पंढरीवारीसाठी साडेतीन हजार बस धावणार

By admin | Published: July 12, 2016 04:17 PM2016-07-12T16:17:40+5:302016-07-12T23:17:35+5:30

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल साडेतीन हजार बस पंढरपुरात दाखल होणार

There will be three and a half buses running for Pandharwari | पंढरीवारीसाठी साडेतीन हजार बस धावणार

पंढरीवारीसाठी साडेतीन हजार बस धावणार

Next

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 12- पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल साडेतीन हजार बस पंढरपुरात दाखल होणार असून, आषाढीनंतर भाविकांना घेऊन परतणार आहेत. त्यामुळे भाविकांबरोबर एसटी बसचाही उत्सव पंढरपुरात दिसणार आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने कर्नाटक, आंध्रसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल होतात. विशेषत: आषाढी वारीतील एकादशीला चंद्रभागेतील स्नान, विठ्ठलाचे दर्शन आणि पंढरपूरच्या पावननगरीत निवास याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या दिवशी पंढरीत दहा लाखांहून अधिक वारकरी जमतात. त्यासाठी राज्याच्या एसटीच्या सहा विभागाने जादा गाड्या सोडून भाविकांची सोय केली आहे.
पंढरपुरात होणारी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एसटी स्थानक पंढरपूर शहराच्या बाहेर हलविण्यात येणार आहे. दशमी, एकादशी व द्वादशीला पंढरपूर शहरात एकही एसटी बस सोडण्यात येणार नाही. मात्र पंढरपूर शहराच्या चार बाजूला चार स्वतंत्र व प्रशस्त एसटी स्थानक उभे केले असून, इथपर्यंत वारकऱ्यांना जावे लागणार आहे.
अकलूज रस्ता अर्थात पालखी मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मैदानावर यंदा पुन्हा चंद्रभागा बसस्थानक तयार करण्यात आले असून, उद्यापासून येथे पुणे विभागातील गाड्यांचे आगमन होणार आहे. त्याबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळ एक बसस्थानक व सोलापूर रस्त्यावरील तीन चौकात भीमा बसस्थानक हे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. यंदा कर्नाटक, सांगली, कोल्हापूर भागाकडे जाण्यासाठी जुन्या कोर्टाजवळील बिडारी बंगला येथे आणखी एक चौथे बसस्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली,कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बस पंढरपूर शहराच्या बाहेरूनच परस्पर जाऊ शकणार आहेत.
भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी व एसटी बसचे वेळापत्रक तंतोतंत पाळण्यासाठी राज्यभरातून तब्बल ४५० एसटी कर्मचारी येणार असून, प्रादेशिक अभियंता, डेपो मॅनेजर्स, विभाग नियंत्रक अशा अधिकाऱ्यांची कुमकही येथे मुक्कामी असणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी वेळेवर एसटी गाड्या सोडल्या जातील, अशी आशा निर्माण झाली आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
एस. टी. बसस्थानकावर स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनी मोठे अतिक्रमण केले आहे. तब्बल सात ते आठ चौरस फुटाचे फलाटही त्यांनी गिळंकृत केल्यामुळे वारीतील गर्दी नियंत्रित होत नाही. उलट वारीत माणसांची गर्दी वाढत असल्याने येथील अतिक्रमणही वाढतच आहे.
शौचालय संकुल
एस. टी. बसस्थानकावरील सुलभ इंटरनॅशनल शौचालयांची अवस्था दयनीय झाली असून, महिलांसाठी स्नानगृह पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले सुलभ शौचालय संकुल केवळ उद्घाटनासाठी न थांबविता त्याचा वापर सुरु करण्याची मागणी होत आहे.

Web Title: There will be three and a half buses running for Pandharwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.