शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> मनोरंजन >> स्टोरी
चांगल्या कादंबरीची कमजोर कथा ‘हाफ गर्लफ्रेंड’
First Published: 20-May-2017 : 04:14:46

- सतीश डोंगरे

हिंदी चित्रपट - हाफ गर्लफ्रेण्ड

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची कथा पडद्यावर बघण्यापेक्षा वाचायलाच अधिक आवडेल. कारण चित्रपटाचे संगीत सोडता एकंदरीतच संपूर्ण कथा खूपच ताणली गेली असल्याचे क्षणोक्षणी जाणवते. त्याचबरोबर, चेतन भगत यांच्या प्रत्येक कादंबरीवर चित्रपट बनविला जाऊ शकत नाही, हेही यानिमित्त अधोरेखित होते. कारण चेतन भगत यांच्या कादंबऱ्यांवर आलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांचा दर्जा पाहता, ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट प्रेक्षकांची काहीशी निराशा करणारा ठरतो.

चित्रपटाची कथा बिहारमध्ये राहणाऱ्या माधव झा (अर्जुन कपूर) आणि दिल्लीची रिया सोमानी (श्रद्धा कपूर) यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. दोघांची भेट दिल्लीच्या सेंट स्टिफेंस कॉलेजच्या बास्केटबॉल मैदानावर होत असते. दोघांनाही बास्केटबॉल या खेळाची आवड असल्याने त्यांच्यात जवळीकता निर्माण होते. ‘हसी तो फसी’ या फॉर्म्युल्यानुसार त्यांच्यात प्रेम बहरत जाते. मात्र, माधव हा इंग्रजीत कच्चा अन् रियाची संपूर्ण लाइफस्टाईल हायप्रोफाइल असल्याने त्यांच्यातील नाते फार काळ टिकणार नाही, याची शंका त्याच्या मित्रांना येते. बहुधा कालांतराने माधवलाही त्याची जाणीव होते, म्हणून तो धाडस करून रियाला त्यांच्यातील नात्याचे नेमके नाव काय? असा प्रश्न करतो. त्यावर रिया त्याला त्याची ‘हाफ गर्लफ्रेंड’ असल्याचे सांगते.

परंतु ही बाब माधवच्या मित्रांना पटत नाही. ते माधवला रियाशी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देतात. माधव तसा प्रयत्नही करतो, परंतु रियाला ही बाब अजिबात पचनी पडत नाही. ती माधवला विरोध करून त्याच्यापासून दूर जाते. मात्र, माधव तिला विसरू शकत नाही. एके दिवशी रिया माधवला तिच्या लग्नाची पत्रिका देते अन् येथूनच कथेत टिष्ट्वस्ट निर्माण होतो. माधवही रियाच्या आठवणी विसरू शकत नसल्याने त्याच्या डुमरिया या गावी निघून जातो. त्या ठिकाणी त्याची आई शिक्षिका असलेल्या शाळेत शौचालय नसल्याने मुलींना प्रवेश दिला जात नाही, ही बाब त्याला खटकते. तो गावातील एका नेत्याच्या मदतीने बिल गेट्स फाउंडेशनशी जोडला जातो. याच कामासंदर्भात जेव्हा तो पटणा येथे येतो, तेव्हा त्याची भेट पुन्हा रियाशी होते. रियाचा घटस्फोट झालेला असतो. मात्र, दोघांमधील प्रेमांकुर कायम असतो. जेव्हा तो तिला त्याच्या गावी घेऊन येतो, तेव्हा त्याच्या आईला रिया फारशी आवडत नाही. ही बाब रियाच्या लक्षात येते, त्यामुळे ब्लड कॅन्सर असल्याचे सांगून रिया न्यूयॉर्कला निघून जाते, परंतु माधव तिला विसरू शकत नाही, तोही तिला शोधण्यासाठी न्यूयॉर्कला जातो. पुढे काय होते, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच.

एकंदरीतच चित्रपटाची कथा अखेरपर्यंत विनाकारण ताणली जात असल्याचे जाणवते. ही बाब चेतन भगत यांच्या ‘टू स्टेट्स’ आणि ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांमध्ये अजिबात जाणवत नाही, शिवाय चित्रपटातील संवादही खूपच कमजोर असल्याचे दिसून येते. अर्जुन कपूर याच्या तोंडून बिहारी भाषा अजिबात ऐकाविशी वाटत नाही. वास्तविक, कुठलाही रोमँटिक चित्रपट बघताना, त्यामध्ये हरवून जावेसे वाटते, परंतु या चित्रपटाबाबत तसे होत नाही. कारण चित्रपटातील पात्र नेमके काय करू इच्छितात, हेच समजतच नाही, तसेच फ्लॅशबॅकमध्ये कथा सांगितली जात असल्याने, प्रेक्षकांचा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

चित्रपटाच्या सकारात्मक बाबी सांगायच्या झाल्यास श्रद्धा कपूर हिचा दमदार अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अर्जुन कपूरनेही पूर्ण ताकदीनिशी अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे संगीत दमदार असून, ‘फिर भी तुमको चाहूंगा’ हे गाणे अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या स्मरणात राहते. वास्तविक, दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या सर्वच चित्रपटांची ताकद संगीत राहिले आहे. ते या चित्रपटात स्पष्टपणे दिसून येते. मोहित आणि अरजित सिंग यांचा आवाज सुखावणारा आहे. शिवाय काही ठिकाणचे भावनिक प्रसंगही प्रेक्षकांना पडद्याकडे एकटक बघण्यास भाग पाडतात, तसेच भावनिक प्रसंगांच्या क्षणी केलेली हलकीफुलकी कॉमेडी प्रेक्षकांचे

हास्य खुलवते. एकंदरीतच तुम्ही प्रेमकथेवर आधारित चित्रपटांचे चाहते असाल, तर हा चित्रपट बघायला हरकत नाही.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com