शनिवार २४ जून २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर : रुग्णसेवा हेच ध्येय
First Published: 15-April-2017 : 16:19:03

डॉ. सदानंद सरदेशमुख

नवी पहाट
आयुर्वेदात डॉक्टरेट संपादन करणारे पहिले महाराष्ट्रीयन. संशोधन व चिकित्सक वृत्तीतून १९९४ मध्ये कॅन्सर संशोधनाची सुरुवात केली. आयुर्वेदातील उपचार आणि आधुनिक वैद्यकातील तंत्रज्ञान यांच्या मिलाफातून कॅन्सरग्रस्तांना दिलासा देणारी वाट डॉ. सरदेशमुख यांनी शोधली. रेडिएशन आणि केमोथेरपी या आधुनिक वैद्यकातील उपचारांचे साइड इफेक्ट््सच्या रूपात दिसणारे दुष्परिणाम आयुर्वेदाच्या उपचाराद्वारे कमी करता येतील का, अशा रुग्णांचे जीवनमान सुसह्य करता येईल का आणि प्रचलित उपचार घेतानाच त्यांची प्रतिकारशक्ती वाढविता येईल का, या त्रिसूत्रीच्या भोवती डॉ. सरदेशमुख यांनी त्यांचे संशोधन बेतले. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे त्यासाठी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अद्ययावत संशोधन केंद्र उभे केले. मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात या प्रयोगाचा विस्तार केला. आजवर त्यांनी तब्बल दहा हजार कॅन्सरग्रस्तांवर उपचार केले आहेत. मुख्य म्हणजे या रुग्णांना झालेल्या लाभाचे पॅथॅलॉजीच्या अंगाने डॉक्युमेंटेशन करून ठेवले आहे. एकाच छताखाली आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद यांचे एकत्रित उपचार करण्यासाठी डॉ. सरदेशमुख यांनी वाघोलीत इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट प्रकल्प सुरू केला. उपचारांच्या संदर्भात पॅथी कोणती याचा दुराग्रह न ठेवता दोन उपचार पद्धतींचा सुयोग्य मिलाफ करण्याच्या या दृष्टीला यथावकाश पाठबळही मिळाले. डॉ. सरदेशमुख संकोची स्वभावामुळे आपल्या कामाविषयी कमी बोलतात. पण कॅन्सर, एड््स यासारख्या रोगांचा सक्षम प्रतिकार करण्यात आयुर्वेदाचे वेगळ्या पद्धतीने योगदान देण्याचे मोलाचे काम त्यांच्या संशोधनातून झाले आहे.
 
 
डॉ. आनंद देवधर
धडधड
मराठवाड्यात अवयवदान चळवळ, मुंबईबाहेर औरंगाबादेत पहिली हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया, नावीन्यता आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हृदयरोपण क्षेत्रात मोठी भर घालणारे द्रष्टे हृदयरोगतज्ज्ञ. पंचवीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावणारे डॉ. आनंद देवधर यांनी हृदयरोगतज्ज्ञ म्हणून मराठवाड्यात ओळख बनवली आहे. दात्याचे अवयव देशातील इतर शहरात घेऊन जाण्याऐवजी औरंगाबादेतच अवयव प्रत्यारोपण करण्याचा पायंडा डॉ. आनंद देवधर यांनी पाडला. मुंबईबाहेर हृदयाच्या प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया औरंगाबादेत करण्यात आली. आतापर्यंत त्यांनी तब्बल ५५०० पेक्षा अधिक हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. ब्रिटनमध्ये वैद्यकीय क्षेत्रासंबंधी तांत्रिक शिक्षणही त्यांनी घेतले. वैद्यकीय सेवा करत असताना ६ महिन्याच्या बाळापासून ते ९४ वर्षांपर्यंतच्या वृद्धांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केल्या. नांदेड, लातूर या शहरांमध्येही त्यांची नियमितपणे हृदयरुग्णसेवा सुरू आहे. सामाजिक दायित्व म्हणून हृदयदानाची चळवळ त्यांनी सुरू केली. त्यांच्या या प्रयत्नांनाही चांगलेच यश मिळत आहे. गेल्या सुमारे वर्षभरात मराठवाड्यातल्या १४ जणांनी हृदयदान करण्यास संमती दर्शविली आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असताना डॉ. आनंद देवधर यांनी एमएसमध्ये विद्यापीठाचे पदक पटकावले. मुंबई विद्यापीठानेही गुणवत्ता शिष्यवृत्ती त्यांना मंजूर केली होती. वैद्यकीय पेशासोबतच गिर्यारोहणाची आवडही देवधर यांनी जोपासली आहे. मनालीच्या गिर्यारोहण संस्थेचा बेसिक कोर्स तर त्यांनी पूर्ण केला आहेच, याशिवाय हिमालयातील अनेक शिखरेही त्यांनी पादाक्रांत केली आहेत.
 
 
डॉ. सुलतान प्रधान
कर्करोगग्रस्तांचा आधार
 
शरद पवारांसारख्या मातब्बर व्यक्तिमत्त्वावर उपचार करणारे आणि ग्रामीण भागातील तळागाळात आरोग्यसेवेची मुळं रोवणारे वैद्यकीय व्यावसायिक ही डॉ. प्रदान यांची संक्षिप्त ओळख. वेगळ्या भाषेत सांगायचे तर कर्करोगासारख्या आजाराशी दोन हात करण्यासाठी रुग्णांचा आधार बनलेले डॉक्टर, ही त्यांची सर्वदूर पसरलेली कीर्ती. देशातील कर्करोगतज्ज्ञांच्या मांदियाळीत आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुलतान प्रधान हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. सध्या मुंबईतील ब्रीचकॅण्डी, प्रिन्स अली खान आणि हिंदुजा रुग्णालयात ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात गळा आणि डोक्याच्या कर्करोग विभागाचे ते प्रमुखही आहेत. देशभरातील तरुणाईत वाढत्या मुखकर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉ. प्रधान यांनी माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयात १९९४ साली वेगळी संस्था सुरू केली. कर्करोगाविषयी सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने डॉ. प्रधान जगभरात विविध स्तरांवर जनजागृती शिबिरे आणि कार्यशाळा घेत असतात. स्वित्झर्लंड येथील लॉसेन विद्यापीठात 
डॉ. प्रधान यांनी भारतातील कर्करोग संशोधनावरील कार्याचे सादरीकरण केले आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा-सुविधा सुधाराव्यात अशी आकांक्षा बाळगून त्यासाठी डॉ. प्रधान काम करीत आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. प्रधान यांना २००९ साली क्विम्प्रो प्लॅटिनम स्टँडर्ड या सन्मानाने गौरविण्यात आले.
 
 
दृष्टिदूत
डॉ. तात्याराव लहाने
 
१९९५ साली डॉ. लहाने यांची एक किडनी निकामी झाली. किडनी मिळाली नाही तर पुढचे आयुष्य अंधारमय होते. त्यावेळी त्यांची स्वत:ची आई त्यांच्यासाठी धावून आली आणि तिने आपल्या मुलाला किडनी दिली. आईच्या एका किडनीमुळे आपल्याला नवीन आयुष्य मिळाले आहे, आता हे आयुष्य दुसऱ्यांसाठी आपण जगायला हवे या ध्येयाने डॉ. लहाने यांचा प्रवास सुरू झाला. जे. जे. रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख म्हणून ते काम पाहत होते. ११ फेब्रुवारी २०१० रोजी त्यांनी जे.जे.चे डीन म्हणून काम सुरू केले. प्रथितयश रुग्ण सहसा उपचारासाठी सरकारी रुग्णालयांत जात नाहीत. पण डॉ. लहाने यांची ख्याती अशी की, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून छोट्यातल्या छोट्या खेड्यातल्या अतिसामान्य माणसालाही आपले डोळे डॉ. लहाने यांनीच तपासावेत असे वाटू लागले. आजपर्यंत त्यांनी जवळपास २५ लाख रुग्णांचे डोळे तपासले, १,४५,००० हून अधिक नेत्र शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे पद्मश्रीसह १०० हून अधिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. अनेक शहरांमध्ये डोळ्यांच्या तपासणीची तब्बल ५५९ शिबिरं त्यांनी घेतली. त्यांच्याच प्रयत्नांतून जे. जे. रुग्णालयाला स्वच्छतेत राज्यात पहिला क्रमांक, तर जे. जे. मेडिकल कॉलेजला अखिल भारतीय स्तरावर पाचवा क्रमांक मिळाला. जे.जे.मध्ये पूर्वी बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) सरासरी चार लाख ९० हजार रुग्ण तपासले जात. ती संख्या आता ९,७०,००० हजाराच्या घरात गेली आहे. शस्त्रक्रियांची संख्याही १६ हजारांवरून ३७ हजारांवर गेली आहे. दृष्टिदूत म्हणून डॉ. लहाने यांचे काम अलौकिक आहे.
 
 
 
 
डॉ. चंद्रशेखर मेश्राम
निःस्वार्थ सेवा
आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ आणि समर्पित भावनेने सेवा करणारा समर्पित डॉक्टर म्हणून डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना ओळखले जाते. आरोग्याच्या संदर्भातील त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांनीही रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यसेवेच्या संदर्भातील ‘ब्रेन विक’ मोहिमेचे गेल्या दोन वर्षांपासून डॉ. मेश्राम राष्ट्रीय संयोजक आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून देशात विविध उपक्रम राबविले गेले आहेत. गेल्या ११ वर्षांपासून नागपुरात निरंतर वैद्यकीय शिक्षणाचा उपक्रमही डॉ. मेश्राम राबवित आहेत. त्यासाठी रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे आणि बैठकांच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. आरोग्य सेवेसाठी डॉ. कोटणीस आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ते कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट व नागपुरातील बे्रन अ‍ॅण्ड माइंड इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून पदवी, मेडिसीनमध्ये पदव्युत्तर पदवी आणि चंदीगड येथील प्रतिष्ठेच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेतून न्यूरोलॉजीमध्ये डी.एम. पदवी त्यांनी मिळविली. इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजीचे अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारी समिती सदस्यपद त्यांनी भूषविले आहे. नागपुरात २००४ मध्ये झालेल्या बाराव्या इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजीच्या वार्षिक परिषदेचे सचिव आणि महाराष्ट्र असोसिएशन आॅफ न्यूरोलॉजीचे ते अध्यक्ष होते. डॉ. मेश्राम हे नागपूर न्यूरो सोसायटीचे संस्थापक सदस्य असून, या सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
 

 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com