बुधवार २८ जून २०१७

Menu

होम >> मुंबई >> स्टोरी
सागरमाला प्रकल्प पूर्ण करा
First Published: 21-March-2017 : 03:52:00

मुंबई : सागरमाला प्रकल्पाच्या राज्य समन्वय समितीची पहिली बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या योजनेंतर्गतच्या प्रकल्पांचा आढावा घेऊन प्रकल्पांतर्गत करण्यात येणारी कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी बंदरे विभागाचे राज्यमंत्री तथा सागरमाला राज्य समन्वय समितीचे उपाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सागरमाला प्रकल्पाअंतर्गत रोरो सेवा सुरू करण्यासाठी तवसाळ, जयगड, दाभोळ, धोपवे, वेसवी, बागमांडला, आगारदांडा व दिघी येथे जट्टी उभारण्यास सुमारे ४३.७५ कोटींच्या खर्चास मान्यता मिळाली. या प्रकल्पाअंतर्गत नारंगी (विरार) ते खारवाडेश्वरी, पालघर (१९.६७ कोटी), भार्इंदर ते वसई (२०.८९ कोटी), मारवे ते मनोरी (११.८९ कोटी), मांडवा येथील फेरी जेट्टी (१३५.५८ कोटी), मालवण येथील पॅसेंजर जेट्टी (१०.२३ कोटी) हे प्रकल्प मंजूर झाले आहेत. तसेच मुंबईतील फेरी जेट्टी ते धरमतर दरम्यान आणि कारंजा (उरण) ते रेवास (ता. अलिबाग) दरम्यान रोरो सेवा सुरू करणे, जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम, नेव्हिगेशन चॅनल तयार करणे व ३५ पॅसेंजर जेट्टीसाठी ड्रेजिंग आदी कामेही प्रस्तावित आहेत.

भविष्यात या प्रकल्पांतर्गत राज्यात सागरी आर्थिक विकास क्षेत्र तयार केले जाणार आहे. यामध्ये उत्तर कोकण (मुंबई, ठाणे, रायगड) व दक्षिण कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) असे दोन विभाग केले जाणार आहेत. यात क्रुझ पर्यटन व मुंबई गोवा फेरी सेवेसाठी पॅसेंजर टर्मिनल, तसेच या टर्मिनलला जोडणारे रस्ते निर्माण करणे आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com