येळावीत आरक्षणामुळे मातब्बरांची नाराजी

By Admin | Published: January 19, 2017 12:26 AM2017-01-19T00:26:54+5:302017-01-19T00:26:54+5:30

निवडणुकीचे वातावरण तापू लागले : बंडखोरीच्या शक्यतेने पक्षश्रेष्ठी अस्वस्थ, बहुरंगी लढत होणार

Resistance to Resistance | येळावीत आरक्षणामुळे मातब्बरांची नाराजी

येळावीत आरक्षणामुळे मातब्बरांची नाराजी

googlenewsNext



मोहन बाबर ल्ल येळावी
येळावी जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी पुरुष आरक्षण झाल्याने प्रमुख मातब्बर नाराज झाले आहेत. आरक्षणाअगोदर सर्व गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच रान उठविले होते.
राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अशी होणारी निवडणूक प्रथमच बहुरंगी होणार आहे. दोन्ही काँग्रेसबरोबर भाजप-शिवसेनाही रिंगणात उतरली आहे, तर स्थानिक रयत पॅनेलनेही शड्डू ठोकला आहे. परंतु गटात राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमध्ये होणाऱ्या बंडखोरीच्या राजकीय भूकंपाने मात्र जि. प. इच्छुक उमेदवारांबरोबर पक्षश्रेष्ठींचीही झोप उडाली आहे.
मागील जि. प. निवडणुकीत आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील हे एकत्र होते. तडजोडीच्या अनेक फेऱ्यानंतर या मतदारसंघाची जबाबदारी आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या विद्यमान अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्यावर टाकण्यात आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी अर्ज भरण्यात आला. आबा-काका गट एकत्र असतानाही अवघ्या ३११७ मतांनी काँग्रेसविरोधात विजयी झाल्या. तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसतानाही येळावी, जुळेवाडीपुरत्या मर्यादित असणाऱ्या काँग्रेसने जबरदस्त झुंज दिली. तरीही राष्ट्रवादीने जि. प. बरोबर पंचायत समितीच्या तुरचीच्या हर्षदा पाटील व नागावचे शिवाजीराव पाटील या दोन्ही ठिकाणी बाजी मारली.
सध्या या मतदार संघात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आबा, काका गट वेगवेगळे लढत असून, संजय पाटील भाजपमधून खासदार झाले आहेत. खासदारकीनंतरच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपमय केले आहेत. तासगाव नगरपालिका व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन केली आहे. मात्र त्यांना येळावी गणातून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. येळावी गणात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. आरक्षणाअगोदर भाजपच्या येळावीतील अनेक शिलेदारांनी जि. प. साठी शड्डू ठोकला होता. त्यातच गावात आलेली अध्यक्षपदाची लाल दिव्याची गाडी सर्व गटाच्या नेत्यांना खुणावत होती.
राष्ट्रवादीचा विचार करता या गणातून तुरचीचे संजय पाटील, संदीप पाटील, येळावीतून बापू माळी, शांताराम गावडे, वासुंबेतून बाळासाहेब एडके, गुंडूभाऊ एडके इच्छुक आहेत, तर भाजप व काँग्रेसमधील वातावरण पूर्णपणे शांत आहे. जि. प. गणाचा विचार करता, भाजपमधून येळावी गावचे विद्यमान सरपंच विश्वनाथ पांढरे, तुरचीचे आबास तांदळे, काँग्रेसकडून ग्रामपंचायत सदस्य सचिन गावडे इच्छुक आहेत, मात्र भाजप गटात तगडा उमेदवार नसल्याने विरोधी गटातील बंडखोर उमेदवारांवर भिस्त आहे. काँग्रेस कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीबरोबर किमान या मतदार संघापुरती आघाडी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
जि. प. मतदार संघाचा विचार करता, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे, परंतु आबांच्यानंतर आबा घराण्याबरोबर मोजक्याच कार्यकर्त्यांचे सूत जुळले आहे. याबरोबरच गावात जि. प. ची उमेदवारी न मिळाल्यास सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते एकत्र येऊन उमेदवार देऊन मोठा भूकंप करण्याच्या प्रयत्नात आहेत. असा प्रयोग याअगोदर येळावी ग्रामपंचायतीमध्ये रयत पॅनेलच्या रूपाने झाला होता. याचा मोठ्ठा तोटा प्रमुख गटांना होऊन भाजपचा फायदा झाला होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.
राष्ट्रवादीत जि. प. साठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. खासदार संजय पाटील यांनी टीका केल्याने जयंत पाटील यांनी तालुक्यात चांगलेच लक्ष घातले आहे. जि. प. अध्यक्षांनीही पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी व विरोधकांना शह देण्यासाठी विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील यांच्या उपस्थित पक्षाचा मेळावा घेतला.
दुसरीकडे भाजप व काँग्रेसमध्ये मात्र येळावी पं. स. गण वगळता, वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे. भाजपची पूर्ण मदार आयात उमेदवारावर असल्याचे ज्येष्ठांचे मत आहे.

Web Title: Resistance to Resistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.