अक्षय तृतीयेच्या खरेदीला मंदीचा क्षय

By निखिल म्हात्रे | Published: May 10, 2024 05:25 PM2024-05-10T17:25:43+5:302024-05-10T17:26:13+5:30

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असे अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे.

akshaya tritiya shopping slow down | अक्षय तृतीयेच्या खरेदीला मंदीचा क्षय

अक्षय तृतीयेच्या खरेदीला मंदीचा क्षय

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून करण्यात येणाऱ्या सोने खरेदीला शुक्रवारी आर्थिक मंदीचा क्षय जाणवला. लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असूनही मंदीच्या क्षयामुळे सोने खरेदीचा अक्षय आनंद लुटताच आला नाही. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असे अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिक प्राधान्य देतात. अक्षय तृतीयेपासून शुभ कार्याचे मुहूर्त सुरू होतात. मात्र, वाढती महागाई आणि त्याच्या जोडीला जाणवत असलेल्या आर्थिक मंदीचा प्रभाव यंदाच्या सोने खरेदीवरही होता. काही सराफांनी तर, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या होत्या. मात्र, तरीही सोने खरेदीला म्हणावी तेवढी चालना मिळाली नसल्याचे जाणवले, असल्याचे सराफांनी सांगितले. अक्षयतृतीयेला सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, या सणाला यंदा आर्थिक मंदीचा फेरा जाणवत आहे, त्यातच आर्थिक मंदी असल्याने अनेकांना सोने खरेदीची इच्छा असूनही सोने खरेदी करता आला नाही. काही ग्राहकांनी केवळ मुहूर्ताचीच खरेदी केली. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही कोणतीही सवलत योजना जाहीर केली नाही, असेही काही सराफांनी सांगितले.

अक्षय तृतीयेच्या दिवशी का केली जाते सोन्याची खरेदी?

अक्षय तृतीयेच्या दिवशी जे शुभ कार्य केले जाते त्याला अक्षय म्हणजे अधिक फल मिळते. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय कधीच होत नाही असा. तसेपण बारा महिन्यातील सर्व शुक्ल पक्षीय तृतीया शुभ मानल्या जातात. त्यामुळे या दिवसांत केलेली सोन्याची खरेदी ही सर्वात लाभदायक असते.

सोन्याचा भाव काय?

यंदा ग्राहकांचा उत्साह अक्षय तृतीयेला कभी खुशी कभी गम प्रमाणे दिसून आला आहे. गेल्यावर्षी सोन्याचा भाव हा ५९ हजार ८५० रुपये इतका होता. तर यंदा तो भाव ७० हजार रुपये इतका आहे.

मागील दोन वर्ष अक्षयतृतीया या दिवशी सोने खरेदी करता आले नाही. या मुहूर्तावर थोडे का असेना सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.  - साक्षी पाटील, गृहिणी.

अक्षय तृतीयेला सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, या सणाला यंदा आर्थिक मंदीचा फेरा जाणवत आहे. काही ग्राहकांनी केवळ मुहूर्ताचीच खरेदी केली. महागाईमुळे सोने खरेदी होत असली तरी जेवढे बजेट आहे त्यामध्ये बसेल तेवढेच सोने खरेदी करण्याकडेच ग्राहकांचा कल असल्याचे जाणवले.  - बिधान सासमल, सोनार.

Web Title: akshaya tritiya shopping slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.