सांगली-मिरज -कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवारांसह दोन उपायुक्तांची बदली

By अविनाश कोळी | Published: March 19, 2024 09:04 PM2024-03-19T21:04:53+5:302024-03-19T21:05:08+5:30

शासनाचे आदेश : नियुक्तीचे ठिकाण अद्याप अनिश्चित.

Transfer of Sangli Miraj Kupwad Municipal Commissioner Sunil Pawar along with two Deputy Commissioners | सांगली-मिरज -कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवारांसह दोन उपायुक्तांची बदली

सांगली-मिरज -कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवारांसह दोन उपायुक्तांची बदली

सांगली : राज्य शासनाने मंगळवारी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील यांच्या बदलीचे आदेश दिले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्या असल्या तरी तिन्ही अधिकाऱ्यांना नियुक्तीचे ठिकाण दिलेले नाही. त्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या निवडणूक काळात बदल्या करण्याचे धोरण आयोगाने राबविण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त सुनील पवार व उपायुक्त पंडीत पाटील हे दोन्ही अधिकारी सांगली जिल्ह्यातील आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या तीन प्रमुख अधिकाऱ्यांची एकाचवेळी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुनील पवार यांची १२ ऑगस्ट २०२२ रोजी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. दीड वर्षाच्या कालावधीतच त्यांची बदली झाली आहे. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी पंडित पाटील यांची नियुक्ती उपायुक्तपदी झाली होती. पाच महिन्यातच त्यांची बदली झाली. राहुल रोकडे यांना काही महिन्यांपूर्वी मुदतवाढ मिळाली होती.

आयुक्त पवार यांनी मुख्याधिकारी पदापासून प्रशासकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यांनी आष्टा, इचलकरंजी पालिकेत मुख्याधिकारी म्हणूनही काम केले होते. त्यानंतर सांगली महापालिकेत २०१५ ते २०१८ या कालावधीत ते उपायुक्त म्हणून कार्यरत होते. चार वर्षांनंतर पवार यांची सांगली महापालिकेत बदली झाली होती. दीड वर्षाचा कालावधी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांची बदली करण्यात आली आहे.

पंडित पाटील यांचे मूळगाव आरग (ता. मिरज) आहे. २०१० साली पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माझलगाव (जि. बीड) येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, साता-यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले. सध्या लोणावळा नगर परिषदेत ते मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून कार्यरत होते. नंतर सांगली महापालिकेत नियुक्ती झाली होती. 
 
नवे अधिकारी कोण?
आयुक्त व दोन्ही उपायुक्तांना नव्या नियुक्तीचे ठिकाण अद्याप दिलेले नाही. त्याबाबतचे आदेश येत्या दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. याशिवाय या तिन्ही अधिकाऱ्यांच्या जागी कोण येणार, याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.

Web Title: Transfer of Sangli Miraj Kupwad Municipal Commissioner Sunil Pawar along with two Deputy Commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली