Pimpri Chinchwad: मोबाइल ॲक्टिव्ह झाला अन् पोलिसांनी हस्तगत केला; १० लाखांचे ७० स्मार्ट फोन सापडले

By नारायण बडगुजर | Published: May 16, 2024 06:25 PM2024-05-16T18:25:17+5:302024-05-16T18:25:41+5:30

पिंपरी : गहाळ झालेल्या तसेच हरवलेल्या मोबाइल फोनच्या तक्रारींची माहिती संकलित केली. त्यातील ॲक्टिव्ह झालेले १० लाख १४ हजार ...

Pimpri Chinchwad: Mobile activated and seized by police; 70 smart phones worth 1 million found | Pimpri Chinchwad: मोबाइल ॲक्टिव्ह झाला अन् पोलिसांनी हस्तगत केला; १० लाखांचे ७० स्मार्ट फोन सापडले

Pimpri Chinchwad: मोबाइल ॲक्टिव्ह झाला अन् पोलिसांनी हस्तगत केला; १० लाखांचे ७० स्मार्ट फोन सापडले

पिंपरी : गहाळ झालेल्या तसेच हरवलेल्या मोबाइल फोनच्या तक्रारींची माहिती संकलित केली. त्यातील ॲक्टिव्ह झालेले १० लाख १४ हजार ७०० रुपयांचे ७० स्मार्ट फोन पोलिसांनी हस्तगत केले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात २०२३ व मार्च २०२४ या दरम्यान बरेच मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या. त्याबाबत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले. पथकाने गहाळ मोबाईलच्या तक्रारींची माहिती संकलित करून पोलिस अंमदलार प्रवीण कांबळे यांच्याकडे दिली. कांबळे यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलिस अंमलदार नागेश माळी व पोपट हुलगे यांच्याकडून अद्यावत माहिती प्राप्त केली. त्याचा तांत्रिक दृष्ट्या तपास करून, गहाळ झालेले जे मोबाईल ॲक्टिव्ह झाले आहेत त्याची माहिती संकलीत केली.

दरोडा विरोधी पथकातील अंमलदार यांना ॲक्टिव्ह मोबाईलच्या वापरकर्त्यांचे नाव व पत्ते दिले. पथकातील अंमलदारांनी ॲक्टिव्ह झालेले १० लाख १४ हजार ७०० रुपये किमतीचे ७० स्मार्ट मोबाईल हे अमरावती, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, सोलापूर इत्यादी जिल्हयातून हस्तगत केले. यात आयफोन, वन पल्स, विवो, मोटोरोला, सॅमसंग, रेड मी, नोकिया इत्यादी कंपन्यांचे मोबाईल फोन जमा केले. हस्तगत केलेले स्मार्ट फोन हे त्यांच्या मूळ मालकांना प्रदान करण्यात येणार आहेत.  

पोलिस आयुक्‍त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे १) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, उप निरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार प्रवीण कांबळे, महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, सागर शेडगे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलिस हवालदार नागेश माळी व पोलिस अंमदलार पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Pimpri Chinchwad: Mobile activated and seized by police; 70 smart phones worth 1 million found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.