फेडररची विजयी सलामी

By admin | Published: March 27, 2017 01:01 AM2017-03-27T01:01:08+5:302017-03-27T01:01:08+5:30

दुखापतींतून सावरून जबरदस्त पुनरागमन केलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने मियामी ओपन टेनिस

Federer's winning salute | फेडररची विजयी सलामी

फेडररची विजयी सलामी

Next

मियामी : दुखापतींतून सावरून जबरदस्त पुनरागमन केलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना त्याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोला नमवले. त्याच वेळी अन्य सामन्यात फेडररचाच देशबांधव स्टॅन वावरिंका यानेही विजयी आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या टियाफोला फेडररच्या दमदार खेळापुढे चांगलेच झुंजावे लागले. फेडररने जबरदस्त सर्विस करताना टियाफोला बेजार केले. पहिल्या सेटमध्ये काहीसे झुंजावे लागल्यानंतर फेडररने आपला हिसका दाखवताना टियाफोचे आव्हान ७-६, ६-३ असे संपुष्टात आणले. पहिला सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर तुफानी सर्व्हिस करताना फेडररने ७-२ अशी बाजी मारली.
दुसरीकडे यूएस ओपन विजेत्या वावरिंकाने विजयी आगेकूच करताना अर्जेंटिनाच्या होरासियो जेबालोसला सहज लोळवले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात होरासियोला पुनरागमनाची एकही संधी न देताना वावरिंकाने ६-३, ६-४ अशी बाजी मारली. वावरिंकापुढे पुढच्या फेरीत ट्यूनिशियाच्या मालेक जाजिरीचे आव्हान असेल. जाजिरीने पहिल्या फेरीत स्पेनच्या फेलिसियानो लोपेझला ६-३, ४-६, ६-३ असे नमवले.
महिलांमध्ये पहिल्याच फेरीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. पाचव्या मानांकित एग्निस्का रादवांस्काला क्रोएशियाच्या मिरजाना लुसिच बारोनीविरुद्ध पराभूत व्हावे लागल्याने स्पर्धेत खळबळ माजली. मिरजानाने कसलेल्या रादवांस्काला ६-०, ६-३ अशी सहजपणे धूळ चारत सर्वांचे लक्ष वेधले. अन्य लढतीत द्वितीय मानांकित कॅरोलिना पिलिस्कोवाने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना यूलिया पुतिनसेवाला ७-५, ६-३ असे नमवले. (वृत्तसंस्था)

Web Title: Federer's winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.