चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत खेळणार नाही?, आयसीसीला होणार तोटा

By admin | Published: April 25, 2017 07:18 PM2017-04-25T19:18:02+5:302017-04-25T20:40:14+5:30

एक जून पासून इंग्लडंमध्ये रंगणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत माघारी घेऊ शकतो. महसुलातील हिस्सेदारीवरुन आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात सुरु झालेला वाद संपण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Will India not play in Champions Trophy? | चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत खेळणार नाही?, आयसीसीला होणार तोटा

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत खेळणार नाही?, आयसीसीला होणार तोटा

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - एक जून पासून इंग्लडंमध्ये रंगणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत माघारी घेऊ शकतो. महसुलातील हिस्सेदारीवरुन आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात सुरु झालेला वाद संपण्याची शक्यता कमी दिसत आहे. आयसीसीच्या नियमानुसार 25 एप्रिलपर्यंत संभाव्य संघाची घोषणा करायची होती, मात्र बीसीसीआयने भारतीय संघाची संभाव्य 15 खेळाडूंची यादी आयसीसीकडे अद्याप पाठवली नाही. त्यामुळे या स्पर्धेमध्ये भारताच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
आयसीसी बीसीसीआयला देण्यात येणारा महसुलातील हिस्सा कमी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे बीसीसीआय नाराज आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांना आयसीसीकडून महसुलातील सर्वाधिक हिस्सा मिळतो. तसंच या तिन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाला कोणताही निर्णय घेताना महत्त्व दिलं जातं. आयसीसीनं जर या निर्णयात बदल केला तर या तिन्ही बोर्डांचे पंख कापले जाणार आहेत. यामुळे बीसीसीआयनं आक्रमक भूमिका घेतली आहे.
बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी इंग्लंडला मिळणाऱ्या 13.5 कोटी डॉलर (जवळपास 895 कोटी रुपये) या रकमेवरही आक्षेप घेतला आहे. बीसीसीआयने म्हटले की, या वर्षी टी-20 वर्ल्डकपच्या 58 सामन्यांच्या (पुरुष आणि महिला मिळून) आयोजनासाठी 4.5 कोटी डॉलर (298 कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली, तर इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या केवळ 15 सामन्यांसाठी 895 कोटी रुपये देण्यात आले. भारतात झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप सामन्यांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये होणाऱ्या सामन्यांची संख्या अर्ध्यापेक्षा कमी आहे, हे विशेष. क्रिकेटमध्ये 70 ते 75 टक्के रेव्हेन्यू भारतातून तयार होतो. अशात भारताला दुर्लक्षित करून आयसीसी कोणताही मोठा निर्णय कसा काय घेऊ शकते, हे बीसीसीआयला दाखवायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याची धमकी किंवा यात दुबळी टीम खेळवण्याचे सांगून बीसीसीआयने पॉवर-पॉलिटिक्समध्ये पूर्ण ताकद लावली आहे. पुढच्या काही महिन्यांत याचे परिणाम दिसतील. आयसीसीच्या प्रमुख समित्यामध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व वाढण्याची दाट शक्यता आहे.
इंग्लंडमध्ये 1 जून ते 18 जून 2017 दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. एकूण 15 सामने होणार आहेत. त्यासाठी 2 गट पाडण्यात आले असून, प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरी गाठतील. अंतिम सामना 18 जून रोजी ओव्हेल मैदानात होईल. ऑस्ट्रेलिया, यजमान इंग्लंड, बांगलादेश, आणि न्यूझीलंड यांचा अ गटात समावेश आहे. तर ब गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि द. आफ्रिका संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात एक जून रोजी ओव्हल येथे होणार आहे. भारताशिवाय अन्य सात संघानी आपल्या संघाची घोषणा केलेली आहे. द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लड , श्रीलंका आणि बांगलादेश यांनी आपल्या संभाव्या संघाची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने फेटाळला मनोहर यांचा प्रस्ताव 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रस्तावित स्वरूपामध्ये अतिरिक्त १० कोटी डॉलर देण्याचा आयसीसीचा प्रस्ताव फेटाळला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले, आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी नव्या आर्थिक मॉडेलमध्ये आमच्यापुढे १० कोटी डॉलर अतिरिक्त देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. प्रस्ताव स्वीकारण्यासाठी त्यांनी आम्हाला निर्धारित कालावधी दिला होता, पण आम्ही प्रस्ताव न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या महसूलवाटपाच्या पद्धतीत आयसीसीकडून बीसीसीआयला ५७ कोटी ९० लाख डॉलर मिळतात. मनोहर यांचा प्रस्ताव जर आयसीसीने स्वीकारला तर बीसीसीआयचा वाटा २९ कोटी डॉलरचा राहील. त्याला प्रशासकांची समिती मंजुरी देणार नाही. विक्रम लिमये यांनी आयसीसी बोर्डाच्या गेल्या बैठकीमध्ये या मॉडेलचा विरोध केला होता. 
 
 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक

 

1 जून - इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)

2 जून - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

3 जून - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

4 जून - भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन)

5 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)

6 जून - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (कार्डीफ)

7 जून - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (एजबॅस्टन)

8 जून - भारत विरुद्ध श्रीलंका (ओव्हल)

9 जून - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कार्डीफ)

10 जून - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

11 जून - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

12 जून - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (कार्डीफ)

14 जून - सेमीफायनल १ (कार्डीफ)

16 जून - सेमीफायनल २ (एजबॅस्टन)

18 जून - फायनल मॅच (ओव्हल)

Web Title: Will India not play in Champions Trophy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.