व्हॉट्सअॅपवर चुकीचं फॉरवर्ड मारलं तर, डायरेक्ट तुरुंगच!

By admin | Published: October 20, 2016 05:06 PM2016-10-20T17:06:29+5:302016-10-20T17:06:29+5:30

समाजात तणाव निर्माण होईल, कुणाची बेअब्रू होईल असे मेसेज तयार करणाऱ्यांपासून सरसकट पुढे ढकलणाऱ्यांपर्यंतच्या सर्रास पोस्टना आता कायद्याचीच तंबी!

If wrong leads on WhatsAppAds, Direct Prison! | व्हॉट्सअॅपवर चुकीचं फॉरवर्ड मारलं तर, डायरेक्ट तुरुंगच!

व्हॉट्सअॅपवर चुकीचं फॉरवर्ड मारलं तर, डायरेक्ट तुरुंगच!

Next
>मनीषा म्हात्रे
 
आलं आपल्या फोनवर काही की मार फॉरवर्ड, ढकल पुढे असं अनेकजण करतात. मात्र ही ढकलगाडी पुढे पाठवताना आपण खरीच माहिती पुढे पाठवतो आहोत का, याचा विचार ते करत नाहीत. अनेक ग्रुपमधले कुणाकुणाला काय काय फॉरवर्ड करतात, पोस्ट करतात हे त्या ग्रुप अ‍ॅडमिनला माहितीही नसतं. त्यातून अफवांच्या लाटा फुटतात, जातीय-धार्मिक तणाव वाढतात, समाजात ताण निर्माण होतो..आणि आता मात्र, ‘असे उद्योग’ करणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर आहे. खोटी माहिती, अफवा पसरवल्या तर सायबर लॉनुसार एका चुकीच्या मेसेजमुळे तीन वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते..
 
हरवलेली मुलगी सापडली..
गावात बाळ चोरी करणारी टोळी आलीए...
चड्डी बनियान गॅँगचा धुमाकूळ...
दंगलीत मुलाचा मृत्यू..
अमुकतमुक देवाचा हा मेसेज ११ जणांना पाठवा, नाही तर अनर्थ घडेल..
अशा अनेक मेसेजेस आणि अफवांचं सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर पेव फुटलं आहे. 
आलं आपल्या फोनवर काही की मार फॉरवर्ड, ढकल पुढे असं अनेकजण करतात.
मात्र ही ढकलगाडी पुढे पाठवताना आपण खरीच माहिती पुढे पाठवतो आहोत का, याचा विचार मात्र ही मंडळी करत नाहीत. केअरिंग, शेअरिंग, फॉरवर्डिंगमध्ये या अफवांच्या लाटा फुटतात आणि तरुण मुलांची विचार करण्याची ताकदच त्यात हरवत जाते, असंच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आपल्यापर्यंत आलेली पोस्ट फॉरवर्ड करणं म्हणजे आपल्या हुशारीचा आणि अपडेट असल्याचा नमुना असं कदाचित या मंडळींचं होत असावं. मात्र हीच अतिहुशारी कुठे दंगल घडवतेय, तर कुठे जातीय तणावात निष्पापांचे बळी घेतेय याची जाणीवच अनेकांना नाही. 
इतके दिवस हे सारं सर्रास चाललं. आता मात्र डोकं ताळ्यावर ठेवलं नाही तर कोठडीची हवा खावी लागू शकते. फॉरवर्ड करण्यापूर्वी, वाट्टेल ते पसरवण्यापूर्वीच थांबा नाही तर सरळ तुरुंगाची हवा खाण्यास तयार व्हा, असं सांगणारी सायबर कायद्याची बारीक नजर आता आपल्यावर असणार आहे!
खरंतर अगदी सहज अ‍ॅक्सेस करता येणारं व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप्लिकेशन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. गुड मॉर्निंग ते गुड नाईटपर्यंतच्या प्रवासातील रोजची मौजमस्ती इथं शेअर होते. पण जेव्हा सामाजिक तणावाच्या वेळी अफवांचं पीक येतं, ते पेरलं जातं तेव्हा जे उद्रेक होतात त्याचं काय? व्हॉट्सअ‍ॅपवरील अफवांची भर पडल्यानं तणाव वाढले, उद्रेक वाढले आणि यात अनेक निष्पापांना फटका बसला. नाशिक शहरात तर काही दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवावी लागली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या सात ग्रुप अ‍ॅडमिनला नाशिकमध्ये पोलिसांनी अटक केली. मुळात या समाजकंटकांनी सर्वांनाच धार्मिक तेढ निर्माण होईन अशा आशयाचे मेसेज शेअर केले होते, तर काहींनी मस्ती म्हणूनही या मेसेजला खतपाणी घातलं. यात नोकरी करणाऱ्या तसंच कॉलेज विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. खरंतर हे मेसेज कुणी टाकले हे शोधून काढणं म्हणजे पोलीस यंत्रणेसाठी नदीचा उगम शोधण्यासारखंच अवघड होतं. मात्र नाशिक सायबर क्राईमचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी त्यांच्या दोन एपीआय, दोन पीएसआय यांच्यासह सात पोलीस अंमलदार यांचं पथक तयार केलं. ‘ते’ मेसेज पाठविणारा म्होरक्या शोधण्यासाठी त्यांनी ज्याच्याकडून मेसेज आला त्याला शोधलं. त्याच्याकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे या साखळीनुसार त्यांनी मेसेजच्या म्होरक्याला बेड्या ठोकल्या. शिवाय नाशिक पोलिसांकडे असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारेही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याकडे असलेल्या सॉफ्टवेअरचीही यात विशेष मदत झाली. अंबड, सातपूर आणि गंगापूररोड येथून या सात जणांना अटक केल्याची माहिती नाशिक सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी दिली.
काही जणांनी ग्रुप तयार करून आपल्या भावना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवित, त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून असे मेसेज पसरविल्याचं आरोपींच्या चौकशीत समोर आलं. 
अटकेनंतर चुकीची जाणीव झालेल्यांनी ‘चूक झाली साहेब...’ एवढंच बोलून हात वर केले. मात्र समाजात तणाव निर्माण करणाऱ्या, अनेक सामान्यांसह पोलिसांनाही जखमी करणाऱ्या या गोष्टींनी मिळवलं काय, असा प्रश्न आहेच. टोकाचे जातीय विद्वेष पसरवणारे अनेक मेसेजेसही सध्या सर्रास फिरतात. ते वाचतानाच ही ढकलगाडी आपल्यापाशीच थांबवता नाही का येणार, असा प्रश्न ज्यानं त्यानं स्वत:ला विचारायला हवा.
गेल्या वर्षी जानेवारीत लालबाग-परळमध्येही जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यातून काही ठिकाणी तोडफोड, मारहाणीचे प्रकार घडले. क्षणात या घटनेची माहिती सर्वदूर पसरली. विशेष म्हणजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पाय फुटले. त्या परिस्थितीत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया स्वत: दंडुका घेऊन रस्त्यावर उतरले. सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांविरोधात तर त्यांनी धडक मोहीम उघडली. दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल साइट्सवरून आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून वेगाने पसरत होते. अनेकांनी राज्याबाहेर घडलेल्या दंगलींचे फोटो आणि व्हिडीओ लालबागचे असल्याचे सांगत अफवा पसरवण्याचं काम केलं. भावना दुखावल्या गेल्याचा बनाव करत धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रयत्नही काही समाजविघातकांनी केले. त्याचे दुष्परिणाम वेळीच लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले. अफवांचे हे पेव थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल ५० लाख एसएमएस मुंबईभर पाठवले. तसेच कायदा सुव्यस्थेला धोका निर्माण करणाऱ्या एक हजारपेक्षा जास्त पोस्ट्स आणि वेबसाइटही तातडीने बंद केल्या. त्या काळात ४८ तासांची संचारबंदी लागू केली होती. पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर चुकीची माहिती पसरवणं याअंतर्गत एक गुन्हाही दाखल केला होता.
ही झाली काही अलीकडची वानगीदाखल उदाहरणं. मात्र अफवांमुळे जर तणाव, जातीय तेढ, गैरसमज, अंधश्रद्धा वाढत असतील तर त्याला लगाम घालणं गरजेचंच आहे. खरंतर ज्या माध्यमामुळे आपण लांब असलेल्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींपासून जिवलगांच्या संपर्कात राहू शकतो, कार्यालयीन कामकाजात ज्याची मदत होते त्याच माध्यमात जेव्हा अशा अफवा येतात, तेव्हा त्या पुढे पाठवताना आपण बातमीची शहानिशासुद्धा करत नाही. दिवसातून बऱ्याच वेळेला आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर हे वेगवेगळे अफवा असणारे मेसेज येत असतात आणि आपणसुद्धा शहानिशा न करता ते पुढे पाठवतो. खरे तर पुढे पाठविताना आपला हेतू काही चुकीचा असतोच असं नाही; पण तरी यातून आपणसुद्धा अफवा पसरवायला हातभार लावतो आहे, याची जाणीवही आपल्याला नसते. परिणामी, स्वत:वर अथवा आपल्या ग्रुप अ‍ॅडमिनवर (ग्रुप तयार करणाऱ्यावर) गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे आपण इतरांना दोष न देता अशावेळी स्वत: सावध राहणं गरजेचं आहे, असं सायबर सेल मुंबईचे पोलीस उपआयुक्त सचिन पाटील सांगतात.
व्हॉट्सअ‍ॅपसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या तरुणाईला अफवांपासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांकडून सध्या विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप तयार केला आहे. अफवांबद्दलची वस्तुस्थिती सांगण्यास सुरुवात केली. पोलीस ठाणी, चौकीस्तरांवरही ग्रुपचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये सामाजिक कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, मोहल्ला समितीचे सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. आजही बऱ्याच ठिकाणी या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा वापर केला जातो.
हे सारं पोलिसांच्या टप्प्यातलं काम सुरू असलं तरी व्हॉट्सअ‍ॅप सहज वापरणाऱ्या आपणही जरा डोळसपणे विचार करत, खांद्यावरचं डोकं वापरलं तर अफवा पसरवण्याच्या कामी आपल्याला कुणी वापरून घेणार नाही. आपण अफवांचे वाहक ठरणार नाही.
आणि हे इतकंच नव्हे, तर असा गुन्हा केल्यानं पोलीस चौकशीचा ससेमिरा आपल्यामागे लागणार नाही..
सावध राहणं, विचारपूर्वक यांत्रिक समाजमाध्यमं वापरणं हा एकमेव पर्याय आपल्यापुढे आहे!
 
 
 
अफवांचे असेही काही प्रताप...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे भुताच्या अफवेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी चक्क घरी परतण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार चिंचोली येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडला. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीती बघावयास मिळत आहे. एक एक करून वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले सामान घेत घराकडे पलायन केले. यामुळे संपूर्ण वसतिगृहच ओसाड झाले आहे. आतापर्यंत १२५ विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडल्याचा प्रकार घडला होता.
 
आर्ची आली आणि शाळेला दांडी
नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी सैराट फेम प्रणिता ऊर्फ पिंकू राजगुरू अर्थात आर्ची येणार असल्याच्या अफवेने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहस्रकुंडाकडे धाव घेतली. व्हॉट्सअ‍ॅपवरून ही पोस्ट व्हायरल झाली आणि लाइक आणि कमेंटचा वर्षाव सुरू झाला. आर्ची येणार.. हा विषय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणाईपर्यंत पोहोचल्याने २२ व २३ जुलै रोजी विद्यार्थी व तरुणांनी शाळेला दांडी मारून, तर कुणी सुट्टी घेऊन सहस्रकुंड गाठले. ते आर्चीच्या प्रतीक्षेत सायंकाळपर्यंत वाट पाहत बसले. अखेर रात्री उशिरापर्यंत आर्ची न आल्याने ते घरी परतले. 
 
भांडुपकरांची झोप उडवली...
गेल्या वर्षी भांडुपमध्ये चड्डी बनियान गॅँग शिरल्याच्या वृत्ताने भांडुपकरांची झोप उडाली. रात्री-अपरात्री पहारा वाढला. एवढे कमी की काय, चोराच्या शोधासाठी ते मशाली घेऊन रस्त्यावर उतरले. मात्र प्रत्यक्षात कोणी न पाहणाऱ्या गॅँगला फक्त व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चर्चांमुळे अस्तित्व मिळाले होते. यालाच खरे मानून भांडुपकर जीव मुठीत धरून राहत होते. यादरम्यान पोलिसांची डोकेदुखी वाढली. तपासादरम्यान कोणीतरी खोडसाळपणात हा प्रकार केल्याचे समोर आले. 
 
फॉरवर्ड करण्यापूर्वी हे तपासाल?
* अश्लील किंवा बदनामीकारक माहितीला दाद देऊ नका 
किंवा ती एकमेकांशी शेअर करू नका.
* व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली माहिती तपासूनच पुढे फॉरवर्ड करा.
* आपल्या मुलीच्या, मुलाच्या संदर्भात जर कुणी खोडसाळ माहिती पाठवत असेल तर पालकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क करायला हवा. 
* मजकूर चुकीचा आणि धार्मिक भावना दुखावणारा वाटला तर पोलिसांकडे तक्रार करा.
 
एक मेसेज आणि तीन वर्षांची कोठडी...
व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्यास बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याबद्दल आरोपीवर खटला दाखल करता येतो. आरोपीला सहा महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार तीन लाखांपासून ते १० लाखांपेक्षा जास्त दंडाची तरतूद या शिक्षेत आहे. मजकूर ज्या ग्रुपमधून प्रसारित झाला, त्याचा अ‍ॅडमिन व मजकूर प्रसारित करणारी व्यक्ती दोघेही शिक्षेस पात्र ठरतात. 
- अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर
 
ही तर सोशल मीडियाची नशा...
सोशल मीडियाच्या नशेमुळे तरुणाईमधील सामाजिक शहाणपण हरवत चाललं आहे. कुठेतरी आपल्या कृत्यामुळे समाजावर काय परिणाम होईल याचं भान त्यांना नाही. आपल्या वागणुकीचा, कृत्याचा समाजावर किती वाईट परिणाम होऊ शकतो याची जाणीव त्यांना नाही. नशेच्या या खेळात ते खेळत आहेत. त्यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे. आताच्या पिढीला हे शहाणपण आणण्यासाठी जनजागृतीची जोड देणं गरजेचं आहे. शाळा-कॉलेजमध्ये याबाबत जागृती करणं, शिवाय कधी तरी पालकांनीही मुलांच्या मोबाइलमध्ये डोकवायला हवं. प्रेमानं नेमकं काय चाललंय हे विचारयला हवं. ते चुकत असतील तर त्याची जाणीव करून द्या. हा चेकिंग पॉइंट येणं गरजेचंआहे.
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ
 
(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहेत.)

Web Title: If wrong leads on WhatsAppAds, Direct Prison!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.