सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
दीप्ती
First Published: 15-July-2017 : 14:39:47

 - योजना यादव

पुणे मुक्कामात तिच्याशी झालेल्या गप्पांमधून दीप्ती थोडी थोडी उलगडली. हे उलगडणं इतकं अलवार, की अधिकच्या तपशिलाची  ओढ लागावी. ती सांगत होती तिच्याबद्दल.. तिचं आयुष्य, तिच्या भूमिका, तिचं त्यांच्याबरोबर जगणं आणि मग हात सोडून पुढे निघणं...
 
प्रेशनच्या खोल दरीत दिशाहीन तडफड सुरू असावी. दरीतल्या खडकांवर आपटून आत्मविश्वास वारंवार जखमी होत असावा. सारे मार्ग अंधुक. आशेवर झाकोळ साचलेला. आपल्या माणसांत, परिचित भोवतालातही परकेपण भरून राहिल्याची जाणीव तीव्र झालेली असताना एक आवाज कानावर पडावा.. संथ.. संयत.. प्रगल्भ.. आपल्यातल्या आपल्याला साद घालणारा.. त्यानं सांगावं,It doesn't matter if I have a role,  but I have a life..  कलासक्त जीवनात मधूनच येणारा ‘थांबा’ - ब्लॉकसाठीचं हे चपखल उत्तर आहे, दीप्ती नवलला सापडलेलं. दीप्तीचा हा मूलमंत्र फक्त सिनेसृष्टीतल्या मोजक्या लोकांसाठी नाही, तर समाजात, कुटुंबात आपापली भूमिका शोधणाऱ्या, ती वठवताना आयुष्य पणाला लावणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे. 
‘द मॅड तिबेटियन - गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या’ या दीप्तीच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउसने नुकताच प्रकाशित केला. त्यानिमित्ताने पुण्यात आलेल्या दीप्ती नवलला जवळून अनुभवता आलं. तेव्हा ती तमाच्या तळाशी तेवत असणाऱ्या नंदादीपासारखी वाटली. 
७० एमएमच्या पडद्यावर दीप्तीची जशी निरनिराळी रूपं दिसतात, तशीच ती तिच्या प्रत्यक्ष आयुष्यात दिसतात. ती अभिनेत्री आहेच, पण डोळ्यांतून उतरणाऱ्या अभिव्यक्तीसोबतच इतर माध्यमांवरही तिची हुकूमत आहे. कधी कॅनव्हास.. कधी पेपर.. तर कधी रुपेरी पडदा. आत्मकेंद्री मंथनाचे पडदे दूर करून ती आतली खळबळ अभिव्यक्त करत राहते. त्या खळबळीचं स्वरूपच तिचं व्यक्त होण्याचं माध्यम ठरवतं, असं ती स्वत:च स्पष्ट करते. 
या पुणे मुक्कामात तिच्याशी झालेल्या गप्पांमधून दीप्ती थोडी थोडी उलगडली. हे उलगडणं इतकं अलवार, की अधिकच्या तपशिलाची ओढ लागावी.
ती सांगत होती तिच्याबद्दल.. तिचं आयुष्य, तिच्या भूमिका, तिचं त्यांच्याबरोबर जगणं आणि मग हात सोडून पुढे निघणं...
चष्मेबद्दूरमधली नेहा राजन, अंगूरमधली तनू, कथामधली संध्या सबनीस किंवा कमला.. व्यक्तिरेखांच्या भिन्न छटांचं ती पडद्यावर सहजसुंदर आरेखन साकारते. या सहजतेतल्या कौशल्याचे धागे तिच्या विलक्षण निरीक्षण क्षमतेत लपले आहेत. अमृतसरच्या रस्त्यावरची पात्रं असोत की आसपासच्या बायांची देहबोली.. पाहताक्षणी भेटणारा प्रत्येक माणूस जणू दीप्तीच्या मनातल्या स्कॅनरवर प्रिंट होतो. ती तिच्यासाठी एखाद्या भूमिकेच्या तयारीची प्रक्रि या असते. कॅमेरा रोल झाला की ही पात्रं उत्स्फूर्तपणे तिच्यात उतरतात. म्हणूनच तिचा रिटेकवर विश्वास नाही. ती उत्स्फूर्तता हरवू नये, यासाठी तिला अभिनयाची तालीमही नकोशी वाटते.
तांत्रिक गोष्टींचा सराव शक्य आहे, पण निर्मितीच्या तीव्र भावनिक आविष्कारांना सरावानं तांत्रिक करणं तिला नकोसं वाटतं. तिला मेथड अ‍ॅक्टिंगच्या संकल्पनांपेक्षा स्वत:चे उत्स्फूर्त आविष्कार महत्त्वाचे वाटतात. रोजच्या जगण्यातून भरलेली अनुभवांची पोतडी महत्त्वाची वाटते. अशावेळी गुलजारांचं तिच्याविषयीचं निरीक्षण तंतोतंत वाटतं. ते म्हणतात, ‘दीप्ती एक क्षण दोनदा जगते. एकदा ती प्रत्यक्ष जगते तो क्षण आणि दुसऱ्यांदा त्या अनुभवाचं सार तिच्या कलेतून अभिव्यक्त होतं तो क्षण. कदाचित म्हणूनच तिचा पहिला टेक कायम दुसरा टेक असतो.’
सिनेसृष्टीतल्या प्रवेशाच्या संघर्षाचं उदात्तीकरण नेहमीच पाहायला मिळतं. पण दीप्ती नवलच्या संघर्षाची जातकुळी ही अस्सल कलावंताची आहे. निव्वळ बँक बॅलन्स वाढवणाऱ्या भूमिकांपेक्षा स्वत:ला समृद्ध करणाऱ्या भूमिका कमी झाल्या, तेव्हा तिनं गुणवत्तेतल्या तडजोडीपेक्षा स्वत:च्या गरजांना कात्री लावणं पसंत केलं. 
दीप्ती नवलचे वडील लेखक आणि आई चित्रकार. त्यामुळं कलेची गुणसूत्रं तिच्या रक्तातच भिनलेली. डायनिंग टेबलवर बसून आईनं दिलेले कॅनव्हासचे धडेही ती गिरवते. आणि वडिलांच्या शाब्दिक वारशालाही न्याय देते. पण तिचं व्यक्त होणं स्वतंत्र आणि स्वत:च्या अनुभवविश्वाशीच सलगी साधणारं आहे. त्या कलासक्त जगण्याला खतपाणी घालणंच तिच्या आयुष्याचं ध्येय आहे. अगदी मृत्यूच्या कल्पनेतही तिच्या फॅण्टसीतला रोमान्स अचंबित करतो. ती म्हणते,
 
Will you do something for me?
When I die,
Will you bury the cloud 
with me?
हीच संवेदनशीलता ‘द मॅड तिबेटियन’च्या पानापानांत दिसते. हे पुस्तक जणू तिच्या अनुभवांच्या तुकड्यांचा कोलाज आहे. ‘पियानो ट्युनर’ कथेतला बाटलीबॉय एकेकाळचा पियानोवादक. पण कालोघात पडलेलं परिस्थितीचं ओझं पेलतानाचा त्याचा संघर्ष असह्य हुरहुर लावून जातो. 
दीप्तीच्या एका मैत्रिणीनं तिला दोन ओळीत सांगितलेली एक गोष्ट ‘दोन बहिणी’ या कथेत नवं रूप घेऊन भेटते, तेव्हा दीप्तीचं व्यक्तिरेखा जगण्याचं अभिनयकौशल्य तिच्या लेखनासाठीही समर्पक असल्याचं जाणवतं. 
सिनेमाच्या ओढीनं मुंबई गाठणाऱ्यांना दिसणारं या शहराचं भयाण रूप ‘मुंबई सेंट्रल’ या कथेत दिसतं. मुंबई म्हटलं की स्वत: दीप्तीलाही केआॅस- कलकलाट हाच शब्द आठवतो. अर्थात इथल्या जगण्याच्या नानारंगी छटा ती नाकारत नाही. पण हिमालयाच्या कुशीतली शांतता तिला अधिक प्रिय आहे. 
हिमाचल प्रदेशचं नाव उच्चारलं तरी तिच्या डोळ्यांत चमक जाणवते, जी तिच्या चित्रांमधूनही भेटते.
ती जणू तुम्हाला तिथं येण्याचं आवतण देत असते. अस्तित्वाला आव्हान देणारा आणि असुरक्षिततेच्या झुल्यावर हिंदोळत ठेवणारा हिमालय तिला तिचा सखा वाटतो. रंग आणि शब्दाच्या माध्यमातून त्याच्यासोबत तिचा शृंगार नटतो. पण बर्फानं वेढलेले घाटमाथे तिच्यातल्या ट्रेकरलाही साद घालत राहतात. तिच्या चेहऱ्यावर तिच्या कवितेतले शब्द दिसू लागतात. आणि तेंडुलकर म्हणत त्याप्रमाणे ती शब्दाविना बोलत राहते.
 
निसर्गाने त्या-त्या जागी तुमची खास योजना केली असावी अशा काही घटना आयुष्यात घडत असतात. दीप्ती नवलची भेट खरंतर माझ्यासाठी अशीच होती, असावी.
कम्फर्ट झोनमधनं स्वत:ला बाहेर काढून प्रगल्भ होण्याच्या वाटा शोधणाऱ्या कुणालाही दीप्तीसारखी गुरू मिळणं मोलाचंच वाटेल.
 
सततच्या विमान प्रवासानं आलेली गुंगी शरीरात भिनलेली असताना आणि सलग पाच-सहा रात्रींची झोपेची उणीव बाकी असताना १९८६ सालच्या पंचवटी सिनेमाची जुनी प्रिंट मिळाली म्हणून दीप्ती रात्री अकराला तीन तासांचा सिनेमा पाहायला बसली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं पूर्ण रिकामं नितांतसुंदर थिएटर.. थिएटरच्या मागच्या व्हीआयपी सीटवर बरोबर मध्यभागी आम्ही दोघी. स्क्रीनवर तिच्या लाडक्या बासूदांनी दिग्दर्शित केलेला पंचवटी. 
 
...कधी तिला रिळच्या दुरवस्थेमुळं भरून यायचं, तर कधी नॉस्टेलियाजानं गहिवरून यायचं. पण यातल्या दोन्ही भावना निव्वळ तात्पुरता भावनिक आवेग नव्हत्या किंवा वांझ संवेदनेचा आविष्कारही नव्हत्या. थिएटरमधनं बाहेर पडता पडताच तिनं पंचवटी पुन्हा एडिट करण्याचा मनोदय केला होता. सिनेमा कुठे कसा छाटला जायला हवा, त्यातल्या कोणत्या गोष्टी अधोरेखित व्हायला हव्यात, या प्रश्नांनी तिला घेरलं होतं... आणि त्याक्षणी तिनं त्या उत्तरशोधाच्या प्रक्रि येला सुरुवातही केली होती. 
एकीकडं समोरच्या पडद्यावर ती ‘पंचवटी’तली वीस-तिशीतली नाजूक नेपाळी पेंटर होती, तर दुसरीकडे ६५ वर्षांची अनुभवसंपन्न दिग्दर्शक! पडद्यावरची चाळिशी ओलांडता ओलांडता तिच्यात वस्तीला आलेली कलेची समृद्धी मी अवाक् होऊन पाहत होते. 
 
२९ वर्षांच्या पडद्यावरच्या दीप्ती नवलला ६५ वर्षांची प्रत्यक्षातली दीप्ती नवल न्याहाळणं हा एक विलक्षण अनुभव होता. पण ते न्याहाळणं हरवलेल्या तारुण्याचा पाठलाग करण्याच्या प्रकारातलं नव्हतं, तर आपल्या हातात आपलं काम जतन करण्याचं माध्यम आहे आणि त्याचा वापर व्हायला हवा, या तळमळीतून आलेलं होतं. 
 
दीप्ती नवलला अनुभवताना कित्येक समकालीन चेहरे नजरेसमोरून जात राहिले. त्यातले कित्येक चेहरे प्रकाशझोतात राहण्यासाठी उपद्व्याप करणारे.. पण दीप्ती नवल काजव्यासारखी अंधाऱ्या रात्री स्वत:चा प्रकाश स्वत:सोबत घेऊन फिरणारी आहे. स्वयंप्रेरित आहे. खरंच दीप्ती आहे...
(लेखिका मेहता पब्लिशिंग हाउसमध्ये संपादक आहेत. yojananil@gmail.com )
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com