सोलापूर इलेक्शन : अक्कलकोटमध्ये काँग्रेसचा दबदबा कायम

By admin | Published: February 24, 2017 06:39 PM2017-02-24T18:39:31+5:302017-02-24T18:39:31+5:30

नेतृत्व पडले कमी: पाटलांशी फारकत, पक्षविरोधी भूमिकेचा भाजपला दणका

Solapur Election: Congress retains control in Akkalkot | सोलापूर इलेक्शन : अक्कलकोटमध्ये काँग्रेसचा दबदबा कायम

सोलापूर इलेक्शन : अक्कलकोटमध्ये काँग्रेसचा दबदबा कायम

Next

सोलापूर इलेक्शन : अक्कलकोटमध्ये काँग्रेसचा दबदबा कायम

शिवानंद फुलारी - आॅनलाईन लोकमत अक्कलकोट
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालामध्ये गेल्या वेळच्या तुलनेत भाजप व काँग्रेस पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचे गटात दोनने नुकसान तर गणात एक जागा वाढली आहे. याबरोबरच भाजपचे गटात दोनने वाढ झाली असून गणात दोन संख्येने नुकसान झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी ज्यांनी-त्यांनी आपापल्या भागात ताकद ठेवण्यात यशस्वी ठरले असले तरी पाटील व भाजपमधील कलह, काही नेत्यांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे तडवळ भागासह काही गणात पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. काँग्रेसच्या एकमुखी नेतृत्वाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. याबरोबरच राष्ट्रवादी, रासपासह अन्य पक्षांनी खातेही उघडलेले नाही. भाजपचे चुकीच्या पद्धतीने तिकिट वाटप, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एककल्ली केलेला कारभार आणि भाजपचे नेतृत्व कमी पडल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पाच, राष्ट्रवादी एक, भाजप सहा असे पक्षीय बलाबल गणात होते. गटात मात्र काँग्रेस पाच, राष्ट्रवादी-भाजप युतीचे एक तेही घड्याळ चिन्हावर निवडून आले होते. एकूणच गटात भाजप चिन्हावरील संख्या शून्य होती. यंदाच्या निकालात काँग्रेसचे कुरनूर, सलगर, मुगळी, नागणसूर, जेऊर, दहिटणे या सहा गणात उमेदवार निवडून आल्याने एका सदस्याची ताकद वाढली आहे तर गेल्यावेळी गटात पाच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा दोन जागांचे नुकसान सोसावे लागले आहे. जेऊर, सलगर, नागणसूर या तीन गटातील उमेदवार निवडून आलेले आहेत. तर वागदरी, मंगरूळ या दोन गटाच्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. भाजपचे चपळगाव व वागदरी या गटातून दोन सदस्य संख्या वाढली असून कुरनूर व सलगर गणाच्या जागा अन्य मताने गमवावी लागली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व ज्येष्ठ नेते दत्तात्रय तानवडे व बंडखोर नेते माजी आ. सिद्रामप्पा पाटील ज्यांनी त्यांनी आपापल्या भागात ताकद कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. माजी आ. सिद्रामप्पा पाटील व भाजपमधील दुराव्यामुळे तडवळ भागातील मंगरूळ गट, मंगरूळ गण, सुलेरजवळगे गण या तिन्ही जागांवर अपक्ष म्हणून माजी आ. पाटील यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.
पाटील यांच्या गटाने सलगर, मुगळी, कुरनूर गणात विरोधी भूमिका घेतल्याने भाजपचे उमेदवार अल्प मताने पराभूत झाले आहेत. कुरनूर गणात गेल्यावेळी पक्षाकडून निवडून आलेले पं. स. चे विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे तर नागणसूर गणात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गुरूसिध्दप्पा प्रचंडे यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन काँग्रेसचे काम केल्यामुळे न भरून निघणारे नुकसान भारतीय जनता पक्षाचे झाले आहे. प्रचंडे यांनी गेल्यावेळी पक्षीय बलाबल समसमान असताना भाजपचे सदस्य सतीश प्रचंडे यांनी गैरहजर राहण्याची घेतलेली भूमिका व नेहमी आम्ही पक्षाचे निष्ठावंत असल्याची डरकाळी फोडणाऱ्या गुरूसिध्दप्पा यांच्यापासून पक्षाला धडा घ्यावा लागणार आहे. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री आ. सिध्दाराम म्हेत्रे यांच्या एकमुखी नेतृत्वाला कधीही, कोणीही, पक्षातील मंडळी धोका दिला नाही व पक्षविरोधी भूमिका घेणारे आजवर पक्षात निमित्त झाले नाही व त्यांचे यशच म्हणावे लागणार आहे. त्यांनी पक्षात दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी, रासपा, आरपीआय व अपक्षांनी खातेही उघडलेले नाही. एकंदरित तालुक्यात काँग्रेसच वरचढ ठरली.
-------------------
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
* काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुगळी गणात भाजपचे उमेदवार विश्वनाथ इटेनवरू यांचा काँग्रेसचे आनंद सोनकांबळे यांनी ९२ मतांनी पराभव केला
* कुरनूर गणात भाजपच्या केसरबाई सोनकांबळे यांचा काँग्रेसच्या सुनंदा गायकवाड यांनी केवळ ६७ मतांनी पराभव केला.
* सलगर गणात भाजपच्या प्रमिला नंदर्गी यांचा काँग्रेसच्या भौरम्मा पुजारी यांनी ११७ मतांनी पराभव केला. पुजारी यांना मिरजगी गाव तारले. या तिन्ही गणात अटीतटीची लढत झाली.
* गणात भाजप चार, काँग्रस सहा, अपक्ष दोन, गटात भाजप दोन, काँग्रेस तीन व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल झाल्याने चित्र त्रिशंकू झाले आहे.
* गेल्या वेळी एक जागा जिंकून किंगमेकर ठरलेल्या माजी आमदार स्व. महादेवराव पाटील यांच्या ताब्यातील दोन जागा जिंकून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यंदाचे किंगमेकर ठरले आहेत.
* तानवडे, कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, मल्लिकार्जुन पाटील यांनी त्यांचे भाग ताब्यात ठेवण्यात पुन्हा यशस्वी झाले आहेत.
* भरमशेट्टींना सहानुभूतीचा फायदा नाही तर मल्लिकार्जुन पाटील यांना झाला.
* तोळणूर गणात भाजपच्या कविता हिरमेठ यांनी निवडून येऊन काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात इतिहास रचला.
* कुरनूर गणातील निकालामुळे कभी खुशी कभी गम असे चित्र होते. प्रारंभी भाजपच्या केसरबाई निवडून आल्याची चर्चा होती तर अखेरच्या क्षणी काँग्रेसच्या गायकवाड या ६७ मतांनी विजयी झाल्या.
* निवडणूक काळात नेहमीप्रमाणे आ. सिध्दाराम म्हेत्रे यांचे कष्ट कामी आले.
* काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या चपळगाव व वागदरी गटात भाजपने मारली मुसंडी.
* मतदारांनी बहुतांश सधन उमेदवारांच्या बाजूने कौल दिला.
* सलगर गट व गणाला काँगेसला मिरजगीत सर्वाधिक मताधिक्य देऊन तारले. यामुळे पुजारी यांचा निसटता विजय.
-------------------------
अक्कलकोट तालुक्यात खूप कामे केली, सतत संपर्क ठेवला, त्यामुळेच काँग्रेसने पर्यायाने मला जनतेची साथ मिळाली. कुंभारीत झालेला पराभव का झाला, याचे विश्लेषण करावे लागेल. अक्कलकोट मतदारसंघात दिलेल्या कौलामुळे मी जनतेचे आभार मानतो.
- सिद्धाराम म्हेत्रे,
आमदार, अक्कलकोट
--------------------------------
गेल्या वेळेपेक्षा यावेळी भाजपला चांगले यश मिळाले आहे. थोडक्या मताने तीन जागा आम्हाला गमवाव्या लागल्या. कोणत्याही मोठ्या नेत्याशिवाय युवकांची टीम घेऊन आम्ही लढलो. कुंभारीचा निकाल अपेक्षितच होता. वळसंगमध्ये मात्र आम्ही थोडे कमी पडलो. बोरामणीत चांगली लढत दिली.
- सचिन कल्याणशेट्टी
भाजप तालुकाध्यक्ष, अक्कलकोट

Web Title: Solapur Election: Congress retains control in Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.