सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मुंबई >> स्टोरी
एसटी स्टँडवरही एक रुपयात उपचार
First Published: 17-July-2017 : 02:51:03

स्नेहा मोरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रेल्वे स्थानकांवरील ‘वन रुपी क्लिनिक’च्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘मेट्रो’ व्यवस्थापनानेही अशा प्रकारे सेवा देण्याचे ठरवले आहे, त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. आता ही सेवा लवकरच राज्यातील प्रमुख एसटी स्टँडवरही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेलाही सहज आणि परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

राज्यातील प्रमुख एसटी स्टँडवर सुरू करण्यात येणाऱ्या ‘वन रुपी क्लिनिक’मध्ये रात्रंदिवस एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर्स उपस्थित असतील. या क्लिनिकमध्ये बाह्य रुग्ण विभाग, पूर्ण बॉडी चेकअप, रक्त तपासण्या, वैद्यकीय समुपदेशन, रुग्ण जनजागृती कार्यशाळा, हृदय-रक्तदाब-मधुमेह- कर्करोग यांसाठी विशेष विभाग, आपत्कालीन विभाग अशा विविध सेवा रुग्णांना पुरविण्यात येतील.

एसटी स्टँडवरही अशी सेवा सुरू करण्याचा विचार ‘वन रुपी क्लिनिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी केला. याविषयी परिवहनमंत्री रावते यांच्यासोबत बैठकही झाली. त्या वेळी याचा ग्रामीण जनतेला उपयोग होईल, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केल्याचे डॉ. घुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राज्यातील प्रमुख एसटी स्टँडवर या संकल्पनेची लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे ते म्हणाले.

दीड महिन्यात १३ हजार रुग्ण-

दीड महिन्यात रेल्वे स्थानकांवरील वन रुपी क्लिनिकमध्ये सुमारे १३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. मुंबईतील भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, कळवा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वडाळा रोड, पनवेल, शीव, टिटवाळा, गोवंडी, चेंबूर आणि मानखुर्द या रेल्वे स्थानकांवर ही सेवा आहे.

मिस कॉलद्वारे घरबसल्या सुविधा-

वन रुपी क्लिनिकची सेवा घरपोचही मिळत आहे. त्यासाठी ०८०३०६३६१६१ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू आहे. या क्रमांकावर मिस कॉल केला असता आॅपरेटर रुग्णाशी संपर्क करतो. त्यानंतर रुग्णाचा पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती घेऊन जवळच्या वन रुपी क्लिनिकमधील डॉक्टर व परिचारिका अशी टीम रुग्णापर्यंत पोहोचते.

वैद्यकीय चाचण्या निम्म्या किमतीत-

‘वन रुपी क्लिनिक’मध्ये वैद्यकीय चाचण्याही निम्म्या किमतीत करण्यात येणार आहेत. उदाहरणार्थ; हिमोग्लोबीनची चाचणी इतरत्र २५० रुपयांत केली जाते, तीच या क्लिनिकमध्ये अवघ्या ८० रुपयांत उपलब्ध आहे. तसेच फूल बॉडी चेकअपचे शुल्क इतर ठिकाणी १८०० असून या क्लिनिकमध्ये केवळ ८०० रुपये आकारले जातात.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com