उच्चांकी तापमानाची नोंद, पुणे @ ४३ ! नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण, अंगातून घामाच्या धारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:54 AM2024-04-19T11:54:58+5:302024-04-19T11:57:31+5:30

दोन दिवसांपासून पुण्यात उष्णतेची जणूकाही लाट आल्यासारखी स्थिती जाणवत असून कधी नव्हे ते पुणेकरांना खूप उकाडा जाणवतोय

Record high temperature Pune @ 43 Citizens are shocked by extreme heat sweat from the body | उच्चांकी तापमानाची नोंद, पुणे @ ४३ ! नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण, अंगातून घामाच्या धारा

उच्चांकी तापमानाची नोंद, पुणे @ ४३ ! नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण, अंगातून घामाच्या धारा

पुणे: यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ४१ अंश सेल्सिअसची नोंद पुण्यात गुरुवारी (दि.१८) झाली. त्यामुळे पुणेकर प्रचंड उकाड्याने हैराण झाले, नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. हडपसर, वडगावशेरी आणि कोरेगाव पार्क येथे तर ४३ अंशांवर तापमानाची नोंद झाली. ‘किती हे उकडतंय?’ असा सवाल पुणेकरांकडून विचारला जात आहे. शुक्रवारपासून (दि.१९) या कमाल तापमानात वाढ न होता, घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

दोन दिवसांपासून पुण्यात उष्णतेची जणूकाही लाट आल्यासारखी स्थिती जाणवत आहे. कधी नव्हे ते पुणेकरांना खूप उकाडा जाणवत आहे. दुपारच्या उकाड्यानंतर सायंकाळी हलक्या व मध्यम सरी कोसळल्याने काही प्रमाणात दिलासा देखील मिळत आहे. बुधवारी (दि.१७) पुणे शहर व जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. बारामतीला गेल्या २४ तासांमध्ये २१ मिमी, तर वडगावशेरीला १७.५ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या तीन-चार दिवस दुपारी उकाडा आणि सायंकाळी पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान विभागाचे माजी प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.

अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती असल्याने गुजरातकडून महाराष्ट्रावर आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहेत. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात कमाल तापमान आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. दिवसा प्रचंड उकाडा जाणवत असल्याने सायंकाळी ढगांची निर्मिती होते आणि कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. बुधवारी सायंकाळनंतर शहरात वडगावशेरी परिसरात आणि बारामतीमध्ये जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (दि.१८) बारामती परिसरात पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, हडपसर, वडगावशेरी, मगरपट्टा या भागांत किमान तापमान २७-२८ अंशांवर नोंदवले गेले. तर शिवाजीनगरला २४.१ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे रात्री देखील उकाडा प्रचंड जाणवत आहे. याच परिसरात कमाल तापमान ४३ अंशांवर नोंदवले गेले.

पुणे जिल्ह्यात २४ तासांतील पाऊस

बारामती : २१.०
वडगावशेरी : १७.५
शिवाजीनगर : ४.२
कोरेगाव पार्क : ३.०
मगरपट्टा : ३.०
पाषाण : २.९
लवळे : १.५

पुणे कमाल तापमान

हडपसर : ४३.५
वडगावशेरी : ४३.१
कोरेगाव पार्क : ४३.०
शिरूर : ४२.८
मगरपट्टा : ४२.४
चिंचवड : ४२.०
शिवाजीनगर : ४१.०
पाषाण : ४१.०
लोणावळा : ३६.८

शिवाजीनगरला हंगामातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर हडपसर, वडगावशेरी येथे ४३ तापमान होते. आता उद्यापासून (दि.१९) कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाही; पण पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, आयएमडी, पुणे

Web Title: Record high temperature Pune @ 43 Citizens are shocked by extreme heat sweat from the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.