सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस साडेआठ कोटीचा नफा

By admin | Published: April 5, 2017 11:17 PM2017-04-05T23:17:25+5:302017-04-05T23:17:25+5:30

सतीश सावंत; आर्थिक वर्षात बँकेची चौफेर प्रगती

Direct profit of Sindhudurg district bank of Rs. 8 crores | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस साडेआठ कोटीचा नफा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस साडेआठ कोटीचा नफा

Next



सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने २०१६ ते १७ या आर्थिक वर्षात ठेवी, कर्ज वसुली, नफा, सी. आर. ए. आर.मध्ये भरीव वाढ होऊन या बॅँकेने चौफेर प्रगती केली आहे. या आर्थिक वर्षात बॅँकेचा एकूण व्यवसाय २५६३.३७ कोटींवर पोहोचला आहे. बॅँकेचा ढोबळ नफा १२.९० कोटींवरून १९ कोटी ७२ लाख झाला आहे, तर निव्वळ नफा ६.५० कोटींवरून ८.५० कोटी झाला आहे, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी २०१७-१८ या आर्थिक वर्षातही जिल्हा बॅँकेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहील, असा विश्वासही यावेळी सावंत यांनी व्यक्त केला.
मार्च २०१७ अखेरीस सिंधुदुर्ग जिल्हा बॅँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी बॅँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बॅँकेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपाध्यक्ष सुरेश दळवी, बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक प्रकाश मोर्ये, प्रकाश परब, नीता राणे, प्रज्ञा परब, आत्माराम ओटवणेकर, प्रमोद धुरी, आदी उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, जिल्हा बॅँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात समाधानकारक प्रगती केली आहे. ठेवी १३४७.८४ कोटी रुपयांवरून १५०१.०७ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. रिझर्व्ह बॅँकेने मंजुरी दिल्याप्रमाणेच २० कोटी रुपयांच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींचे उद्दिष्टही मुदतीत पूर्ण झालेले आहे. कर्जव्यवहार १०६२.३० कोटी असून, एकूण व्यवसाय २५६३.३७ कोटींवर पोहोचला आहे. सी. डी. रेशो ७१ टक्के आहे. मार्च २०१७ अखेर सी. आर. ए. आर. ९.०५ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात बॅँकेचा ढोबळ नफा १२.९० कोटी एवढा होता. त्यात वाढ होऊन यावर्षी १९.७२ कोटी एवढा झाला आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षात बॅँकेला ६.५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता. त्यात यावर्षी आर्थिक वाढ होऊन तो ८.५० कोटी एवढा झाला आहे. ढोबळ नफ्यातील ही वाढ ५२.८६ टक्के, तर निव्वळ नफ्यातील वाढ ३१ टक्के एवढी झाली आहे. सन २०१६-१७ च्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करताना बॅँकेचे सर्व संचालक, सभासद, हितचिंतक तसेच ठेवीदार ग्राहकांबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे सावंत यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)

वाहन कर्ज मंजुरीचे अधिकार शाखा व्यवस्थापकांना
बॅँकेकडून १५ लाखांपर्यंत वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा कर्जपुरवठा सुलभ होण्याच्या दृष्टीने ते वाहन कर्ज मंजूर करण्याचे अधिकार बॅँक मॅनेजर यांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती सतीश सावंत यांनी दिली.

ऊस उत्पादनापोटी शेतकऱ्यांना मिळाले २८ कोटी
सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्गात सव्वा लाख टन उसाचे उत्पादन मिळाले. यातून शेतकऱ्यांना २८ कोटी रुपये मिळाले. यासाठी जिल्हा बँकेने या शेतकऱ्यांना आठ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले होते. जिल्हा बॅँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी बॅँक असतानाच दुसरीकडे माजी आमदार विजय सावंत यांनी राजकीय स्वार्थ समोर ठेवून साखर कारखाना उभारणीच्या हालचाली गेल्या तीन वर्षांपासून सुरू केल्या आहेत. त्यांनी पाच हजार जणांच्या मुलाखती घेतल्या; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी जाहीर करावे की, उसाचे किती बियाणे शेतकऱ्यांना वाटले? कारखाना उभारणीसाठी किमान साडेतीन लाख टन ऊस आवश्यक आहे. आताचे उसाचे क्षेत्र वाढतेय. त्याला सिंधुदुर्ग जिल्हा बॅँकेचा पुढाकार असल्याचे मत सतीश सावंत यांनी व्यक्त करीत माजी आमदार विजय सावंत यांना टोला लगावला.

९३ कोटींच्या जुन्या नोटा जमा
नोटाबंदीच्या कालावधीत जिल्हा बॅँकेकडे ५०० व १००० रुपयांच्या तब्बल ९३ कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. त्या सर्व नोटा स्टेट बॅँकेने स्वीकारल्या आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

Web Title: Direct profit of Sindhudurg district bank of Rs. 8 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.