महापालिकेतील भाजपा-सेना युती तुटली

By admin | Published: April 1, 2016 03:35 AM2016-04-01T03:35:39+5:302016-04-01T03:35:39+5:30

राज्यात विधानसभा निवडणुकांपासून भाजपा व शिवसेना पक्षामध्ये दरी पडायला सुरुवात झाली, तरी पुणे महापालिकेतील भाजपा व शिवसेनेच्या युतीला धक्का लागला

The BJP-Sena alliance broke into the municipal corporation | महापालिकेतील भाजपा-सेना युती तुटली

महापालिकेतील भाजपा-सेना युती तुटली

Next

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांपासून भाजपा व शिवसेना पक्षामध्ये दरी पडायला सुरुवात झाली, तरी पुणे महापालिकेतील भाजपा व शिवसेनेच्या युतीला धक्का लागला नव्हता. मात्र आगामी २०१७ ची पालिका निवडणूक जवळ येत असतानाच भाजपा व शिवसेनेची युती अधिकृतपणे तुटली असल्याची घोषणा भाजपाचे गटनेते गणेश बिडकर यांनी गुरुवारी केली. शिवसेनेने महापालिकेत सातत्याने असहकाराची भूमिका घेऊन युती संपुष्टात आणल्याचा आरोप बिडकर यांनी या वेळी केला.
महापौर व उपमहापौर पदासाठी काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. त्यानंतर झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी महापालिकेमध्ये विषय समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत होती. शिवसेनेने या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या उमेदवारांना सूचक व अनुमोदक उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये अर्जही भरता आले नाहीत. त्यामुळे महापालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचा भडका उडून अखेर युती संपुष्टात आणण्याचा निर्णय झाला.
याबाबतची भूमिका स्पष्ट करताना गणेश बिडकर म्हणाले, ‘‘विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेने एकत्र फॉर्म भरावेत याकरिता आम्ही शिवसेनेची वाट पाहिली. मात्र शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांना फोन केला असता ते निवडणुकीमध्ये तटस्थ राहत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे अनुमोदक व सूचक उपलब्ध न झाल्याने आम्हाला अर्ज भरता आले नाहीत. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला फायदा व्हावा म्हणून जाणीवपूर्वक तटस्थ राहून त्यांना बाय देण्याची खेळी खेळली आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा छुपा अजेंडा राबवित आहे. शिवसेनेच्या गटनेत्यांकडून सातत्याने सभागृहात राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत तांत्रिकदृष्ट्या काम करणे अवघड जात होते. विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता आम्ही शिवसेनेच्या गटनेत्यांशी तसेच शहरप्रमुखांशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.’’
महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वीच भाजपा व शिवसेनेमध्ये मोठी दरी पडली आहे. शहरामध्ये एक खासदार व ८ आमदार निवडून आल्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. महापालिकेत स्वबळावर सत्तेवर येण्याचा दावा भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे.
(प्रतिनिधी)

भाजपाकडूनच सहकार्य मिळाले नाही
भाजपाचे गटनेते गणेश बिडकर यांनी भाजपा व शिवसेनेची महापालिकेतील युती संपुष्टात आल्याचे सांगितल्याच्या
पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने आम्हाला विश्वासात न घेता दोन्ही पदांसाठी अर्ज भरले होते. त्यानंतर स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्ही तटस्थ राहिलो, तसेच विषय समित्यांच्या निवडणुकीतही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. भाजपाच्या भूमिकेनंतर पुढे काय करायचे याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.’’

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. शहरातून १ खासदार व सर्वच्या सर्व ८ आमदार भाजपाचे निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेशी युती न करता स्वबळावर लढण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील आघाडी मात्र भक्कम होतानाचे चित्र दिसून येत आहे. ४ वॉर्डांचा एक प्रभाग बनवून निवडणुका घेण्याचा प्रयत्न राज्यातील भाजपा सरकारकडून सुरू आहे. त्याला शिवसेनेने जोरदार विरोध दर्शविला आहे.

Web Title: The BJP-Sena alliance broke into the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.