दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार

By नितीश गोवंडे | Published: May 8, 2024 02:40 PM2024-05-08T14:40:24+5:302024-05-08T14:40:45+5:30

वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या ११ जणांना अटक

Informs the police about the robbery two people including a senior citizen are stabbed with a sword | दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार

दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार

पुणे : चोरी व दरोडा टाकल्याची खबर पोलिसांना देतो असा समज करुन ११ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. तसेच ‘आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ असे म्हणत एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार करुन जखमी केले. ही घटना हडपसर भागातील रामटेकडी येथील कोठारी व्हिल्सच्या बाजूला सोमवारी (दि. ६) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह ११ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पंजाबसिंग फौजिसिंग कल्याणी (६५, रा. कोठारी व्हिल्सच्या बाजूला, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रविसिंग शामसिंग कल्याणी, हुकूमसिंग रामसिंग कल्याणी, रामसिंग मोहनसिंग कल्याणी, अजयसिंग हुकूमसिंग कल्याणी, ऐलानसिंग रामसिंग कल्याणी, जिंदालसिंग रामसिंग कल्याणी, हिंदूसिंग रामसिंग कल्याणी, राजूसिंग रामसंग कल्याणी, निहालसिंग शामसिंग कल्याणी, सोनिहालसिंग शामसिंग कल्याणी, बसंतीकौर शामसिंग कल्याणी यांच्यावर आर्म अॅक्ट सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या शेजारी राहतात. चोरी व दरोडा घालत असताना त्याची खबर पोलिसांना देतो असा समज करुन आरोपींनी कटकारस्थान करुन बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी तलवार व इतर हत्यारे घेऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच आरोपी रविसिंग कल्याणी याने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात व पायावर तलवारीने वार करुन जखमी केले.
तर आरोपी हुकूमसिंग कल्याणी याने फिर्यादी यांच्या नातवाच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. हातातील हत्यारे हवेत उंचावून ‘आज यांची विकेटच पाडायची, कोणी त्यांना सोडवण्यास आले तर त्यांचीही विकेट टाकू. आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपींनी दिली. तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या व नातवाच्या दुचाकीवर दगड व विटा मारून नुकसान करुन इतर वाहनांची देखील तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी यांच्या मुलाला व नातवाला मुका मार लागला.

घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी ऐलानसिंग कल्याणी हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खोपोली, रायसनी, नेरळ पोलिस ठाण्यात ९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.

Web Title: Informs the police about the robbery two people including a senior citizen are stabbed with a sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.