अपने मे है दम...

By admin | Published: February 1, 2017 03:53 PM2017-02-01T15:53:47+5:302017-02-01T15:53:47+5:30

लोकांचं कसं सगळं चांगलं होतं, माझाच प्रॉब्लेम आहे. माझ्यातच काहीतरी घोळ आहे, माझ्याच मागे कटकटी, माझ्यातच काहीतरी कमी आहे... असं म्हणून छळता ना तुम्ही स्वत:ला? ते कशाला?

I have your own | अपने मे है दम...

अपने मे है दम...

Next

 स्लग सेल्फी 

काय चाल्लंय आपल्या डोक्यात आणि आयुष्यात याची टोटल लावायचा प्रयत्न


मी अमुक गोष्ट करू शकणार नाही, 
अमुक बोलू शकणार नाही, 
बोललो तरी कुणाला ते कळणारच नाही, 
माझा प्रॉब्लेमच खूप वेगळा आहे, 
‘माझाच’ प्रॉब्लेम खूप मोठा आहे... 
इतरांचं आयुष्य किती छान आहे...
- हे असं सगळं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वाटत असतं. तरुणपणी तर फार जास्त वाटतं. ये सब होता हैं. सब के साथ होता हैं. ये सब ठीक हैं...
होतं काय आपण इतरांच्या तुलनेत स्वत:ला अनेकदा जोखत असतो. त्यानं अमुक ब्रॅण्ड वापरला, तर आपल्याकडेही तो येतो. तिने अमुक प्रकारचा मोबाइल घेतला तर आपल्यालाही तसा हवा असतो. पण अशीच तुलना जर आपली आई-वडिलांनी इतरांसोबत केली तर आपला स्वाभिमान दुखावतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, हे आई-वडिलांनी समजून नको का घ्यायला, असं मग त्यावेळी फार कळकळीनं आपल्याला वाटतं. जे खरंही असतं. घरातले आपल्याला समजून घेत नाहीत आणि मित्र-मैत्रिणींमध्ये गेलं की नकळत तुलना होते आपल्याही मनात. त्यांचे आईवडील आपल्यापेक्षा बरे आहेत का, त्यांची आर्थिक स्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे की नाही, त्यांना मिळणारे यश, त्या तुलनेत आपण कुठे आहोत, अशी बरीच चलबिचल मनात असते. 
इतकं करून एखादा मित्र, एखादी मैत्रीण जवळची झाली आणि तिला आपण आपले काही सांगायला गेलो की त्यांना आपल्या प्रॉब्लेमचा सिरिअसनेस कळत नाही, असं आपल्याला वाटतं. कधी त्यांचेही प्रॉब्लेम आपण ऐकतो. आपल्यालादेखील ‘हा काय प्रॉब्लेम आहे?’ असं वाटतं ते ऐकून. दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्सवर कशी चटचट उत्तरे सापडतात आपल्याला. आपलेच प्रॉब्लेम सोडवायचे म्हटले की मला हे जमणार नाही, ते जमणार नाही, माझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, असं सगळं सुरू होतं. 
पण आपला प्रॉब्लेम दुसऱ्याचा आहे, असे समजून उत्तरे शोधायला गेलो, तर सगळ्या शक्यता फटाफट आठवतात. पण तसं न करता माझ्याबाबत काही चांगलं होणारच नाही, हे प्रश्न सुटणारच नाही, अशाच स्टेपवर आपण परत येऊन अडकतो. 

५ मुद्दे, एक खेळ
तर असाच एक खेळ खेळून बघू आपण. 
आपण कशात चांगले आहोत असं आपल्याला वाटतं?
ते एका कागदावर लिहून काढू. पाच मुद्दे. 
काहीही असो मग ते. कुछ भी यार, जो हो अच्छा हो. 
जे आपल्याला छान येतं. ज्यात आपण मस्त आहोत असं आपल्याला वाटतं ते पाच मुद्दे. 
आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला एक कागद देऊ. त्यालाही आपण कशात चांगले वाटतो, ते त्यानं लिहायचं. जास्त नको. पाचच मुद्दे. घरातदेखील कोणाला देता आला हा प्रश्न, तर द्यायचा. भावाला, बहिणीला, आईला द्या. आपणही प्रामाणिकपणे उत्तरं लिहायची. 
हे कशासाठी? तर आपल्याला आपण कशात चांगले वाटतोय, हे वाचून आपल्याला आपल्याबद्दल मस्त वाटेल. 
मुळात असा विचार करून मुद्दे काढणं ही प्रक्रि याच खूप काही शिकवेल. स्वत: विषयी बढा चढाके बोलणं वेगळं आणि नीट विचार करून स्वत:बद्दल चांगले मुद्दे काढणे वेगळं, हे आपल्या लक्षात येईल. 
आपल्याला काय येत नाही, आपल्याकडे इतरांच्या तुलनेत काय नाही यातच डोक्याचा पार भुगा करून घेतलेला असतो आपण कायम. आपल्याला काय छान येतेय, आपल्याकडे काय आॅलरेडी आहे, त्याला दाद देणार की नाही? ते समजून घेणार की नाही आपण? आपल्या कुटुंबाबद्दल, आई-वडिलांबद्दल एकतरी चांगली गोष्ट त्यात सापडेल की नाही? सोचो यार. 
आता खेळाचा भाग दुसरा.
इतरांना आपल्यातले काय मस्त वाटतेय, तेही बघायचं. त्यांची तर खरी परीक्षाच. दुसऱ्याला नावं ठेवणं सोपं असतं. नावं ठेवायला चटकन मुद्दे सुचतात. कुणाविषयी चार शब्द चांगले बोला सांगितले तर खोटी स्तुती तरी होते किंवा काही सुचतच नाही. तर, प्रामाणिकपणे त्यांनाही उत्तरं लिहायला सांगा. पाच मुद्दे नाही सुचले तर तीन तरी लिहा. पण खोटी स्तुती नको, असं बजावा. आपल्याला आपल्याबद्दल जे मस्त वाटतेय ते आणि आपल्या मित्र-मैत्रिणीला आपल्याबद्दल जे मस्त वाटतेय, ते कितपत जुळतंय? काही मुद्दे कॉमन असतील. काही वेगळेच मुद्देदेखील आलेले असू शकतात. त्याबद्दल थोडा विचार करायचा मग. अरे, याला माझ्याबद्दल हे जाणवलं तर, असाही छान धक्का तुम्हाला मिळू शकेल. त्यावर अजून विचार करायचा मग. आपल्याला आपल्यातलं जे छान वाटतंय, त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी आपण पुढे नेऊ शकतो, त्यावर अजून खोलात जाऊन काम करू शकतो, असं थोडं आत्मपरीक्षण करायचं. आपल्यातली कमतरता कोणती तेही प्रकर्षाने जाणवतं. घरातल्यांची, मित्रांची मदत मिळाली तर उत्तम. नाही मिळाली तरी ‘मी मस्त आहे’ हे स्वत:लाच आधी सांगायचं. सांगताच येणार नाही, असे कोणतेच प्रॉब्लेम नसतात, हे तर गेल्याच लेखात आपण डोक्यात फिक्स केलं. केलंय ना?
इतरांना नाही, 
स्वत:ला समजण्याची पहिली पायरी
खरं तर आपल्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा, लोकांना जाणवणारे आपण आणि प्रत्यक्षातले आपण यातला फरक जितका कमी होत जाईल, तितका आपला आत्मविश्वास वाढत जाईल. आपल्याला आपल्याबद्दल मस्त वाटायला लागेल. आपण कोणी फालतू नाही आहोत, हे स्वत:ला आधी पटले पाहिजे. बाकीचे आपल्याला त्यांच्यात घेतील की नाही, आपण त्यांच्यापेक्षा कमी आहोत असे विचार आपोआप मनातून जातील मग. आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलणं, आपल्याबद्दल नीट विचार करणं हे सायकल शिकण्यासारखं आहे. कधी पडू, झडू. कधी हॅण्डल वाकडं होईल सायकलचं. कधी चाकातली हवा कमी होईल, कधी पंक्चरसुद्धा होईल. पण प्रयत्न करत राहायचे. 
सायकल चलाना तो आयेगाही। 
स्वत:ला समजून घेण्याची ही पहिली पायरी आहे. 
ती चढायची धाडस करूच... 



- प्राची पाठक
prachi333@hotmail.com

( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)

Web Title: I have your own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.