तमिळनाडूला नमवत भारत ब अंतिम फेरीत

By admin | Published: March 27, 2017 01:04 AM2017-03-27T01:04:20+5:302017-03-27T01:04:20+5:30

मनीष पांडेचे शतक आणि अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ब संघाने आपली विजयी घोडदौड

Tamil Nadu defeated India B in the final round | तमिळनाडूला नमवत भारत ब अंतिम फेरीत

तमिळनाडूला नमवत भारत ब अंतिम फेरीत

Next

विशाखापट्टणम : मनीष पांडेचे शतक आणि अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ब संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत विजय हजारे करंडक स्पर्धेतील विजेत्या तमिळनाडूला ३२ धावांनी नमवत देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत ब संघाने ५0 षटकांत ८ बाद ३१६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून मनीष पांडेने ११0 चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह १0४ धावांची खेळी केली. तसेच याआधीच्या सामन्यातील शतकवीर शिखर धवनने ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५0
धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मनीष पांडेने
अक्षर पटेल याच्या साथीने ५ व्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी करताना भारत ब संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. अक्षर पटेलने ४३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. तमिळनाडूकडून आर. साई. किशोरने ६0 धावांत ४ गडीबाद केले.
प्रत्युत्तरात तामिळनाडूचा संघ सलामीवीर कौशिक गांधीच्या शतकानंतरही ४८.४ षटकांत २८४ धावांत सर्वबाद झाला. कौशिक गांधीने १३४ चेंडूंत ९ चौकारांसह १२४ धावांची खेळी केली. एन. जगदीशन याने ५ चौकार, ३ षटकारांसह ५६ चेंडूंत ६४ धावा केल्या. भारत ब संघाकडून धवल कुलकर्णीने ४५ धावांत तर अक्षर पटेलने ५३ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. चमा मिलिंद आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
भारत ब संघाने सलामीच्या लढतीत भारत अ संघाचा पराभव केला होता आणि सलग दुसरा विजय आणि आठ गुणांसह त्यांनी अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारत अ आणि तामिळनाडू यांच्या लढतीतील विजयी ठरणाऱ्या संघासोबत त्यांचा सामना २९ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.

Web Title: Tamil Nadu defeated India B in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.