी भरपगारी असणार आहे, त्यामुळे सुट्टी घेतल्यामुळे एक दिवसाचा पगार जाण्याची भीती नसणार आहे. 
 
आपल्या हा निर्णय जाहीर करण्याआधी कंपनीने महिला कर्मचा-यांना मासिक पाळीसंबंधी त्यांची मतं विचारली. सोबतच पहिल्या दिवशी सुट्टी किती गरजेची असते यासंबंधी प्रश्न विचारले. यासंबंधी व्हिडीओही शूट करण्यात आला. याचवेळी कंपनीने महिलांना आपण हा निर्णय लागू केल्याची माहिती दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या महिला कर्मचा-यांनी सर्व कंपन्यांनी हा निर्णय घ्यावा असं आवाहनही केलं आहे. 
 
शिवसेना नगरसेविकेचं पत्र 
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक ७च्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून केली आहे. याबाबतच्या ठरावाची सूचना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com