सेरेनाचा संघर्षपूर्ण विजय

By admin | Published: September 3, 2015 10:46 PM2015-09-03T22:46:46+5:302015-09-03T22:46:46+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने निराशाजनक सुरुवातीनंतर सावरताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला,

Serena's Confronted Victory | सेरेनाचा संघर्षपूर्ण विजय

सेरेनाचा संघर्षपूर्ण विजय

Next

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने निराशाजनक सुरुवातीनंतर सावरताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर पुरुष एकेरीत राफेल नदालनेही आगेकूच केली.
स्टेफी ग्राफनंतर (१९८८) प्रथमच कॅलेंडर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेना विल्यम्सने ११०वे मानांकन असलेल्या किकी बर्टेंसची झुंज ७-६, ६-३ ने मोडून काढली. सेरेनाने ३४ टाळण्याजोग्या चुका केल्या आणि १० दुहेरी चुका केल्या.
सेरेना म्हणाली, ‘‘मी दडपण न बाळगता खेळत असले, तरी ही लढत कठीण होती. मला पुन्हा सूर गवसेल, अशी आशा आहे.’’
सेरेनाला यानंतर अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सँड््सने मायदेशातील सहकारी कोको वांडेवेगेचा ६-२, ६-१ ने पराभव केला.
पुरुष विभागात आठवे मानांकन प्राप्त व १४ वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या नदालने अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्त्जमॅनचा ७-६, ६-३, ७-५ ने पराभव केला. नदालची उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचशी गाठ पडण्याची
शक्यता आहे.
गत चॅम्पियन मारिन सिलिच व सातवे मानांकन प्राप्त डेव्हिड फेरर यांनीही पुढच्या फेरीत प्रवेश केला. नववे मानांकन प्राप्त क्रोएशियाच्या सिलिचने रशियाच्या एवजेने डोंस्कायचा ६-२, ६-३, ७-५ ने पराभव केला. स्पेनच्या फेररने १०२वे
मानांकन प्राप्त फिलिप क्रोजिनोविचचा ७-५, ७-५, ७-६ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)

अमेरिकेच्या सेरेना विलियम्ससह पुरस्कार
समारंभात आपल्या नृत्याचे कौशल्य सादर करणारा जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने दुसऱ्या फेरीच्या लढतीदरम्यान कोर्टवर डान्स करीत सर्वांना आश्चर्यचकित केले.
लाल टी-शर्टमध्ये असलेल्या जोकोविचने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत ५२ व्या मानांकित आंद्रियस हैदर मोरेरचा ६-४, ६-१, ६-२ ने पराभव केला आणि त्यानंतर जल्लोष करताना कोर्टवर नृत्य केले. त्या वेळी त्याने फॅनने भेट केलेला टी-शर्ट परिधान केला होता. त्यावर एनवाय म्हणजेच न्यूयॉर्क लिहिलेले होते. चाहत्याने स्वत: हा टी-शर्ट जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टेनिसपटूला घालून दिला.
त्याच्या चाहत्याने जोकोविचला कोर्टवर डान्स करण्याची विनंती केली आणि सर्बियन खेळाडूने विरोध न करता या चाहत्याची विनंती मान्य केली. जोकोविचला नृत्य करताना बघून स्टेडियममध्ये उपस्थित चाहतेही थिरकायला लागले. त्यांनी जोकोविचचा उत्साह वाढविला. जोकोविचच्या नृत्यामुळे स्टेडियममध्ये वेगळाच माहोल तयार झाला.

न्यूयॉर्क : भारतीय स्टार टेनिसपटूंनी विजयी सुरुवात केली. अनुभवी लिएंडर पेसने मिश्र दुहेरीत आणि रोहन बोपन्नाने पुरुष दुहेरीत दुसरी फेरी गाठली.
पेस आणि मार्टिना हिंगीस यांनी स्थानिक जोडी टेलर हॅरी फ्रिट््स आणि सी लुई यांचा ६-२, ६-२ ने पराभव केला. चौथ्या मानांकित पेस-हिंगीस यांनी केवळ ४६ मिनिटांमध्ये या लढतीत सरशी साधली. पेस-हिंगीस जोडीला यानंतर कॅनडाची युजिनी बुचार्ड व आॅस्ट्रेलियाचा निक किर्गियोस आणि युक्रेनची एलिना स्वितोलिना व न्यूझीलंडचा अर्टेम सिटाक यांच्यातील विजेत्या जोडीच्या अव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

बोपन्ना व फ्लोरिन मार्जिया यांनी अमेरिकेच्या आॅस्टिन क्राइजेक व निकोलस मुनरो यांचा ६-३, ६-४ ने पराभव केला. सहाव्या मानांकित या जोडीने एक तास ५ मिनिटांमध्ये विजय मिळविला. आता त्यांना पोलंडच्या मारिउज फ्राइस्टेनबर्ग व सॅन्टियागो गोंडालेस यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. फ्राइस्टेनबर्ग-गोंजालेस जोडीने पोलंडच्या टोमाज बेडनारेक व जेरजी जानोविच जोडीचा ६-७, ७-६, ६-४ ने पराभव केला.

Web Title: Serena's Confronted Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.