सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
गोमांस बाळगल्या प्रकरणी सलीम शहाला जामीन मंजूर
First Published: 17-July-2017 : 16:33:56
Last Updated at: 17-July-2017 : 16:54:18

 ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. 17 -  गोमांस बाळगल्या प्रकरणी जलालखेडा पोलिसांनी अटक केलेल्या सलीम ईस्माईल शहा याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. शनिवारी मध्यरात्री त्याला अटक केली होती. गोमांस बाळगल्या प्रकरणी सलीम शहाला गोरक्षकांनी मारहाण केल्यानंतर सलीम जवळचे मांस तपासासाठी पाठवण्यात आले. फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालात त्याच्याजवळचे मांस गोमांस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान सलीम शहा याला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना नरखेड न्यायालयात हजर केले. आरोपी मोरेश्वर तांदुळकर, जगदीश चौधरी , अश्विन उईके  आणि रामेश्वर तायवाडे या चारही आरोपींची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 
 
सलीम हा गोमांस नेत असल्याच्या संशयावरून गोरक्षकांंनी त्याला भारसिंगी येथील बसस्टॉपजवळ अडविले आणि त्याच्या अ‍ॅक्टिव्हाची तपासणी केली. त्यात मांस ठेवले असल्याचे आढळून येताच तरुणांनी जलालखेडा पोलिसांना सूचना दिली. त्यातच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करताना तरुणांनी त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. ही घटना बुधवारी (दि. १२) सकाळी घडली होती. सलीमवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारही करण्यात आले. पोलिसांनी सलीमकडून त्याची अ‍ॅक्टिव्हा व मांस जप्त केले. सदर मांस हे गाईचे नसून बैलाचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी हे मांस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या मांसाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, हे मांस गोवंशाचे असल्याचे त्या अहवालात नमूद केले होते.
 
आणखी वाचा
‘ते’ मांस गोवंशाचे
सरकारने बीफची व्याख्या स्पष्ट करावी
बीफच्या संशयातून मुस्लिमाची हत्या, भाजपा नेत्याला अटक
 
सलीमने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे जलालखेडा पोलिसांनी सलीमविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व गोवंश हत्याबंदी कायदा २०१५ कलम ५ (क) अन्वये गुन्हाही नोंदविला होता. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच जलालखेडा पोलिसांनी त्याला शनिवारी मध्यरात्री १२.२१ वाजता अटक केली आणि रविवार दुपारी नरखेड येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याने त्याला सोमवारी (दि. १७) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सलीमला तारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना बुधवारी रात्री अटक केली होती. त्या चौघांनाही न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावली होती.
 
सलीम भाजपामधून निष्कासित
गोरक्षकांनी सलीमला मारहाण केल्याच्या घटनेनंतर लगेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करीत सलीम हा भाजपाचा कार्यकर्ता व माजी पदाधिकारी असल्याचे म्हटले होते. या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, शनिवारी प्रयोगशाळा तज्ज्ञांच्या अहवालात संबंधित मांस गोवंशाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होताच भाजपानेही आपली भूमिका बदलली व सलीमला पक्षातून निष्कासित केले. सलीमवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी माागणीही जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केली आहे. 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!



महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com