Post Office च्या 'या' स्कीममध्ये ५ वर्षांपर्यंत महिन्याला मिळतील ₹२०,५००; खर्चाचं 'नो टेन्शन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 08:44 AM2024-04-12T08:44:28+5:302024-04-12T09:00:59+5:30

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक स्कीम्स आहेत ज्या तुम्हाला महिन्याला उत्पन्न देऊ शकतात. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये अनेक स्कीम्स आहेत ज्या तुम्हाला महिन्याला उत्पन्न देऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या अशाच एका स्कीमचं नाव आहे सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळतं. मात्र, या योजनेत काही अटी व शर्ती आहेत. पोस्ट ऑफिस मासिक योजनेत किती गुंतवणुकीवर तुम्हाला किती पैसे मिळतील ते जाणून घेऊ.

सध्या जितका आपल्याला पैसा महत्त्वाचा असतो तितकाच तो रिटायरमेंटनंतरही गरजेचाच असतो. रिटायरमेंटनंतर कामाला यावा यासाठी पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला व्याजाचाही फायदा मिळतो आणि रक्कमही वाढत राहते. सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (Senior Citizen Saving Scheme- SCSS) प्रामुख्यानं अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही किमान १००० रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणूकदार यामध्ये जास्तीत जास्त ३० लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्हाला दरमहा मिळणारे पैसे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असतील. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 80C अंतर्गत सूटदेखील मिळते.

पोस्ट ऑफिसची ही योजना ६० वर्षे वयाच्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळेल. ही योजना व्हीआरएस घेतलेल्यांसाठीही आहे.

या योजनेवर सरकार सध्या ८.२ टक्के दराने व्याज देत आहे. या योजनेत, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रितपणे १५ लाख रुपये जमा केल्यास ते प्रत्येक तिमाहीत १०,२५० रुपये कमवू शकतात.

५ वर्षात तुम्हाला फक्त व्याजातून २ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही तुमचे निवृत्तीचे पैसे म्हणजे जास्तीत जास्त ३० लाख रुपये यामध्ये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक २,४६,००० रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला मासिक आधारावर २०,५०० रुपये आणि तिमाही आधारावर ६१,५०० रुपये मिळतील.