कचऱ्यातल्या वस्तूंचं पुढं काय होतं?

By admin | Published: March 15, 2017 06:50 PM2017-03-15T18:50:01+5:302017-03-15T19:24:26+5:30

आपण ढीगभर वस्तू घेतो आणि फेकतो पसारा वाढला की. जगभरात बहुतांश लोक असंच वागतात. पण मग त्यातून होणाऱ्या कचऱ्याचं पुढे काय होतं?

What was the next thing in the trash? | कचऱ्यातल्या वस्तूंचं पुढं काय होतं?

कचऱ्यातल्या वस्तूंचं पुढं काय होतं?

Next

-  प्रज्ञा शिदोरे  

आपण ढीगभर वस्तू घेतो आणि फेकतो पसारा वाढला की. जगभरात बहुतांश लोक असंच वागतात. पण मग त्यातून होणाऱ्या कचऱ्याचं पुढे काय होतं? 

आपल्याकडे किती वस्तू असतात. जरा पसारा आवरायला, घर लावायला काढा म्हणजे अंदाज येईल की जरा अतिच वस्तू असतात आपल्याकडे. या वस्तू आपण वापरतोच असं नाही. पण नुसत्या साठवून ठेवतो. एकतर गरज नसताना विकत घेतो, मग वापर संपला, गरज भागली किंवा हौस भागली की घरात कुठेतरी त्या पडून असतात. याहून वाईट म्हणजे आधी भरमसाठ वस्तू घ्यायच्या आणि नंतर त्या काहीही पुढचा-मागचा विचार न करता टाकून द्यायच्या! अनेकवेळेला आई आपल्याला ओरडत असते की केवढा तो पसारा!! तेव्हा कुठे आपली ट्यूब पेटते आणि आपण एकदम सगळं कचऱ्यात टाकून देतो. पण हे सगळं कचऱ्यात टाकलेलं कुठं जातं, त्याचं पुढं काय होतं? माहितेय? याच प्रश्नांनी अ‍ॅनी लेनर्डला ग्रासलं होतं. ती अमेरिकेच्या ग्रीनपीस नावाच्या संस्थेमध्ये काम करत असे. तिथून सुटी घेऊन ही १० वर्षे जगभर फिरली. वेगळ्या-वेगळ्या देशांमध्ये कचऱ्याचं काय करतात हे बघत हिंडली. तिने नद्यांची गटारं झालेली पाहिली, प्रचंड मोठ्या भूभागावर कचरा पसरलेला पाहिला. त्या कचऱ्याने आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांचे हाल कसे होतात, त्यांना कोणत्या रोगांना सामोरं जावं लागतं असे सारं सारं पाहिलं. त्यावर अभ्यास केला. आणि या सगळ्या कचऱ्यात सगळ्यात जास्त भाग प्लॅस्टिकचा आहे हेही तिला समजलं. या सगळ्या प्रकरणात तिच्या हे लक्षात आलं की आपण कचऱ्याच्या समस्येमुळे किंवा आपल्याच हव्यासामुळे म्हणा आपण स्वत:चेच हाल करतो. आणि पृथ्वीवर कधीही भरून येणार नाहीत असं नुकसान करतो आहोत. कदाचित आपल्या पुढच्या पिढ्या या पृथ्वीवर राहूच शकणार नाही अशी सोय (?) आपण करून ठेवली आहे! या भावनेनं, या विचारानं एका लहान मुलीची आई असलेल्या अन्ॉीला झपाटलं. याबद्दल काहीतरी ठोस करायचंच असं तिने ठरवलं. आपल्या आजच्या पद्धती योग्य नाहीत, त्याने जगाला त्रासच होतो आहे, आपण असं केवळ उपभोग घेत बसलो तर काही खरं नाही. पण हे सगळं लोकांना कळलं तर लोकं आपले मार्ग बदलतील, त्यांच्या सवयी बदलतील हेही तिच्या लक्षात आलं. हे बदल घडवण्यासाठी आणि लोकांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी एक २० मिनिटांचा लघुपट तयार केला. हा लघुपट ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशनचा वापर करून अतिशय रंजक पद्धतीने तयार केला. या तिच्या लघुपटाला प्रचंड प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. काही महिन्यातच तीन कोटी लोकांनी हा लघुपट यूट्यूबवर पाहिला होता. तिने कॉपीराईटच्या काही भानगडी ठेवल्या नसल्यामुळे अनेक शिक्षकांनी शाळेतल्या मुलांना हा लघुपट आवर्जून दाखवला. एवढा मोठा प्रतिसाद बघून हा विषय लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि लोकांना याबद्दल काहीतरी वाचायला, शिकायला किंवा करायला नक्कीच आवडेल असं तिला वाटलं आणि त्यातून जन्माला आला ‘द स्टोरी आॅफ स्टफ प्रोजेक्ट’. या प्रकल्पातर्फे २००९ पासून याच प्रकारच्या विविध विषयांवर लघुपट तयार केले जातात. सोपी भाषा, सहज समजेल असं विश्लेषण यामुळे हा विषय अनेकांपर्यंत पोहोचू शकला. या लघुपटांबरोबरच स्टोरी आॅफ स्टफ प्रोजेक्टच्या संकेतस्थळावरून तुम्हाला पर्यावरण, उपभोक्तावादी अर्थव्यवस्था, कचरा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यासारख्या विषयांमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही या संकेतस्थळावरून त्यांना संपर्क साधू शकता आणि सहभागी होऊ शकता. एकदा यातले लघुपट नक्की बघा. कोणास ठाऊक, कदाचित हीच आपल्या चांगल्या भविष्याची सुरुवात असेल. आपल्यापैकीच कोणीतरी हे वाचून प्रेरणा घेऊन भारतामध्ये मेधा पाटकर किंवा राजेंद्र सिंग यांच्यासारखं काम उभं करेल. कोणास ठाऊक..

Web Title: What was the next thing in the trash?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.