गटारात आढळतंय काळं सोनं!

By admin | Published: September 22, 2014 10:15 PM2014-09-22T22:15:53+5:302014-09-23T00:12:26+5:30

साताऱ्यातील चित्र : ढगफुटीनं लागली गरजूंना लॉटरी; रोज निघतेय भरमसाठ वाळू

Gold is found in the gutter! | गटारात आढळतंय काळं सोनं!

गटारात आढळतंय काळं सोनं!

Next

सातारा : नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर होत्याचं नव्हतं होतं, हे सर्वज्ञात आहे. पण ‘आपत्तीतून संपत्ती’ सापडल्याचं चित्र दुर्मिळच! असं चित्र सध्या सातारा शहरात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे रस्त्यावरील डेपो केलेली वाळू गटारात वाहिली, आता गटारे उपसताना ती सापडत असून, अनेकजण ही वाळू काढून ती बांधकामासाठी वापरत आहेत.
साताऱ्यात मध्यंतरी ढगफुटी झाली. यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचले होते, तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून वाहत असलेले पाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहिले. यामुळे सातारकरांचे लाखोंचे नुकसान झाले. तसेच शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. अनेकांनी बांधकाम साहित्य रस्त्याकडेला टाकले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यात रस्त्यावरची वाळू वाहून गेली.
दरम्यान, वाहून गेलेली वाळू गटारात अडकल्याने गटारे तुंबली. पालिकेने ही गटारे स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी गटारातून कचरा, प्लास्टिक, दगडी आदी अडकलेला असतो. गटारे साफ करताना अनेक ठिकाणी वाळू सापडत आहे. मिळणारी वाळू ‘गरजूंच्या’ घरी नेली जात आहे.
वाळूचा दर तेजीत आहे. एका ब्रासला ४,००० ते ४,५०० रुपये आहे. तर किरकोळ वाळूसाठी पाटीला १० ते १५ रुपये मोजत लागत आहेत. त्यामुळे किरकोळ कामासाठी ही वाहून आलेली गटारातील वाळू वापरात येऊ लागली आहे. याच वाळूची किंमत बाजारभावात पाचशे रुपयांपर्यंत आहे. या वाळूचा लिलावही नाही आणि पैसेही नाहीत, त्यामुळे विना लिलावाची वाळू, अशी मिश्किलीही काही जण करत आहेत.
दरम्यान, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणे किती धोक्याचे आहे, हेच यातून समोर येत आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊ शकते. (प्रतिनिधी)

अनेकांची वाळू गेली वाहून
शासनाला लाखोंचा कर मिळवून देणाऱ्या वाळूसाठी लिलाव पद्धत आता इंटरनेटशी जोडली आहे. वाळू लिलावामध्ये नको इतकी स्पर्धा सुरू असते. नदीपात्रात कोणत्या ठिकाणी वाळू लागेल. याचाही अभ्यास केला जातो; परंतु साताऱ्यात मात्र अवकाळी पावसामुळे वाहून गेलेली वाळू चक्क गटारात मिळत आहे.

स्लॅब टाकण्यासाठी दोन ब्रास वाळू आणली होती. दुसऱ्याच दिवशी झालेल्या पावसामुळे जवळपास अर्धा ब्रास वाळू नाल्यातून वाहून गेली, त्यामुळे दोन हजारांचे नुकसान झाले.
- अस्लम मौलवी, सदर बझार

Web Title: Gold is found in the gutter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.