भारताचं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर, चहापानापर्यंत भारत 2 बाद 153 धावा

By admin | Published: March 26, 2017 12:19 PM2017-03-26T12:19:28+5:302017-03-26T14:36:18+5:30

धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावात 300 धावांवर कांगारूंना रोखल्यानंतर दुस-या दिवशी भारताने...

India scored an impressive 153 for two in reply to Australia's reply | भारताचं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर, चहापानापर्यंत भारत 2 बाद 153 धावा

भारताचं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर, चहापानापर्यंत भारत 2 बाद 153 धावा

Next
>ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 26 - धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावात 300 धावांवर कांगारूंना रोखल्यानंतर दुस-या दिवशी भारताने संयमी सुरूवात केली. चहापानापर्यंत खेळ थांबला तेव्हा भारताच्या 153 धावांवर 2 गडी बाद झाले आहेत. दुस-या दिवसाची सुरूवात भारतासाठी खराब झाली. 11 धावांवर सलमीवीर मुरली विजयला जलदगती गोलंदाज जॉश हेझलवूडने स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुलने टिच्चून फलंदाजी करत आणखी विकेट जाणार नाही याची काळजी घेतली. पण उपहारानंतर ही जोडी फोडण्यात कांगारूंना यश आलं. राहुल (60) धावांवर बाद झाला. सध्या मैदानावर चेतेश्वर पुजारा (53) आणि अजिंक्य रहाणे(19) खेळत आहेत.  भारत अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 147 धावांनी पिछाडीवर आहे.
 
यापुर्वी ‘चायनामॅन’ फिरकी गोलंदाज २२ वर्षांच्या कुलदीप यादवने पदार्पणातच चार बळी घेत चौथ्या कसोटीत पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची वाटचाल रोखली. तरीही पाहुण्या संघाने कर्णधार स्टीव्ह स्मिथचे शतक (१११) तसेच डेव्हिड वॉर्नर (५६) आणि मॅथ्यू वेड (५७) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या डावात ३०० धावा उभारल्या.
 
एकवेळ १ बाद १४४ अशा सुुस्थितीत असलेल्या आॅस्ट्रेलियाची उपाहारानंतर चेंडूचा ताबा घेणाऱ्या कुलदीप यादवच्या फिरकीसमोर अवस्था बिकट झाली. कुलदीपने कांगारूंच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवल्यानंतर कर्णधार स्मिथने एकाकी झुंज देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रविचंद्रन आश्विनने स्मिथचा अडसरही दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. स्मिथ बाद झाल्यावर मॅथ्यू वेडने झुंजार खेळी करत संघाला ३०० चा पल्ला गाठून दिला.
 
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटीत नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी बघून भारतीय संघात पाच गोलंदाजांचा समावेश करण्यात आला. खांदेदुखीमुळे बाहेर बसलेल्या विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेचा विश्वास गोलंदाजांनीही सार्थ ठरवला. उमेश यादवने सलामीची जोडी फोडली. त्याने सलामीवीर मॅट रॅनशॉला त्रिफळाचीत केले.
 
कर्णधार स्मिथने डेव्हिड वॉर्नरच्या सोबतीने शतकी (दुसऱ्या गड्यासाठी १३४ धावा) भागीदारी करत संघाला सुस्थितीत नेले. ही जोडी भारतीय गोलंदाजांवर डोईजड ठरेल, असे दिसत असतानाच कुलदीप यादव भारताच्या मदतीला धावून आला. कुलदीपने डेव्हिड वॉर्नरला ५६ धावांवर असताना बाद केले. वॉर्नर स्लीपमध्ये अजिंक्य रहाणेकडे झोल सोपवून माघारी परतला. त्यानंतर उमेश यादवने शॉन मार्शलाही अवघ्या चार धावांवर बाद करत आॅस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. कुलदीपने पीटर हँड्सकॉम्ब आणि मॅक्सवेलचा अडथळा दूर केला तर कर्णधार स्मिथ १११ धावांवर बाद झाला. यादवने चार, उमेश यादवने दोन तसेच आश्विन, भुवनेश्वर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
 
सामन्यांमधील रंगत, मैदानावरील आणि बाहेरील वादविवाद, आरोप-
 
प्रत्यारोपाच्या फैरी, प्रतिमा डागाळण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आदी गोष्टींमुळे भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेने आधीच कळस गाठला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या थरारानंतर मालिकेत १-१ अशी उत्कंठा टिकून आहे. चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. विराट कोहली दुखापतीमुळे या सामन्याला मुकला आहे. त्याच्या जागी कुलदीप यादव या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला संघात स्थान मिळाले. ईशांत शर्माऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली. भारताला दिवसअखेर केवळ एक षटक खेळायला मिळाले. जोश हेजलवूडच्या षटकात लोकेश राहुलने बचावात्मक पवित्रा घेत एकही धाव घेतली नाही. मुरली विजय दुसऱ्या टोकाला आहे. जखमी कर्णधार कोहलीच्या अनुपस्थितीत या दोघांशिवाय चेतेश्वर पुजारा आणि रहाणे यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल.(वृत्तसंस्था)
 
कुलदीपच्या घरी आनंदोत्सव!
 
कसोटीत पदार्पण करणारा कानपूरचा २२ वर्षांचा फिरकीपटू कुलदीप यादव याच्या घरी उत्साह आणि आनंदाला उधाण आले असून, अभिनंदन करणाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. लहान व्यापारी असलेले वडील रामदेवसिंग यादव यांना पत्रकारांनी माहिती देताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. परिसरात मिठाई वितरित करण्यात आली. सर्वांना कुलदीपकडून बळींची अपेक्षा होती. त्याने ती सार्थ ठरविली. पहिल्या डावात चार गडी बाद केले. आॅस्ट्रेलियावर विजय मिळवून देण्यात कुलदीपचा मोलाचा वाटा असावा, अशी नागपूर नागरिकांची अपेक्षा आहे.
 
कुलदीपला वयाच्या दहाव्या वर्षीपासून खेळाचे धडे देणारे कोच कपिल पांडेय म्हणाले,‘आज माझी छाती गर्वाने फुगली आहे. १२ वर्षांपासून ज्या मुलावर मेहनत घेतली तो भारताच्या कसोटी संघात खेळत आहे. त्याचा चेंडू खेळपट्टीवर वेगळ्या प्रकारे फिरतो हे पाहून मी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले होते. माझे श्रम फळाला आले आहेत.’
 
उत्तर प्रदेश संघाचे निवडकर्ते ज्ञानेंद्र पांडे म्हणाले, ‘मी रणजी संघाचा कोच असताना त्याची गोलंदाजी पाहिली तेव्हाच हा एक दिवस राष्ट्रीय संघात खेळेल, असे भाकीत वर्तविले होते. कुलदीपच्या यशाचे रहस्य ‘चायनामॅन’गोलंदाजी आहे. त्याचा लेगस्पिन चेंडू आतल्या बाजूने वळतो आणि फलंदाज चाचपडतो. कुलदीपला या वेगळ्या शैलीमुळे पुढेही यश मिळत जाईल.’
 
कुलदीपचे दिग्गजांकडून कौतुक
 
युवा कुलदीप यादवच्या पदार्पणातील कामगिरीचे दिग्गजांनी तोंडभरून कौतुक केले. अनेकांनी टिष्ट्वट करीत त्याची पाठ थोपटली. सचिन तेंडुलकरने चेंडूतील विविधतेबद्दल कुलदीपचे अभिनंदन केले. सचिन म्हणाला,‘ मी तुझ्या चेंडूतील विविधतेमुळे प्रभावित झालो. अशीच कामगिरी करीत राहा. हा सामना अविस्मरणीय ठरव.’भारतीय फलंदाज रोहित शर्मा जांघेतील दुखण्यामुळे बाहेर आहे. कुलदीपची गोलंदाजी रहस्य असल्याचे रोहितचे मत आहे. तो म्हणाला,‘भारतीय संघात नवा रहस्यमय गोलंदाज आला असून तो जादूगर आहे.’
 
माजी ऑफ स्पिनर हरभजनसिंग म्हणाला,‘स्वप्नवत सुरुवात केल्याबद्दल तुझे अभिनंदन. तुझ्या गोलंदाजीत जादू आहे. असाच चमकत राहा.’ आॅफ स्पिनर मुरली कार्तिक म्हणाला, ‘पदार्पणातील ही कामगिरी अप्रतिम अशीच आहे. गोलंदाजीची ही शैली मनापासून आवडली.’ आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यानेदेखील कुलदीपचे कौतुक केले. तो म्हणाला,‘युवा गोलंदाज कुलदीपने गोलंदाजीत शानदार स्पेल टाकून अनेकांची मने जिंकली.’
 
 
विराट कोहली बनला ड्रिंक्समॅन
 
चौथ्या कसोटी सामन्यात जेव्हा ड्रिंक्स ब्रेक पुकारण्यात आला तेव्हा हिमाचल प्रदेश क्रि केट असोसिएशन स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष भारतीय संघासाठी ड्रिंक्स घेऊन धावणाऱ्या खेळाडूकडे होते. तो दुसरा कोणी नाही तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होता. आपली ही नवीन भूमिका विराट कोहलीला आवडली असून त्याचा फायदा तो संघासाठी करीत आहे.
 
कोहलीने यावरून पुन्हा एकदा आपणच अव्वल असल्याचे सिद्ध केले. आपण खेळत नसलो तरी संघाला वेळोवेळी लागणारे सल्ले तसेच आपले योगदान देण्यामध्ये विराट अजिबात मागे नाही. यासाठीच जेव्हा ‘ड्रिंक्स ब्रेक’ झाला तेव्हा संघासाठी ड्रिंक्स घेऊन विराट कोहलीने मैदानात धाव घेतली. ड्रिंक्स ब्रेकचा फायदा घेत विराट कोहलीने अजिंक्य रहाणेला काही महत्त्वाचे सल्लेही दिले. यावरून विराट कोहलीची खेळभावना दिसत असून एक कर्णधार म्हणून तो किती योग्य आहे, हे सिद्ध झाले.
 
रहाणे ३३ वा कसोटी कर्र्णधार!
 
आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे भारताचा ३३ वा कसोटी कर्णधार बनला. भारतीय संघाचे नेतृत्व करणारा मुंबईचा तो नववा खेळाडू आहे. याआधी पॉली उम्रीगर, नरी कॉन्ट्रॅक्टर, जी.एस. रामचंद, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर यांनी भारताचे नेतृत्व केले होते.
 
वॉर्नने शिकविलेल्या फ्लिपरवर वॉर्नरला बाद केले : कुलदीप
 
महान गोलंदाज वॉर्नने जो फ्लिपर चेंडू टाकणे शिकविले त्या चेंडूचा वापर करीत डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने पहिला कसोटी बळी मिळवला, असा खुलासा युवा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने केला. कसोटी मालिका प्रारंभ होण्यापूर्वी पुणे येथे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी एका सत्रासाठी कुलदीपची वॉर्नसोबत भेट घडवून दिली होती. त्याचा त्याला लाभ झाला. वॉर्नकडून काय शिकायला मिळाले, याबाबत बोलताना २२ वर्षीय कुलदीप म्हणाला,‘तुम्ही माझा पहिला कसोटी बळी वॉर्नरला बाद होताना बघितले ? तो चायनामॅन चेंडू नव्हता. तो फ्लिपर होता. त्याची कला मला वॉर्नकडून शिकायला मिळाली. वॉर्नकडून शिकलेल्या चेंडूवर त्याच्याच देशाच्या खेळाडूला बाद करण्याचा आनंद शानदार होता.’
 
कुलदीप पुढे म्हणाला,‘शेन वॉर्न माझा आदर्श आहे. मी लहानपणापासून त्याचा चाहता आहे. मी एकदा त्याचा गोलंदाजीचा व्हीडीओ बघितला होता. त्याच्यासोबत भेट होणे म्हणजे स्वप्न साकार झाल्याप्रमाणेच होते. मी माझा आदर्श असलेल्या खेळाडूसोबत चर्चा करीत आहे, यावर माझा विश्वासच नव्हता. वॉर्नने मला जे करायला सांगितले तेच मी केले. नजिकच्या भविष्यात माझ्यासोबत आणखी एक सत्र करणार असल्याचे आश्वासन वॉर्नने दिले आहे.’ (वृत्तसंस्था)
 
धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर झे. रहाणे गो. कुलदीप ५६, मॅट रेनशॉ त्रि.गो. उमेश यादव १, स्टीव्ह स्मिथ झे. रहाणे गो. अश्विन १११, शॉन मार्श झे. साहा गो. उमेश ४, पीटर हॅण्डस्कोम्ब त्रि.गो. कुलदीप ८, ग्लेन मॅक्सवेल त्रि.गो. कुलदीप ८, मॅथ्यू वेड त्रि.गो. जडेजा ५७, पॅट कमिन्स झे. आणि गो. कुलदीप २१, स्टीव्ह ओकिफी धावबाद ८, नाथन लियोन झे. पुजारा गो. भुवनेश्वर १३, जोश हेजलवूड नाबाद २, अवांतर ११, एकूण : ८८.३ षटकांत सर्वबाद ३०० धावा. गडी बाद क्रम : १/१०, २/१४४, ३/१५३, ४/१६८, ५/१७८, ६/२०८, ७/२४५, ८/२६९, ९/२९८, १०/३००. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १२.३-२-४१-१, उमेश यादव १५-१-६९-२, अश्विन २३-५-५४-१, जडेजा १५-१-५७-१, कुलदीप २३-३-६८-४.
 
भारत पहिला डाव : लोकेश राहुल खेळत आहे ००, मुरली विजय खेळत आहे ००, अवांतर ००, एकूण : एका षटकात बिनबाद ०० धावा. गोलंदाजी : जोश हेजलवूड १-१-०-०.  
 

Web Title: India scored an impressive 153 for two in reply to Australia's reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.