सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> राष्ट्रीय >> स्टोरी
रामनाथ कोविंदांचे पारडे जड
First Published: 17-July-2017 : 20:43:59

सुरेश भटेवरा

नवी दिल्ली, दि. 17 : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी संसद भवनात मतदान झाले. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि युपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे. उद्या दिल्लीत तमाम राज्यातल्या मतपेट्यांचे आगमन होईल व निवडणुकीची मतमोजणी २0 जुलैला संपन्न होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाल २४ जुलै रोजी संपतो आहे. त्यापूर्वी २0 जुलै रोजीच नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे नाव जाहीर होईल. एकुण मतदानापैकी एनडीएकडे ६३ टक्के मतांचे पाठबळ असल्याने रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.

संसद भवनात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. पंतप्रधान मोदी संसद भवनात मतदानासाठी वेळेपूर्वीच उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुजराथ विधानसभेत अहमदाबादच्या नारणपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनीही संसद भवनात मतदान केले. या केंद्रावर मतदान करणाऱ्यांमधे प्रामुख्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती आदींचा समावेश होता. खासदार अभिनेता परेश रावल व हेमामालिनी यांनीही संसद भवनात मतदान केले. मतदान केंद्रावर खासदारांसाठी हिरव्या रंगाच्या तर आमदारांसाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिका होत्या.

आणखी वाचा 
 
कोविंद यांचे पारडे जड, मतांचे गणित ‘रालोआ’ उमेदवाराच्या बाजूने
रामनाथ कोविंद यांचा विजय सहज शक्य!
...म्हणून वरिष्ठ मंत्र्यांना डावलून मोदींनी रामनाथ कोविंद यांना दिली पसंती

 

देशाचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी दिवसभर देशाच्या ३१ विधानसभांमधे मतदान झाले. हाती आलेल्या माहितीनुसार त्रिपुरा, उत्तरप्रदेश व गुजराथमधे क्रॉस व्होटिंग झाले. त्रिपुरात पक्षाचा आदेश झुगारून तृणमूलच्या ६ व काँग्रेसच्या १ बंडखोराने रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे समजते. उत्तरप्रदेशात मुलायमसिंगांचे बंधू शिवपाल यादव यांच्या दाव्यानुसार समाजवादी पक्षातल्या सुमारे १0 आमदारांनी कोविंद यांना मतदान केले तर गुजराथमधे भाजपचे बंडखोर आमदार नलिन कोटडिया यांनी मीराकुमारांना मतदान केल्याचे समजले. देशात राजस्थान एकमेव असे राज्य आहे, जिथे ३ तास अगोदर मतदान समाप्त झाले. महाराष्ट्रात २ तर झारखंडात ४ आमदारांना तुरूंगातून मतदानासाठी आणले गेले.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी एकुण मतदानाच्या ५0 टक्यांहून अधिक मते हवीत. एनडीएकडे स्वत:चे ४८ टक्के मतदान आहे. याखेरीज ६ विरोधी पक्षांसह ज्या १६ पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांचे मतदान १५ टक्के आहे. अशाप्रकारे रामनाथ कोविंद यांच्याकडे ६३ टक्के मतदानाचे पाठबळ असल्याने, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com