तिरंगी लढतीत काँग्रेस-सेना युतीचा विजय

By admin | Published: February 24, 2017 06:42 PM2017-02-24T18:42:08+5:302017-02-24T18:42:08+5:30

करमाळा : पंचायत समितीवर भगवा फडकला

Congress-Army alliance victory in tri-match | तिरंगी लढतीत काँग्रेस-सेना युतीचा विजय

तिरंगी लढतीत काँग्रेस-सेना युतीचा विजय

Next

सोलापूर इलेक्शन : तिरंगी लढतीत काँग्रेस-सेना युतीचा विजय

नासीर कबीर - आॅनलाईन लोकमत करमाळा
तिरंगी लढतीत करमाळा तालुका पंचायत समितीवर भगवा फडकला असून, आ.नारायण पाटील व माजी आ.जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व काँग्रेस युतीने जिल्हा परिषदेत पाच पैकी चार गटात विजय मिळवला असून, पंचायत समितीमध्ये दहा पैकी आठ जागा पटकावल्या आहेत. बागल गटाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीच्या दोन गणावर विजय मिळाला आहे. संजय श्ािंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा, रासप, स्वाभिमानी पक्ष या आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही.
जिल्हा परिषदेच्या महिला राखीव पांडे गटात अटीतटीची लढत होऊन राष्ट्रवादी काँगे्रसच्या जातेगावच्या सरपंच राणी संतोष वारे विजयी झाल्या असून, काँग्रेस आयच्या सुजाता दादा जाधव व भाजपाच्या रोहिणी दत्तात्रय रेगुडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. रावगाव गणात काँग्रेसच्या गुणमाला संतोष शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती विलास मुळे व भाजपाच्या अश्विनी सुजित बागल यांच्यात लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती मुळे विजयी झाल्या आहेत. पांडे पंचायत समितीच्या सर्वसाधारण गणात अपक्ष अ‍ॅड. राहुल सावंत यांनी बाजी मारली आहे. अ‍ॅड. सावंत यांना शिवसेना व काँग्रेसने पुरस्कृत केले होते. या गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विनय ननवरे व अपक्ष उमेदवार पाडळीचे सरपंच गौतम ढाणे दुसरे संजय श्ािंदे यांच्या गटाचे अपक्ष उमेदवार शहाजी झिंजाडे या तिघात मतविभागणी झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला राखीव वीट गटात शिवसेनेच्या लक्ष्मी जनार्दन आवटे या विजयी झाल्या असून, या गटात ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंदाकिनी बाळनाथ जगदाळे यांनी बागल गटाला सोडचिठ्ठी देत संजय शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती,या गटातसुद्धा मतविभागणीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा दादासाहेब चौगुले यांना बसला आहे. कुंभेज गणात विजयी झालेले शिवसेनेचे अतुल प्रतापराव पाटील, जेऊर गणात उभे राहण्यास इच्छुक होते पण आ.पाटील यांनी कुंभेज गण इतर मागासवर्ग राखीव असल्याने पै.अतुल यांना संधी देऊन निवडून आणले. या गणात सतीश नीळ यांनासुद्धा मतविभागणीचा फटका सहन करावा लागला आहे.वीट गणात उमेदवार निवडीवरून राष्ट्रवादीत नाराजी होती तेथे तिरंगी लढतीत मतविभागणीचा फायदा शिवसेनेचे गहिनीनाथ चंद्रसेन ननवरे यांना झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला राखीव कोर्टी गटात शिवसेनेच्या सवितादेवी राजेभोसले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माया झोळ यांच्यात चुरशीची लढत होऊन सवितादेवी राजेभोसले विजयी झाल्या. माया झोळ व आघाडीतील भाजपाच्या स्वाती झोळ यांचा मतविभागणीमुळेच पराभव झाला आहे.केत्तूर गणात काँग्रेस आयच्या मंदाकिनी नागनाथ लकडे यांना शिवसेना-काँग्रेस युतीमुळे विजय मिळाला असून राष्ट्रवादीच्या ठकुबाई रामचंद्र येडे,भाजपाच्या भाग्यश्री राजेंद्र वारगड पराभूत झाल्या आहेत.कोर्टी गणात मात्र शिवसेनेच्या विठाबाई भानुदास अभंग पराभूत झाल्या असून, राष्ट्रवादीच्या स्वाती अशोक जाधव १७१ मतांनी विजयी झाल्या. तिरंगी लढतीत मतविभागणीचा फटका अभंग यांना बसला आहे. वांगी व केम जिल्हा परिषदेच्या गटात आ.नारायण पाटील यांचे परंपरागत वर्चस्व असल्याने व माजी आ.जयवंतराव जगताप यांच्याबरोबर युती झाल्याने वांगी जिल्हा परिषदेच्या गटात शिवसेनेचे नीलकंठ तुकाराम देशमुख व केम गटातून शिवसेनेचे अनिरुद्ध विठ्ठल कांबळे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले आहेत.वांगी गणात केशर भानुदास चौधरी या शिवसेना उमेदवार विजयी झाल्या आहेत. साडे महिला राखीव पंचायत समिती गणात आघाडीतील स्वाभिमानीच्या उमेदवार सुवर्णा विलास राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीता बाळकृष्ण घाडगे यांच्यात मतविभागणी होऊन शिवसेनेच्या साडे ग्रा.पं.च्या सरपंच जयाबाई दत्तात्रय जाधव अपेक्षे प्रमाणे विजयी झाल्या आहेत.
--------------------
पक्षीय बलाबल
आ. नारायण पाटील यांची शिवसेना,माजी आ.जयवंतराव जगताप यांची काँगे्रस आय अशी युती करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये झाली होती. या युतीमधून जिल्हा परिषदेत पाच गटांपैकी शिवसेनेला वांगी,केम,वीट,कोर्टी या चार गटात विजय मिळाला तर बागल गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव पांडे गटात विजय मिळाला आहे. पंचायत समितीच्या दहा गणापैकी शिवसेनेला कुंभेज, वीट, जेऊर, वांगी, केम, साडे असे सहा तर राष्ट्रवादी काँग्रेसला रावगाव,कोर्टी हे दोन व काँग्रेस आयकडे केत्तूर व पांडे गण काँग्रेस आय पुरस्कृत अपक्ष. पंचायत समितीमध्ये बागल गटाची सलग वीस वर्षांपासून सत्ता अबाधित होती.या निवडणुकीत बागल गटाला सत्ता गमवावी लागली.
-------------------
पराभव मान्य : बागल
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सुगीमुळे कमी मतदान झाले.सर्वच मतदारापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. तरीसुद्धा झालेला पराभव आम्हास मान्य असून पराभवाचे आत्मपरीक्षण करून पुन्हा नव्याने जोमाने जनता जनार्दनाच्या कामाला लागू, असे मकाई सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी सांगितले.
----------------------
विकासकामामुळेच विजय : नारायण पाटील
गेल्या दोन वर्षांत आमदारकीच्या काळात तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना,कुकडीचे पाणी ,सीना-कोळगाव सिंचन आदी प्रश्नासह रस्ते,वीज,पाणी हे मूलभूत प्रश्न सोडवल्याने यश संपादन करता आले असे आ.नारायण पाटील यांनी सांगितले.
----------------------
बागलांनी जनतेला फसवले : जयवंतराव जगताप
गोड-गोड बोलून..आश्वासने देऊन बागल गटाने तालुक्यातील सत्ता आजपर्यंत घेतली पण कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्याने जनतेने आता बागल गटास ओळखले आहे, त्याचाच परिणाम म्हणून गेल्या वीस वर्षांपासून असलेली पंचायत समितीची सत्ता आज गेली असे माजी आ.जयवंतराव जगताप यांनी सांगितले.

Web Title: Congress-Army alliance victory in tri-match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.