साताऱ्यातील गुरुवार बागेच्या मीटर रुममध्ये चालतोय तरुणांचा भलता खेळ!

By सचिन काकडे | Published: April 26, 2024 12:40 PM2024-04-26T12:40:11+5:302024-04-26T12:42:02+5:30

नागरिक अवाक् : पालिकेच्या कर्मचाऱ्यामुळे प्रकार उघडकीस

Use of meter room in guruvar Bagh in Satara for couples | साताऱ्यातील गुरुवार बागेच्या मीटर रुममध्ये चालतोय तरुणांचा भलता खेळ!

साताऱ्यातील गुरुवार बागेच्या मीटर रुममध्ये चालतोय तरुणांचा भलता खेळ!

सातारा : आबालवृद्धांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण असलेल्या गुरुवार बागेतील मीटर रुमचा वापर जोडप्यांसाठी केला जात असल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या मीटर रुममध्ये ‘भलतेच’ प्रकार घडत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली आहे.

शनिवार पेठेतील गुरुवार बाग विस्ताराने मोठी असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे या बागेत दररोज सकाळी व सायंकाळी आबालवृद्ध मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. ही बाग केव्हा उघडायची व केव्हा बंद करायची, याचे वेळापत्रक ठरविण्यात आले असून, प्रवेशद्वाराच्या चाव्या ठेकेदाराने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसह काही नागरिकांना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पालिकेतील एक कर्मचारी बागेत मतदान जनजागृतीसाठी आले होते. यावेळी बागेतील मीटर रुममध्ये घडलेला प्रकार पाहून ते अवाक् झाले.

मीटर रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. त्या रुममध्ये कोणीतरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही वेळानंतर ठेकेदाराने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून सर्वांसमोर मीटर रुमचे कुलूप उघडण्यात आले. यावेळी त्या रुममधून तरुण-तरुणी बाहेर आले. पालिका कर्मचाऱ्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घडलेला हा प्रकार गंभीर असून, काही सुज्ञ नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे ऑनलाइन तक्रार नोंदवून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

‘अशा’ घटनेची पहिलीच वेळ..

सातारा शहरातील उद्यानांमध्ये तरुण-तरुणींचा घोळका नेहमीच येत असतो. सर्वच उद्यानांमध्ये हे चित्र हमखास नजरेस पडते. परंतु गुरुवार बागेतील कुलूपबंद मीटर रुममध्ये तरुण-तरुणी आढळून आल्याने हा विषय भलताच चर्चेचा ठरला आहे. बागेत अशाप्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

धाडस आलेच कोठून?

संबंधित कर्मचाऱ्यांकडून मीटर रुम तरुण-तरुणींना दिला जातो. तरुण-तरुणी रुममध्ये गेल्यानंतर रुमला बाहेरून कुलूप लावले जाते. काही वेळानंतर रुमचे कुलूप उघडले जाते. या सर्व प्रकारातून मीटर रुममध्ये ‘भलतेच’ प्रकार घडत असल्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. गर्दीने गजबजलेल्या बागेत अशा प्रकारांना खतपाणी घालण्याचे धाडस ‘त्या’ कर्मचाऱ्यांमध्ये नेमके आले कोठून? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: Use of meter room in guruvar Bagh in Satara for couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.