बांबूच्या सायकलीवरून देशप्रवास

By admin | Published: October 20, 2016 05:11 PM2016-10-20T17:11:51+5:302016-10-20T17:11:51+5:30

प्रिसिलिया आणि सुमित. सायकलवेडेच. त्यांनी ठरवलं, हिंमत करायची आणि देशभर फिरायचं, तेही बांबूची सायकल घेऊन..

Countrywide bamboo cycling | बांबूच्या सायकलीवरून देशप्रवास

बांबूच्या सायकलीवरून देशप्रवास

Next
>- ओंकार करंबेळकर
 
प्रिसिलिया आणि सुमित.
पनवेलला राहणारे हे दोन सायकलवेडे. दोघांनीही भारतात उभा-आडवा अनेकदा प्रवास केला आहे. पनवेल ते कन्याकुमारी, पनवेल ते मनाली किंवा ओरिसापर्यंतही ते जाऊन आले आहेत. प्रिसिलिया तर एकटीच कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास करून आलेली आहे. पण यावर्षी त्यांनी या सायकलप्रवासाच्या मालिकेमध्ये नवे प्रकरण जोडले आहे. या दोघांनी या पावसाळ्यामध्ये कन्याकुमारी ते खार्दुंग ला असा ४२०० किमी प्रवास सायकलने केलाय. आणि तोही बांबूच्या सायकलवरून. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश देत त्यांची बांबूची सायकल देशभर धावली !
एरवी मोठ्या सायकलस्वारांच्या गटांमधून प्रवास करणाऱ्या प्रिसिलिया आणि सुमित यांना यावेळेस फक्त दोघांनाच प्रवास करायचा होता. त्यामुळे रस्ता विचारणं, राहायची जागा ठरवणं, प्रवासाची आखणी अशी कामं या दोघांनाच करायची होती. कन्याकुमारीमधून बाहेर पडल्यापासूनच या दोघांनी कामं वाटून घेतली आणि प्रवासाला सुरुवात केली. एखादी तांत्रिक अडचण, सायकलदुरुस्ती असं काम असलं की सुमितने करायचं आणि हिशेब, साहित्याची काळजी, देखभाल अशी कामं प्रिसिलियाने करायची अशी वाटणीच करून टाकली. गेली अनेक वर्षं ही दोघंही एकमेकांना ओळखत असल्यानं त्यांना एकमेकांच्या क्षमतांची जाणीव होती. 
दक्षिणेपासून सुरू केलेला या प्रवासात वेगवेगळे अनुभवही आले. बेटी पढाओ-बेटी बचाओसाठी सायकलिंग करत असल्यामुळे ठिकठिकाणच्या शाळांची आणि शिक्षणाची अवस्थाही त्यांना पाहता आली.
सुमित सांगतो, दक्षिण भारतामध्ये मुलींना शाळेत पाठविण्याचं प्रमाण लक्षात येईल इतकं जास्त आहे. उत्तर भारतात मात्र शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. कित्येक शाळा उघड्यावर भरवल्या जातात, तर काही शाळा एकशिक्षकीच. पण शिक्षणाकडे लोकांचा वाढता ओढा सुखावणारा नक्कीच आहे.
वाटेत लागलेल्या शाळांना भेटी देऊन त्यांनी मुलांची विचारपूसही केली तसेच शाळांमध्ये लहान लहान व्याख्याने देऊन मुलांशी संवादही या दोघांनी साधला. बहुतेक शाळांजवळ दोघांच्याही सायकली थांबल्या की मुलं गोळा होत आणि त्यांच्या सायकलबद्दल प्रश्न विचारू लागत. हे कुतूहल सर्वत्र सारखंच होतं. 
या प्रवासाच्या अनुभवाबाबत सांगताना प्रिसिलिया म्हणते, आजही आपल्याकडच्या लोकांच्या मानसिकतेत फारसा बदल झालेला नाही. सायकलवरुन आम्ही येताना दिसलो की लोकं पहिला प्रश्न विचारत, तुमचं लग्न झालं आहे का? मग दोघंच का फिरताय, तुम्हाला कामधंदा नाही का, तुम्ही शिक्षण अर्धवट सोडलंय का? अशा प्रश्नांची सद्दीच सुरू होई. मी एमएस्सी केलंय आणि सुमित इंजिनिअर आहे हे तिला सांगावंच लागे. 
त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये राहतानाही त्यांना असंख्य अडचणी येत. हॉटेलमध्ये खोल्या मिळवणं हे अत्यंत अवघड काम असे. सायकलवाल्या मुलांना जागा देण्यास हॉटेलवाले काचकूच करत. लोकांच्या या प्रश्नांना आणि नजरांना तोंड देणं प्रिसिलियाला धक्कादायक आणि आश्चर्यजनक वाटत असे. पण त्याचीही सवय झाली.
सायकलवरून भारत पाहताना ठिकठिकाणी अनुभवही बदलत गेले. चित्रदुर्ग, हंपी, ओर्छा अशी जागतिक वारसास्थळं अजूनही पर्यटकांच्या नकाशावर म्हणावी तशी आलेली नाहीत असं सुमितला वाटतं. या दोघांचे सर्व शहरांमध्ये जय्यत स्वागत होत असे. ठिकठिकाणचे सायकलप्रेमी त्यांची भेट घेत. त्यांच्याबरोबर थोडी सायकलही चालवत. ग्वाल्हेर शहरात तर पहाटे साडेपाच वाजता पन्नासेक लोक सायकलसह त्यांच्या हॉटेलखाली स्वागताला उभे होते आणि त्यांनी या दोघांबरोबर सायकल चालविली.
चंदिगड शहरातील सायकलसाठी ठेवण्यात आलेले ट्रॅक्स खरोखरच सायकलसाठी वापरण्यात येत होते असं ते आवर्जून सांगतात. पण त्यांची खरी निराशा केली ती राजधानी दिल्लीने. दिल्लीमधील रस्ते, त्यावरील ट्रॅफिक आणि कचऱ्याच्या ढिगामुळे राजधानीबद्दलचं मतच जरा वाईट झालं, असं ते सांगतात.
सुमितच्या मते, असा मोठा प्रवास केल्यावर खूप शांत वाटतं आणि आपला संयमही वाढतो. आपल्याबरोबर एखादी व्यक्ती असेल तर जबाबदारीही वाढते, ती पार पाडण्याचा आनंद वेगळाच असतो. या प्रवासात असंख्य परदेशी नागरिक आणि सायकलस्वार भेटले, त्यांचे अनुभव आणखी समृद्ध करणारे होते. त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतो आणि साहजिकच आपलीही जगाकडे पाहण्याची नजर बदलते. स्वयंशिस्त आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे एकदम मोठं झाल्यासारखं वाटतं. 
अडीच महिने सायकल चालवत फिरली ही मुलं. ते सांगतात, पायडल मारत इतका काळ पाय अधांतरी होते आणि त्या अनुभवातून खऱ्या अर्थानं ते आता जमिनीवर आलेत..
आताच उठा..
रोज चारचौघांसारखं आयुष्य आपण जगतच असतो. टीव्हीवर पाहून काहीतरी वेगळं करावंसं वाटत असतं. पण आपण हिंमत करत नाही. पण तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल तर ती करण्याचा प्रयत्न करा. परदेशातून अनोळखी देशांमध्ये जाऊन प्रवास करणारे लोक पाहिले की आपण काहीच धाडस करत नाही असं वाटतं. त्यामुळे तुमच्या मनातल्या इच्छांना न्याय द्या. बांबूची सायकल ही इतर सायकलपेक्षा थोडी वेगळी असते. त्याची केवळ फ्रेम बांबूची व इतर सुटे भाग इतर सायकलींप्रमाणे असतात. हा वेगळा प्रयोग आम्ही आव्हानासारखा स्वीकारला आणि आमच्या मनातली इच्छा तडीस नेली, असं प्रिसिलिया सांगते. 
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: Countrywide bamboo cycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.