सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> मुंबई >> स्टोरी
बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार
First Published: 21-April-2017 : 01:06:55

मुंबई : बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला. अनेक वर्षांपासून प्रलंबित या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नायगाव व ना.म. जोशी मार्गावरील वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा शनिवारी पार पडणार आहे.

मुंबईत एकूण २०७ बी.डी.डी. चाळी आहेत. डिलाईल रोड, वरळी, नायगाव, शिवडी येथे ९२ एकर जागेवर २०७ चाळी आहेत. यापैकी वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड येथील १९५ चाळींचा पुनर्विकास होत आहे. तर, शिवडी येथील चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने त्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दोन आठवड्यांत बीडीडी चाळींच्या भूमिपूजनाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. सध्या १६० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या चाळकऱ्यांना पुनर्विकासात ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. डिलाईल रोड येथील चाळींचा विकास शापूरजी अ‍ॅण्ड पालोनजी तर नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास एल अ‍ॅण्ड टी या कंपनीमार्फत केला जाणार आहे.

वरळी येथील प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून, लवकरच कंपनीच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, आमदार सुनील शिंदे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com