फॅशन आॅन रेण्ट

By Admin | Published: June 23, 2016 04:12 PM2016-06-23T16:12:22+5:302016-06-23T16:12:22+5:30

याचे-त्याचे कपडे मागून आणून घालू नये हे म्हणणं जुनं झालं, आता आपल्याला आवडतील ते कपडे लोक भाड्यानं आणतात, फोटो काढतात, मिरवतात. विशेष म्हणजे, असे भाड्यानं कपडे देणं हा एक मोठा नवा ‘उद्योग’ बनतो आहे..

Fashion On Rent | फॅशन आॅन रेण्ट

फॅशन आॅन रेण्ट

googlenewsNext

नव्यानं घडणाऱ्या एका उद्योगासह बदलणाऱ्या वृत्ती सांगणारा एक नवीन ट्रेण्ड.

कधीतरी वाटतं ना की, अमिताभसारखा सुट घालावा? दीपिकासारखा मस्तानी ड्रेस घालावा? विल्सन केंटसारखा गाऊन, स्कर्ट किंवा अन्य ब्रॅण्डेड कपडे घालून तोरा, रुबाब, ऐट, थाट दाखवावा? तर तुम्ही तो अगदी सहज घालून मिरवू शकता. कारण तुमच्या मदतीला आलाय ‘फॅशन आॅन रेण्ट’ अर्थात ‘भाडेतत्त्वावरची फॅशन’ हा ट्रेण्ड.
हा ट्रेण्ड म्हणजे फॅशन व सर्वसामान्यांच्या विश्वातील हा एक मोठा बदल म्हणून समोर आला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला फारशी झळ पोहोचू न देताही त्यांना डिझायनर कपडे मिरवण्याचा आनंद मिळवून देणाऱ्या या ट्रेण्डचे वारे वाहू लागले ते सन २००९ मध्ये. न्यू यॉर्कच्या जेनिफर हेमन आणि जेनिफर फ्लेइस या दोन युवतींच्या संकल्पनेतून आकारास आला फॅशन आॅन रेण्ट हा ट्रेण्ड. ‘सोशल मीडियामुळे आपल्या सर्वांच्याच राहणीमानात एक सेलिब्रिटीपण आले आहे. प्रत्येकाला प्रत्येक दिवशी, प्रत्येक सणाला, प्रसंगाला नवीन लूक हवा असतो. त्यासाठीच वॉर्डरोब सतत नावीन्याने भरलेला हवा असतो,’ असे जेनिफरने एका मुलाखतीत म्हटले आहे. 
सर्वसामान्यांची हीच नटण्या-मुरडण्याची, स्टायलिश दिसण्याची हौस लक्षात घेऊनच जेनिफरच्या डोक्यात वर्षभरातील सर्वच सणांसाठी, प्रसंगांसाठी ब्रॅण्डेड, डिझायनर कपडे भाडेतत्त्वावर देण्याच्या कल्पनेने जन्म घेतला. आणि जेनिफर फ्लेईस या मैत्रिणीच्या साथीने तिनं ही कल्पना सत्यातही उतरवली. ‘रेण्ट द रनवे’ या कंपनीने आज ३७५हून अधिक ब्रॅण्ड्स भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिले आहेत. कंपनी दररोज ६५ हजार ड्रेसेस, त्यावरची मॅचिंग अ‍ॅक्सेसरीज (कानातले, ब्रेसलेट) भाडेतत्त्वावर ५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचवते.
पूर्वी बहिणी-बहिणी, मैत्रिणी-मैत्रिणी कशा एकमेकींचे ड्रेस, साड्या ‘चेंज’ म्हणून घालून पाहत असत, तसंच काहीसं आहे हे, फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे भाड्यावर घेतलेला ड्रेस, साडी घालणे म्हणजे काही कमीपणाचे लक्षण राहिलेले नाही आहे. उलट एक प्रॅक्टिकल, इकॉनॉमिकल आयडिया म्हणूनच सर्वत्र या ट्रेण्डचे स्वागत होत आहे. कपड्यांबरोबरच ब्रॅण्डेड पर्सेस, शूज, सॅण्डल्स, ज्वेलरीही सहज उपलब्ध आहे. नवरात्रात घागरा, केडिया ड्रेस, ज्वेलरी भाड्याने आजवर मिळतच होती, हा ट्रेण्ड म्हणजे त्याच्यापुढचे पाऊल म्हटले तरी हकरत नाहीये. 
एकूणच फॅशन आॅन रेण्ट या ट्रेण्डमुळे उंची वस्रे मिरवण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे. ज्यांना हौस आहे, त्यांच्या हौसेला चारचॉँद यामुळे लागणार आहेत. 

महागड्या कपड्यांची उधार चंगळ

मी २०१३मध्ये मुंबई आयआयटीमधून ग्रॅज्युएट झालो. त्यानंतर दोन वर्षे डॉईच बॅँकेत कामही केले. परंतु कॉलेजपासूनच स्वत:चं काहीतरी करायचं असंच स्वप्न होते. श्रिया मिश्रा आणि तुषार सक्सेना हे माझे दोन मित्रही याच वाटेवरचे प्रवासी होते. तेदेखील आयआयटी पासआउटच होते. आमची नेहमी यासंदर्भात चर्चा होत असे. त्यात आमच्या लक्षात आलं की, विशी-तिशीतील तरुण कार घेऊन फिरताहेत. ५ ते १० लाख कारसाठी मोजण्याऐवजी आता ‘मिळून सारेजण’ हे तत्त्व सर्रास अंमलात आणले जात आहे. म्हणजेच एकतर जेव्हा गरज असेल तेव्हा ती भाड्याने घेतली जातेय किंवा आपले मित्र, नातेवाईक यांच्याकडून ती वापरासाठी आणली जातेय. एअरएनबी ही कंपनी देश-विदेशात पर्यटकांसाठी हॉटेलऐवजी अत्याधुनिक सुविधांनी युक्त तेथील नागरिकांची घरे भाडेतत्त्वावर मिळवून देत आहे. विदेशातही घरासारखा फील, शिवाय तेथील राहणीमान लोकांना हॉटेलसाठी होणाऱ्या खर्चातच अनुभवता येते आहे. हे सारं बघण्यात आणि वाचण्यात आलं अन् नेमका हाच धागा आम्ही पकडला. फॅशन इंडस्ट्रीतही ‘शेअरिंग इकॉनॉमी’ हा फंडा खूप उपयोगी पडेल असा विश्वासही वाटला. जेव्हा तुम्ही महाग कपडे खरेदी करता तेव्हा तुम्ही ते खूप कमी वापरतात. १००-२०० रुपयांचा टी-शर्ट तुम्ही रोज वापराल; परंतु ५००० रुपयांची साडी वर्षातून एकदाच वापरतात. शिवाय सोशल मीडियात, लग्न समारंभात एखाद्या ड्रेस,साडीतील तुमचा लूक लिक झाला की पुन्हा तोच लूकही तुम्हाला नको असतो. मग महागडे कपडे पडून राहतात. 
यातूनच आम्ही आॅगस्ट २०१५ मध्ये ‘फ्लायरोब’ ही ब्रॅण्डेड कपडे भाडेतत्त्वावर देणारी आॅनलाइन सेवा मुंबईत सुरू केली. भारतात फॅॅन्सी ड्रेस स्पर्धा, शाळा, महाविद्यालयांची स्नेहसंमेलने, नृत्याचे कार्यक्रम यासाठी पोशाख भाड्याने घेतले जात होते. मात्र तरीही ही सेवा सुरू करताना सुरुवातीला मनात धास्ती होती की लोकं विवाह, सणवार यासाठी कपडे भाड्याने घेतील का? किंवा घेतले तरी मग एकमेकांना तसे सांगतील का? शेवटी सोशल पे्रस्टिज इश्यू म्हणून नाकारतील का? पण तसे घडले नाहंी. आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला, मिळतोय. फेब्रुवारी २०१६ला दिल्लीत ही सेवा सुरू केली, नुकतीच अहमदाबाद येथेही या सेवेस प्रारंभ आम्ही केलाय. लवकरच मेन्स वेअर आम्हाला उपलब्ध करून द्यायचे आहे. सध्या आम्ही महिलांची वस्रेप्रावरणे इथनिक व वेस्टर्न वेअरमध्ये उपलब्ध करून देत आहोत. इथनिक विअर ८०० ते १२ हजार रुपये भाडे आकारले जाते. ४, ६ आणि ८ दिवस तुम्ही ते वापरू शकता तर वेस्टर्न विअरसाठी २५० ते १४ हजार रुपये भाडे आकारले जाते. रितु कुमार, सोनाली गुप्ता, शेला खखान, अनिता डोंगरे या डिझायझनर्सचे कपडे तर वेस्टर्नमध्ये मॅँगो, वेरो मोडा, झाबेल असे ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. भारतात या क्षेत्रात सध्या खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. या संकल्पनेला भारतात मिळणारा प्रतिसाद पाहता, मला तर वाटते की, येत्या काही वर्षांमध्ये घरातील कपाटात रोज जे कपडे लागतात तेवढेच दिसतील. बाकी कपडे हे भाडेतत्त्वावरच घेतले जातील. भविष्यात फॅशन आॅन रेण्टला खूप चांगले दिवस येणार आहेत. 


प्रणव सुराणा, संस्थापक, ‘फ्लायरोब’, मुंबई


बॉरो इट बिनधास्त
भारतीय फॅशन विश्वाला या ट्रेण्डची भनक लागली नसती तरच नवल! या ट्रेण्डचे लोण भारतातही वेगाने पसरू पाहतेय. भारतात ‘ब्लिंग आणि स्टेज ३’ ही कंपनी या ट्रेण्डसाठी व्यासपीठ ठरलीय. 
एक नवी इंडस्ट्री म्हणून हा ट्रेण्ड सेट होऊ पाहतोय.
*करिना व सोनम कपूरसाठी ड्रेस डिझाईन करणारी मसाबा (सर विवियन रिचर्ड्स व नीना गुप्ता यांची मुलगी) हिने ‘बॉरो इट बिनधास्त’ नावाच्या वेबसाइटवरून ब्रॅण्डेड कपडे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिले आहेत. 
*याव्यतिरिक्त ‘फ्लायरोब’सारखे असंख्य पर्याय आॅन व आॅफलाइन उपलब्ध झाले आहेत. आॅनलाइन ड्रेस निवडा, पैसे द्या, घरपोच ड्रेस मिळवा, तीन दिवस वापरा व परत करा इतकं सोपं झालंय हे सगळं आता. 
*साधारण ३५०० ते १०,००० रुपये इतकं भाडं या डिझायनर, अतिउंची कपड्यांसाठी मोजावं लागू शकतं.

- सारिका पूरकर-गुजराथी

queen625@gmail.com

Web Title: Fashion On Rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.