महाराष्ट्राची विजयी सलामी

By Admin | Published: January 13, 2017 12:36 AM2017-01-13T00:36:06+5:302017-01-13T00:36:06+5:30

शिरोळमध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : मुलांमध्ये हरियाणा, तमिळनाडू संघाचा विजय

Maharashtra's winning salute | महाराष्ट्राची विजयी सलामी

महाराष्ट्राची विजयी सलामी

googlenewsNext



शिरोळ : येथील श्री पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावरील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबासाहेब लडगे क्रीडानगरी येथे गुरुवारी ६२ व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेला शानदार सोहळ्याने प्रारंभ झाला. देशातील २७ राज्यांतील संघ स्पर्धेत सहभागी झाले असून, दिवसभरात मुला-मुलींचे १२ साखळी सामने झाले. गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुला-मुलींच्या साखळी पद्धतीच्या सामन्यात मुलांच्या गटात हरियाणाने तेलंगणाच्या संघावर, तर तमिळनाडूने मध्यप्रदेशच्या संघावर विजय मिळविला. मुलींच्या गटात महाराष्ट्राने तमिळनाडू संघाला हरविले, तर गुजरातने हरियाणावर विजय मिळवून सलामी दिली.
या स्पर्धेत सहभागी झालेला हरियाणा मुला-मुलींचा संघ गतवर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजयाचा मानकरी होता. मॅटवर सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धा विद्युत प्रकाशझोतात गटवार साखळी पद्धतीने सुरू झाल्या. प्रत्येकी आठ गट विभागात स्पर्धा होईल.
गुरुवारी सायंकाळी देशातील सहभागी मुला-मुलींचे कबड्डी संघ, क्रीडा प्रशिक्षक, स्पर्धा निरीक्षक जे. सी. शर्मा, मूर्ती (मध्यप्रदेश), तांत्रिक निरीक्षक दलवीर सिंग (दिल्ली), पंचप्रमुख अजित पाटील, प्रो-कबड्डी पुणेरी फलटणचे उत्कृष्ट खेळाडू सागर खटाळे यांच्यासह स्पर्धा संयोजक, बालशिवाजी मंडळ, जिल्हा क्रीडाधिकारी तसेच क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे विभागाचे प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली.
त्यानंतर रॅलीचे मैदानावर आगमन होताच क्रीडाज्योतीचे आगमन, संचलन झाले. यावेळी ध्वजवंदन कार्यक्रमानंतर खेळाडूंना शपथ देण्यात आली. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकटेश्वर, क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, आमदार उल्हास पाटील यांच्यासह स्पर्धा संयोजक अमरसिंह पाटील, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, प्रा. आण्णासाहेब गावडे, श्रेयस लडगे, रावसाहेब देसाई, दरगू गावडे, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, सर्जेराव शिंदे, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, महाराष्ट्र संघ महिला कर्णधार सोनाली हेळवी, डॉ. रमेश भेंडिगिरे, प्रा. संभाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन घोटणे यांनी केले.

Web Title: Maharashtra's winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.