लोकसहभागातून समृद्धतेकडे वाटचाल

By Admin | Published: April 5, 2017 11:37 PM2017-04-05T23:37:38+5:302017-04-05T23:37:38+5:30

पाट गावची यशोगाथा : परबवाडा-पाट ग्रामपंचायतीने गावातील सर्वच घटकांना सामावून घेत साधली सर्वांगीण प्रगती

People move towards prosperity from the public | लोकसहभागातून समृद्धतेकडे वाटचाल

लोकसहभागातून समृद्धतेकडे वाटचाल

googlenewsNext



रजनीकांत कदम ल्ल कुडाळ
संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातूनच होत असतो. शिवाय तो केला तरी लोकसहभागातूनच टिकत असतो. देव दयेने मिळालेली निसर्ग सौंदर्याची खाण आणि पाण्याच्या उपलब्धतेने सुपीक असलेली शेती यामुळे संपन्न असलेल्या गावाने लोकसहभाग आणि लोकसहकार्यातून जिल्ह्यात समृद्ध गाव अशी ओळख निर्माण केली आहे. या गावाचे नाव आहे पाट. विविध योजना, उपक्रम राबवून या गावच्या परबवाडा पाट ग्रामपंचायतीने गावाचा विकास झपाट्याने केला आहेच पण त्याचबरोबर गावातील सर्वच घटकांना सामावून घेत गावाची सर्वांगीण प्रगती केली आहे.
कुडाळ तालुक्याचे शेवटचे टोक व वेंगुर्ले तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या पाट गावाचे प्रशासकीयदृष्ट्या दोन महसुली भाग पडतात. पहिला भाग गांधीनगर व दुसरा भाग परबवाडा. पाट गाव हा विस्तीर्ण असून, पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. निसर्गाच्या कुशीत डोंगराच्या दऱ्याखोऱ्यात वसलेला पाट पर्यटन गाव होण्याच्या प्रगतीपथावर आहे. पाट गाव हा सावंतवाडी संस्थानातील महत्त्वाचा एक भाग होता. ‘पट्टण’ या नावावरूनच ‘पाट’ हे नाव पडले, असे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे. पाट गावाचे नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे तलाव. हा तलाव साडेतीनशे वर्षांपूर्वीचा असून, त्याला ऐतिहासिक वारसा आहे. गावात २२ वाड्या असून, प्रत्येक वाड्यात जाण्यासाठी पक्क्या रस्त्यांची सोय आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्यांचीही सोय उपलब्ध आहे. गाव अनेक सोयीसुविधांनी युक्त आहे. सध्या होऊ घातलेले चिपी विमानतळ हे पाट गावापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर आहे.
या गावाची लोकसंख्या ३३४७ असून गावाचे दोन महसुली भाग आहेत. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र्र, रेशन दुकान, इलेक्ट्रिक आॅफिस, तलाठी कार्यालय, बँक, पोस्ट या सोयी असल्याने पाटवासीयांची उत्तम सोय झाली आहे. शिवाय विपुल प्रमाणात पाण्याच्या साठ्यामुळे पाट गाव शेतीदृष्ट्या सुजलाम सुफलाम आहे. गावात आठवडा बाजारही भरतो. गावातील शेतकरी हा प्रगत असून विकासाची कास धरणारा आहे. दरवर्षी ३ हेक्टर क्षेत्रफळामध्ये फळबाग लागवडीची कामे घेतली जातात. तसेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून गावात विहिरी, गांडूळखत प्रकल्पाची कामेही चालू आहेत.
३३ लाख रुपये खर्चून ग्रामपंचायत परबवाडा पाटची सुसज्ज इमारत पूर्ण झाली असून त्यासाठी तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई व अधिकारीवर्गाचे सहकार्य लाभले. या इमारतीचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांनी सुरुवातीला पथदीपांसाठी ५० हजारांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गावातील प्रत्येक वाडीत दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. गावात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण ग्राम संतुलित समृध्द ग्राम योजनेमधून गावात ६४ बायोगॅस बांधण्यात आले. प्रत्येक वाडीत दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या अनेक योजनांची माहिती गावातील लोकांना ग्रामपंचायतीमार्फत दिली जाते. समाजकल्याणमार्फत समाजमंदिरात सौर अभ्यासिका बसविली व वाचनालय सुरू केले आहे. ग्रामसभा, महिला सभा असो किंवा कोणताही कार्यक्रम असो एकमुखाने सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात.
पाट तलाव साडेतीनशे वर्षांपूर्वीचा असून याबाबतची माहिती रामानंद स्वामींच्या पुस्तकात आढळून येते. तलावात मोठ्या प्रमाणात पांढऱ्या व लाल रंगाची कमळ फुले फुलतात. अनेक पर्यटक येथे कमळ फुले पहायला येतात. तलावाचे एकूण क्षेत्र ७ एकर आहे. पण तलावाची मोजणी करूनही सातबारावर मिळत नाही. गेली चार वर्षे सतत पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नाही. गावातील तलावाच्या पाण्यावर म्हापण, कोचरा, पाट हे तिन्ही गाव अवलंबून आहेत. या गावातील लोक स्वत: येऊन बंधारा बांधतात. तलावावर कायमस्वरूपी बंधारा बांधणे गरजेचे असून खोलीकरणही करणे आवश्यक आहे. १५ वर्षांपूर्वी तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. पण आत गाळ साचल्याने दलदल मोठ्या प्रमाणात साचली असून जलपर्णीने वेढा घातला आहे.
पाट गावच्या सरपंच कीर्ती दीपक ठाकूर याबाबत पाठपुरावाही करत आहेत. लवकरच सातबारा मिळून गावातील महत्त्वाचा विकासाचा बिंदू असलेला पाट तलाव सुशोभित होईल. पाट गावाची पर्यटन गाव म्हणून निवड झालेली आहे. तलावासंदर्भात प्रस्तावही शासनाकडे सादर केलेला आहे. गावात प्रत्येक वाडीत नळयोजनेचे काम सुरू आहे.
गावात आरोग्य उपकेंद्राची नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात आलेली आहे. सुरुवातीला तेथे जाण्यासाठी वाट नव्हती व पाण्याची सोयही नव्हती. पण आता आरोग्यकेंद्रात २४ तास पाणी, वीज, रस्ता व संरक्षक भिंतीचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करण्यात आलेले आहे. आरोग्य विभागाअंतर्गत दरवर्षी नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येतात. माता, महिला, किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबीन तपासणी, मार्गदर्शक कार्यक्रम घेणे, पथनाट्य बसविणे, सुदृढ मुलांची स्पर्धा भरविणे आदी कार्यक्रम ग्रामपंचायत, अंगणवाडी आरोग्य विभागामार्फत करण्यात येतात.
येथील महिला बचतगटांनी सिंधुसरस, कोकण सरस, गोवा सरस प्रदर्शनात तसेच शासनाच्या तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील विविध कार्यक्रमांतून उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आज कोकण विभागात पाट गावातील बचतगटाला प्रथम मानांकन मिळाले आहे. गावात ४ प्राथमिक शाळा आहेत. गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून १७०० पेक्षा जास्त मुले शिक्षण घेतात. यातील बहुतांशी शाळा डिजिटल झाल्या आहेत. शिवाय गावात चार अंगणवाड्या असून, आदर्श अंगणवाडीचा पुरस्कारही मिळाला आहे. परबवाडा पाट गाव १०० टक्के साक्षर गाव आहे.
गावातील दोन्ही भाग जोडण्यात यश
गावाचे महसुली पाट व गांधीनगर असे दोन भाग करण्यात आले आहेत. गांधीनगर महसूल क्षेत्रात टॉवर उभा असतानाही रेंज मिळत नव्हती.
वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना खांब व वायर दिली.
यावर ग्रामस्थांनी स्वत: खड्डे खणून खांब बसविले. १५ आॅगस्ट २०१५ ला टॉवर सुरू झाल्याने गावातील दोन्ही भागातील अंतर नाहीसे झाले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात आंबेडकरनगराला ‘स्वच्छ सुंदरवाडी’ म्हणून कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांकाचे २५ हजारांचे बक्षिस मिळाले.
सरपंचांचे मानधनही शिक्षणासाठी!
पाटचे सरंपच दरवर्षी स्वत:चे मानधन शैक्षणिक कामासाठी वापरतात. यातून मुलांचे रक्तगट तपासणे, स्वच्छताविषयक कामासाठी एकात्मिक बालविकास निधी खर्ची घालणे, पथनाट्य ग्रामपंचायतीमार्फत राबवून मुलांना स्वच्छतेची जागृती करून देणे आदी कार्यक्रम ग्रामपंचायतीमार्फत राबविले जातात.
गावात चार प्राथमिक शाळा तर एक माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रशाला आहे. सुरुवातीला शाळेत पाण्याची टंचाई भासे. पण जिल्हा परिषदेच्या विविध निधीतून शाळेतील पाण्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. तसेच पाट हायस्कूलमधील मुलांसाठी ग्रामनिधीतून बेबी टॉयलेट व बाथरूम बांधून देण्यात आले.
ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार
पर्यावरण विकासयुक्त पुरस्कार, हागणदारीमुक्त पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, ‘स्मार्ट ग्राम’ मध्ये सहभाग, आदर्श अंगणवाडी पुरस्कार, यशस्वी स्त्री सरपंच पुरस्कार असे पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले आहेत.

Web Title: People move towards prosperity from the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.