हृदयद्रावक! चार वर्षांच्या चिमुरड्यासह आईची आत्महत्या; इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी

By नारायण बडगुजर | Published: April 20, 2024 10:22 PM2024-04-20T22:22:09+5:302024-04-20T22:22:34+5:30

वाकड येथील घटनेने खळबळ

Suicide of mother with four-year-old child; Jump from the eleventh floor of the building | हृदयद्रावक! चार वर्षांच्या चिमुरड्यासह आईची आत्महत्या; इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी

हृदयद्रावक! चार वर्षांच्या चिमुरड्यासह आईची आत्महत्या; इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : माझ्या लेकराला आणि मला कोणीतरी मारेल, माझ्यामागे भूत लागले आहे, अशी भिती वाटल्याने महिलेने तिच्या चिमुरड्यासह इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारली. यात चिमुरड्यासह तिचा मृत्यू झाला. वाकड येथील यमुनानगरमधील रेगलिया सोसायटीत शनिवारी (दि. २०) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली. 

कोमल जगदीश हरिश्चंद्रे (वय ३२) आणि विहान संकेत आवटे (वय ४) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि संकेत आवटे यांचा २०१८ मध्ये विवाह झाला. त्यानंतर संकेत हे नोकरीनिमित्त अमेरिकेत गेले. त्यावेळी कोमल देखील पती संकेत यांच्यासोबत अमेरिकेत गेली. दरम्यान कोमल यांना मानसिक आजाराचा त्रास सुरू झाला. मुलगा विहान आणि मला कोणीतरी मारेल, माझ्या मागे भूत लागले आहे, अशी त्यांना भिती वाटायची. त्यामुळे अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्यांना मानसिक त्रास सुरूच राहिल्याने त्या दोन दिवसांपूर्वी भारतात परतल्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येणार होते. त्यासाठी संबंधित डाॅक्टरांची वेळ देखील घेण्यात आली होती. त्यासाठी कोमल आणि त्यांचा मुलगा विहान हे दोघेही वाकड येथील यमुनानगर येथील त्यांच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सासूसासरे तसेच आईवडील देखील होते. 

दरम्यान, मानसिक त्रास जाणवत असल्याने कोमल यांना जास्त भिती वाटू लागली. त्यांनी शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास अकराव्या मजल्यावरून चिमुरड्या विहानसोबत उडली मारली. यात खाली पडून विहान आणि कोमल दोघेही जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात होते. काहीतरी पडले असल्याचा आवाज आल्याने शेजारच्यांनी सुरक्षारक्षकांना माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी कोमल यांच्या घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोमल आणि विहान यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  

अंतिम दर्शन नाहीच...

कोमल यांचे पती अमेरिकेत आहेत. कोमल आणि विहान यांच्या मृत्यूबाबत त्यांना माहिती देण्यात आली. मात्र, अमेरिकेतून येण्यास जास्त कालावधी लागत असल्याने कोमल आणि विहान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे संकेत यांना पत्नी आणि मुलाचे अंत्यदर्शन घडले नाही.

Web Title: Suicide of mother with four-year-old child; Jump from the eleventh floor of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.