निसर्गाच्या प्रेमात पडलेला एक तरुण दोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:43 PM2018-07-05T16:43:39+5:302018-07-05T16:44:27+5:30

शाळकरी वयात त्याला निसर्गाची, पानाफुलांसह सापांचीही गोडी लागली. आणि आता तो त्यांच्या मदतीला धावतोय.

Rishabh shah, A young man in love with nature | निसर्गाच्या प्रेमात पडलेला एक तरुण दोस्त

निसर्गाच्या प्रेमात पडलेला एक तरुण दोस्त

Next
ठळक मुद्देऋषभने त्याच्या तज्ज्ञ मित्रांबरोबर 300हून अधिक सापांची सुटका केली आहे.

- ओंकार करंबेळकर 

शाळकरी वयातच एखाद्या मुलाला निसर्गाची ओळख करून देणार्‍या उत्तम कार्यक्रमात सहभागी होता आलं तर त्याचं आयुष्य कसं बदलून जाईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋषभ शाह.  आता मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये राहणार्‍या मुलांचं शालेय जीवन फक्त शाळा आणि घर एवढय़ा परिघातच जात असतं. कधीकाळी सुटीच्या दिवशी किंवा मोठय़ा सुटय़ांमध्ये शहराबाहेर गेल्यावर जो काही निसर्ग डोळ्यांसमोर बाहेर पडेल तेवढाच. फार तर टीव्हीवर प्राण्यांच्या संबंधित कार्यक्रम पाहून निसर्गज्ञानाची भूक भागवावी लागते. ऋषभ शाहच्या शाळेच्या वेळेस अशीच स्थिती होती. शाळा आणि महाविद्यालयांबरोबर निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित काम करणार्‍या संस्था नव्या उत्साही मुलांचं पालन करत असतात, त्यांना निसर्गशिक्षण देत असतात. आज आपल्याकडे पर्यावरण क्षेत्रात उत्तम काम करणार्‍या तज्ज्ञांची त्याच्या कामाची सुरुवातही अशीच झालेली आहे.
    आठवीत असताना ऋषभच्या शाळेत अचानक आपली शाळा ग्रीन ड्राइव्ह करण्याच्या विचारात आहे अशी घोषणा करण्यात आली. या मोहिमेमध्ये मुंबईतल्या पर्यावरण मित्र रहिवासी सोसायटय़ा शोधून त्यांच्या परवानगीने वृक्षारोपण करण्यात येणार होते. ऋषभला हे काहीतरी वेगळं वाटलं. त्यानं  आपल्याच सोसायटीच्या सेक्रेटरीची परवानगी मिळवली आणि वृक्षारोपणाची सुरुवात त्याच्याच घरापासून झाली. त्याच्या या असल्या धडपडीला ओळखून शाळेने पुढच्या वर्षी त्याला विद्यार्थी मंडळात पर्यावरण मंत्री म्हणून नेमलं. 
ऋषभ म्हणतो, खरं तर मला तेव्हा पर्यावरण वगैरेची फारशी माहिती नव्हती. पण पर्यावरण मंत्री म्हणून नेमल्यानंतर मी किड्स फॉर टायगर्स, ट्रेक्स, स्पर्धा आयोजित करू शकलो. त्यामुळे मित्रांबरोबर त्याच्याही निसर्गज्ञानात भर पडू लागली. याच कार्यक्रमांच्या आयोजनात त्याचा विविध एनजीओंशी संबंध आला. यामध्ये त्याची पहिली ओळख झाली सर्प या संस्थेच्या चैतन्य कीर आणि संतोष शिंदे यांच्याशी. या दोघांबरोबर राहून ऋषभने सापांची माहिती घ्यायला सुरुवात केली. अल्पावधीतच त्याला साप ओळखता येऊ लागले. घरांमध्ये आलेल्या सापांची सुटका करायलाही तो तेव्हाच शिकला. या कामामुळे त्याला शहराबाहेर पडून जंगलात फिरता आलं, नव्या लोकांना भेटता आलं, प्राण्यांना ओळखणं शक्य झालं. पण नवा छंद घरच्या लोकांना थोडा त्रासदायक वाटू लागला. यामुळे त्याचं अभ्यासातून लक्ष उडेल अशी भीती त्यांना वाटत होती. पण त्याचा फारसा परिणाम अभ्यासावर झाला नाही. 
    कॉलेजमध्ये गेल्यावर ऋषभने ‘सर्प’च्या मदतीने मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या महेश यादव आणि भूषण जाधव यांच्यामुळे जंगलातील विविध प्रजातींची माहिती त्याला मिळाली आणि वन्यजीवांच्या फोटोग्राफीचा नवा छंद त्याला मिळाला. आपला मुलगा निसर्गाशीच संबंधित काहीतरी करणार हे त्याच्या पालकांच्या एव्हाना लक्षात आलं होतं. एकेकाळी त्याचं साप हाताळणं त्यांना आवडायचं नाही; पण सापांची सुटका करण्याचं महत्त्व त्यांना समजल्यावर त्यांनी त्याला परवानगी दिली. त्याच्या वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची तीन प्रदर्शनंही झाली आहेत. चैतन्य कीरकडून अडचणीत सापडलेल्या प्राण्यांची सुटका कशी करायची, हे त्यानं शिकून घेतलं. आजवर त्यांनी अनेक सापासारखे सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राण्यांची सुटका केली आहे. दररोज त्यांना प्राण्यांची सुटका करण्याबद्दलचे किमान 14 तरी फोन येतात. त्यात बहुतांशवेळा सापासाठी आलेले फोन असतात. ऋषभने त्याच्या तज्ज्ञ मित्रांबरोबर 300हून अधिक सापांची सुटका केली आहे. सर्प, बीएनएचएस, बर्ड हेल्पलाइन, मिशन ग्रीन मुंबई, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जे. वाय, डिस्कव्हरी एन्व्हायरो, वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो अशा विविध संस्थांशी तो जोडला गेला आहे.
    आज ऋषभ पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पर्यावरण आणि वन्यजीवांसंदर्भातील पत्रकारिता करण्याची त्याची इच्छा आहे. 2016 साली त्यानं नॅट्रावाइल्ड नेटवर्क नावाची एनजीओ स्थापन केली. या संस्थेने नुकतीच महासागर आणि त्यांच्या स्थितीवर एक माहितीपट तयार केला आहे. तो म्हणतो, मुंबईत राहणार्‍या 90 टक्के मुलांना मुंबईतल्याच जैवविविधतेची माहिती नसते. या मुलांनी मुंबईतल्या झाडांची, पशू-पक्ष्यांची माहिती मिळवायला हवी. मीसुद्धा त्यांची माहिती मिळवत आहे. शक्य झाल्यास मी मुंबईच्या जैवविविधतेवर पुस्तक लिहिणार आहे.

Web Title: Rishabh shah, A young man in love with nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.