बाणगंगेवरून फलटणमध्ये वाक्बाण!

By Admin | Published: August 18, 2016 11:34 PM2016-08-18T23:34:18+5:302016-08-18T23:34:19+5:30

बंधारे केवळ रामराजेंमुळेच... दीपक चव्हाण : दुसऱ्याने श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये

Bangabangan balloon in the Phaltan! | बाणगंगेवरून फलटणमध्ये वाक्बाण!

बाणगंगेवरून फलटणमध्ये वाक्बाण!

googlenewsNext

वाठार निंबाळकर : ‘पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुष्काळी पट्ट्यातील तीन नद्यांच्या पात्रात साखळी सिमेंट बंधारे बांधण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला असून, त्यानुसार बाणगंगा नदी पात्रात ३१ बंधारे उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाला मंजुरी केवळ विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यामुळेच मिळाली असल्याने अन्य कोणी त्याचे श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
बाणगंगा नदी उगमापासून ते नीरा नदीला मिळेपर्यंत सुमारे २९ किलोमीटर अंतरामध्ये ३१ सिमेंट नालाबांधाद्वारे बाणगंगा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा शुभारंभ आणि बंधाऱ्यांच्या जागेचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती वैशाली गावडे, बापूराव गावडे, विवेक शिंदे, मोहनराव निंबाळकर, दत्तोपंत शिंदे, शिवराज कदम, सुरेश रोमण, प्रदीप लंभाते, जयवंत जाधव, सोपान जाधव, हणमंत जगताप, लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता डी. बी. गायकवाड, शाखा अभियंता एल. एन. निकम आदी उपस्थित होते.
बाणगंगा नदीच्या उगमापासून सस्तेवाडीपर्यंत, उपळवे, मिरेवाडी, दालवडी, तावडी, ठाकुरकी, फलटण आणि सस्तेवाडी या गावांच्या हद्दीत हे ३१ बंधारे उभारण्यात येणार असून, त्यासाठी ८ कोटी ९७ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या ३१ बंधाऱ्यांद्वारे १२७९ द.ल. घनफूट पाणीसाठा होणार असून, त्याद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ५६३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. फलटण हा प्रामुख्याने अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडणारा तालुका असून, येथे सरासरी पर्जन्यमान ३५०-४०० मि. मी. इतके अत्यल्प असून, कमी व अनियमित पर्जन्यमानामुळे बाणगंगा नदी कधीच प्रवाही राहत नाही. म्हणून बाणगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ३१ बंधारे उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या नदीवर जुन्या तीन के. टी. वेअर बंधारे दुरुस्तीसाठी १ कोटी २५ लाख असे एकूण १० कोटी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आहे, असे आमदार चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
त्याचप्रमाणे धोम-बलकवडी कालवा ते नीरा-उजवा कालवा यामधील क्षेत्रातून बाणगंगा नदीला मिळणाऱ्या ओढ्यावरील नवीन १९ सिमेंट बंधाऱ्यांसाठी ३ कोटी २५ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सोपान जाधव यांनी स्वागत केले. माजी सरपंच दत्तात्रय बनकर यांनी सूत्रसंचालन केले. घोलवडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

‘राष्ट्रवादी’चा कळवळा खोटा
रणजितसिंह नाईक-निंबाळकर : आठ बंधाऱ्यांना आम्ही स्वत:ची जागा दिली
फलटण : ‘स्वत:चा नाकर्तेपणा लपविण्यासाठी आम्ही बाणगंगा नदीवरील मंजूर केलेल्या ३१ सिमेंट बंधाऱ्यांचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसची तथागत नेतेमंडळी घेत आहेत. यातील आठ बंधाऱ्यांना माझी जागा दिली आहे. या बंधाऱ्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यामुळेच मंजुरी मिळाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींचा यातून खोटा कळवळा व नाकर्तेपणा दिसून येत आहे,’ असा टोला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लगावला.
बाणगंगा नदी पुनर्जीवित होण्यासाठी नदीपात्रात ३१ सिमेंट काँक्रीट बंधारे बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. यावरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये श्रेयवाद सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर रणजितसिंह यांनी जोरदार हल्ला चढविला. यावेळी स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, महेंद्र बेडके उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘फलटण तालुक्यात अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. अनेकवर्षे दुष्काळ पडत आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत सर्व सत्तास्थाने असूनही राष्ट्रवादीला एकही बंधारा मंजूर करता आला नाही. खरेतर त्यांनी बंधारे मंजूर करून आणणे गरजेचे होते. आजही रामराजेंकडे सर्वोच्च सत्ता आहे. एक काय शेकडो बंधारे ते मंजूर करू शकतात, कालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण करू शकतात; मात्र त्यांच्याकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने सर्वकाही ठप्प आहे.’
आमच्याकडे कोणतीही सत्ता नसताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने तालुक्यात विविध विकासकामांसाठी मोठा निधी आणला. बंधाऱ्याच्या ३१ साईटसाठीच्या जागा मी व दिगंबर आगवणे यांनी शोधल्या. काही ठिकाणी बंधाऱ्यासाठी जागा मिळत नसल्याने माझ्या नावावरील ८ जागा बंधाऱ्यासाठी दिल्या. बंधाऱ्यासाठी अनेक बैठका घेऊन पाठपुरावा केल्याने त्याचे काम सुरू झाल्याचेही रणजितसिंहांनी स्पष्ट केले.
‘आजपर्यंत तालुक्यात कधी श्रेयवाद रंगला नाही. आम्ही कधीही राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी मंजूर केलेल्या कामावर दावा केला नाही की श्रेय घेतले नाही. आज आम्ही बंधाऱ्याची कामे मंजूर करून आणली तर यांच्या पोटात दुखत असून, ज्यांचा काडीचाही संबंध नाही, असे तालुक्याचे आमदार व त्यांची नेतेमंडळी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी यातील सत्य जनतेला माहीत आहे,’ असेही रणजितसिंहांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Bangabangan balloon in the Phaltan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.