भरघोस व्याज अन् पैसेही राहतील सुरक्षित; पाहा पोस्ट ऑफिसच्या 'या' खास योजना...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 07:29 PM2024-05-10T19:29:02+5:302024-05-10T19:32:24+5:30

तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असाल, तर या योजनेत गुंतवणूक करू शकता.

Post Office Best Schemes: भविष्यातील आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी होईल तितक्या लवकर पैशांची बचत करणे गरजेचे आहे. सध्या बाजारात बचतीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. पण कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी एक प्रश्न मनात येतो की, योजनेत आपले पैसे किती सुरक्षित असतील. अशा परिस्थितीत बहुतांश लोक सरकारी योजनांकडे वळतात. Posr Office हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. यातील रकमेवर अधिक व्याज तर मिळेलच, परंतु पैसेदेखील पूर्णपणे सुरक्षित राहतात.

किसान विकास पत्र (KVP)- या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.5% व्याज मिळेल. या योजनेत तुम्ही 9.7 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम दुप्पट होईल. यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी कोणतीही अट नाही. तुम्ही रु. 1000 पासून कितीही रक्कम जमा करू शकता.

नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट अकाउंट (NSTDA)- या योजनेअंतर्गत एक वर्ष (6.9%), दोन वर्षे (7%), तीन वर्षे (7.1%) आणि पाच वर्षांसाठी (7.5%) पैसे गुंतवले जाऊ शकतात. यामध्येही किमान मर्यादा 1000 रुपये आहे, तर कमाल मर्यादा नाही. योजनेची मुदत संपल्यानंतर रक्कम पुन्हा जमा करावी लागते. तसेच, हे 6 महिन्यांपूर्वी यातील पैसे काढता येत नाहीत.

सीनिअर सिटीझन सेव्हिंग (SCSS)- ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ज्यामध्ये वार्षिक 8.2% व्याज मिळते. मात्र हे व्याज पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळेल. हे खाते एक वर्षापूर्वी बंद केल्यास व्याज दिले जाणार नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वय किमान 60 वर्षे असावे, तसेच किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये या योजनेत जमा करता येतील.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)- या योजनेतील पैसे पाच वर्षांत मॅच्युअर होतात. या योजनेत तुम्हाला वार्षिक 7.7% व्याज मिळेल, परंतु हे व्याज केवळ मॅच्युअरिटीनंतरच मिळते. या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते, तर गुंतवणूकीसाठी कमाल मर्यादा नाही.

पब्लिक प्रॉव्हिडेंड फंड (PPF)- 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही भारतीय व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. 18 वर्षाखालील लोकांना हे खाते त्यांच्या पालकांच्या नावाने उघडावे लागते. यामध्ये व्याज दर 7.1% असून, 15 वर्षांचा मॅच्युरिटी टाईम आहे. यामध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता. या खात्यातून एका वर्षाच्या कालावधीनंतर कर्जही घेता येते.