Success Story : दोन मित्र, हंडीत विकायला सुरू केली बिर्याणी; आता उभं केलं ₹८४० कोटींचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 09:02 AM2024-03-22T09:02:17+5:302024-03-22T09:10:01+5:30

Success Story : फूड डिलिव्हरी उद्योगात खूप मोठी स्पर्धा आहे. यात एका स्टार्टअप कंपनीनं ८४० कोटी रुपयांहून अधिक किमतीचं साम्राज्य उभारण्यात यश मिळवलं आहे. जाणून घेऊया त्यांची यशोगाथा.

मेहनत करण्याची तयारी असेल तर यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. सध्या आपण पाहतोय की फूड डिलिव्हरी उद्योगात खूप मोठी स्पर्धा आहे. त्यात आपलं स्थान निर्माण करणं सोपं नाही. यात एका स्टार्टअप कंपनीनं ८४० कोटी रुपयांहून अधिक किमतीचं साम्राज्य उभारण्यात यश मिळवलं आहे.

या कंपनीचं नाव आहे बिर्याणी बाय किलो. २०१५ मध्ये कौशिक रॉय आणि विशाल जिंदाल यांनी या स्टार्टअपची पायाभरणी केली. ही स्टार्टअप कंपनी देशभरातील बिर्याणीप्रेमींसाठी एक पर्वणीच बनलं आहे. आज देशातील अनेक लोक या ब्रँडला ओळखतही आहेत.

बिर्याणी बाय किलोची सुरुवात अगदी छोट्या स्तरावर झाली. सुरुवातीला या ब्रँडची केवळ काही लाख रुपयांचीच बिर्याणी विकली गेली. पण त्यांच्या फाऊंडर्सचं व्हिजन मोठं होतं. फूड इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्याचा त्यांना आत्मविश्वास होता. पारंपारिक पद्धतींचा वापर करून बिर्याणी तयार केली तर निष्ठावान ग्राहकवर्ग तयार केला जाऊ शकतो असा त्यांचा विश्वास होता आणि तो योग्यही ठरला.

बिर्याणी बाय किलोची चार प्रकारची बिर्याणी प्रसिद्ध आहे. यामध्ये हैदराबादी, लखनौवी, कोलकाता आणि गुंटूर यांचा समावेश आहे. प्रत्येकाची स्वतःची खासियत असते. या सर्व प्रकारची बिर्यांणींची चवही निराळी आहे. ऑथेंटिंक रेसिपीचा वापर करून हे तयार केलं जातं. बिर्याणी सोबतच, कंपनी आपल्या ग्राहकांना कबाब, कोरमा आणि डेझर्टसह इतर पदार्थही ऑफर करते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला दर महिन्याला २२-२५ कोटी रुपयांचा चांगला महसूल मिळतो. सतत वाढत जाणारी मागणी पूर्ण करण्यासाठी, बिर्याणी बाय किलोनं देशभरातील ४५ हून अधिक शहरांमध्ये १०० हून अधिक आऊटलेट्सपर्यंत आपला विस्तार केला आहे. सध्या त्यांचं साम्राज्य ८४० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

बिर्याणी बाय किलोच्या बिर्याणीची लोकप्रियता बिग बॉस शो पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये स्पर्धकांनीही या बिर्याणीचा आस्वाद घेतला होता. ब्रँडची यशोगाथा ही फूड इंडस्ट्रीतील नव्या उद्योजकांसाठी प्रेरणा देणारी आहे.