शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> मुंबई >> स्टोरी
उंच माझा फोटो ! मिलिंद नार्वेकरांची 'उंची' उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त
First Published: 19-May-2017 : 12:12:00
Last Updated at: 19-May-2017 : 12:12:59
 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - शिवसेना म्हटलं की सर्वात पहिलं नाव समोर येतं ते बाळासाहेब ठाकरेंचं. शिवसैनिकही बाळासाहेबांना आपलं दैवत मानतात. म्हणजे पक्षात बाळासाहेबांपेक्षा मोठं कोणीच नाही असा अलिखीत नियम आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पद घेतलं नाही. शिवसेनेचा हा अलिखित नियम होर्डिंग, जाहिरातींच्या माध्यमातून अनेकदा दिसत असतो. पत्रकापासून ते होर्डिंगपर्यंत सगळीकडे सर्वात मोठा फोटो असतो बाळासाहेबांचा, त्याखालोखाल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे...आता हे सर्वांना ठाऊक असेलच. पण याच गोष्टीमुळे सध्या अनेक शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांची 'उंची' बाळासाहेबांपेक्षाही वाढली आहे. 
 
गुरुवारी काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये मिलिंद नार्वेकर यांचा फोटो बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंपेक्षाही मोठा असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  मिलिंद नार्वेकर यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यातर्फे वर्तमानपत्रांत जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीमध्ये मिलिंद नार्वेकर यांचा फोटो सगळ्यात उंच आणि मोठा आहे.  फोटोच्या उंचीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे. फोटोच्या निमित्ताने मिलिंद नार्वेकर आपली राजकीय उंची वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. 
 
काहीजण मात्र यामध्ये वाद होण्यासारखं काहीच नसल्याचं सांगत आहेत. म्हणजेच एखाद्या निवडणुकीत उमेदवाराचा फोटो पक्षश्रेष्ठींपेक्षा मोठा असल्यास इतकं आश्चर्य वाटत नाही, त्याचप्रमाणे त्यांचा वाढदिवस असल्याने फोटो मोठा आहे असा युक्तिवाद केला जात आहे. पण शिवसेनेत याआधी असं कधीच न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पीए म्हणून मिलिंद नार्वेकरांची ओळख असली तरी इतर पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पक्षातील त्यांचं वजन वाढत असल्याची कल्पना तेव्हाच आली होती जेव्हा   गणेश चतुर्थीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेले होते. 

आता फोटोची उंची उद्धव ठाकरेंपेक्षाही मोठं असण्यामागे काही गडबड आहे की हा निव्वळ योगायोग आहे हे येणारी वेळच सांगेल.  

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर coming inside
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com