दारुशारु, सरसो दा साग ते पैरी पौना

By admin | Published: December 11, 2014 08:27 PM2014-12-11T20:27:45+5:302014-12-11T20:27:45+5:30

जो देश कधी पाहिला नाही, त्या देशातल्या ज्याला कधी पाहिलंही नाही, अशा मुलाशी आपले वडील आपलं लग्न ठरवताहेत, हे पाहून सिमरन हादरते.

DARASHARU, SARSO da SAG TO PERRY PANNA | दारुशारु, सरसो दा साग ते पैरी पौना

दारुशारु, सरसो दा साग ते पैरी पौना

Next
>जो देश कधी पाहिला नाही, त्या देशातल्या ज्याला कधी पाहिलंही नाही, अशा मुलाशी आपले वडील आपलं लग्न ठरवताहेत, हे पाहून सिमरन हादरते.
पण ती वडिलांशी भांडत नाही, मान्य करते त्यांचं म्हणणं. पण त्याआधी जगून घेऊ द्या, माझ्या मैत्रिणींबरोबर एकदाच युरोप ट्रिपला जाऊ द्या, असं किती शांतपणे कन्व्हिन्स करते सिमरन रागीट वडिलांना..
तेही तिला जाऊ देतात.
तिकडं ते पोरांचं टोळकं भेटतं, उडाणटप्पूच तो, तिला चिक्कार त्रास देतो. त्यात गाडी चुकते म्हणून त्याच्याच सोबतीनं प्रवास करावा लागतो.
सिमरन त्या प्रवासात वैतागते, दारूबिरू पिऊन नाचते. कमीच कपडे घालते. मात्र ‘त्याचं’ भान सुटत नाही. तो तिला ‘काहीही’ करत नाही.
हे मॉडर्न कम ट्रॅडिशनल असणं या सिनेमात पहिल्यांदा आलं. पळून जा हिला घेऊन असं तिची आई सांगते, बहीण विनवते, तीपण तयार असते; पण तरी तो नाही म्हणतो. घरच्यांच्या परवानगीशिवाय तिला नेणार नाहीच म्हणतो.
‘ अगर सही रास्ते पर चलोगे, तो भले ही शुरुआतमे तुम्हे कदम कदम पे ठोकरें मिले, मग अंत मे हमेशा जीत होगी’ असं सांगत, तिच्या वडिलांनी परवानगी देण्याची वाट पाहतो. एकीकडे बिअर चोरणारा, फ्लर्ट करणारा, स्वित्झर्लंडमधे फिरणारा हा तरुण, दुसरीकडे त्या ट्रिपमधे स्वत:ला विसरणारी तरुणी. पण म्हणून ते त्यांची मुळं विसरत नाहीत, घरच्यांना नाकारत नाहीत, त्यांच्याशिवाय जगत, पळण्याचा पर्याय स्वीकारत नाहीत..
हे सारं आज कितीही हास्यास्पद वाटलं तरी तेव्हा, त्या काळात मात्र नव्या आणि जुन्याची बट्टी करून देणारा हा मध्यममार्ग अनेकांना आपलाच वाटला होता. देश जुनी वाट सोडून नव्या वाटेवर जात होता, सरकारी नोकरीची सुरक्षितता सोडून खासगी नोकरीची वाट तरुण धरत होते. वडिलांना रिटायर्ड होताना जेवढा पगार, तेवढा पगार आयटीवाला मुलगा पहिला म्हणून घेत होता. आणि तरीही आपल्या घराची वीण उसवू नये म्हणून धडपड ही त्या काळातली एक अव्यक्त सल होतीच. त्या काळात हा सिनेमा, वडीलधार्‍यांना बरोबर घेऊन चला, पण तुमची स्वप्नं सोडू नका असं म्हणत होता.
अवघड आहे, पण अशक्य नाही असं चित्र उभं करत होता..

Web Title: DARASHARU, SARSO da SAG TO PERRY PANNA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.